एदलजी सोराबजी
“नमस्कार, मी एदलजी
सोराबजी! इंग्लंड-अमेरिकेतून उच्चशिक्षण घेऊन महाराजांच्या दरबारात नोकरी
करण्यासाठी आलो आहे. माझ्या निवासाची व्यवस्था होईस्तव मला काही दिवसासाठी आपल्या
धर्मशाळेत राहण्यासाठी एक खोली पाहिजे आहे.” तरुण, रुबाबदार आणि उच्चविद्याविभूषित
युवकाचे हे अस्खलित इंग्रजीतील संभाषण ऐकून बडोद्यातील त्या पारशी धर्मशाळेतील
कर्मचारी त्याच्याकडे पाहतच राहिला. काहीही न बोलता त्याने त्याचे नाव नोंदवहीत
लिहून घेतले आणि त्याला खोलीची चाबी दिली. तो युवक आपल्या खोलीत आला. आतून दार बंद
करून घेतले आणि निपचितपणे पलंगावर पडला. डोळे मिटल्यावर त्याला काही वर्षापूर्वीचे
दिवस आठवले – ‘बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीच्या
आधारे त्याने अमेरिकेतील विख्यात कोलंबिया विद्यापीठात उच्चाशिक्षणासाठी प्रवेश
घेतला होता. अमेरिकेतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता बघून तो प्रभावित झाला होता.
तेथील विद्यानुकुल वातावरणात त्याने एम. ए. व पिएच. डी. ची पदवी प्राप्त केली होती. त्याचप्रमाणे लंडन
विद्यापीठात जावून कायद्याचा अभ्यास सुद्धा केला होता.’ तेथील अविस्मरणीय आठवणी
आठवता आठवता त्याला कधी झोप लागली हे कळलेच नाही. मध्यरात्रीनंतर त्याला जाग आली. पोटात अन्नाचा
एकही कण नसल्यामुळे त्याला आता उपाशी पोटी झोप लागणार नव्हती. या पूर्वीही त्याने
अशा अनेक रात्री उपाशी पोटी काढल्या होत्या. पोटाला आधार म्हणून टेबलवर ठेवलेले
ग्लासभर पाणी तो गटागटा प्याला आणि आपल्या बॅगमधून ‘नेपोलियन’ चा चरित्रग्रंथ काढून
त्याने वाचायला घेतला. जेंव्हा जेंव्हा तो निराश होई तेंव्हा तेंव्हा तो
नेपोलियनचे चरित्र वाचत असे. नेपोलियनचे स्फूर्तीदायक चरित्र वाचल्यावर त्याला
उर्जा मिळत असे.
आज सुद्धा तो अतिशय खिन्न
मनस्थितीत होता. ‘शिष्यवृत्तीच्या बदल्यात तुला आमच्या दरबारात नोकरी करावी
लागेल.’ असा करार बडोद्याच्या महाराजांनी त्याच्याशी केला होता. त्यानुसार तो
बडोद्याला आला होता. यापूर्वीही तो महाराजांकडे नोकरीसाठी बडोद्याला आला होता.
त्यावेळी त्याला अतिशय वाईट अनुभव आला होता. निदान यावेळेस तरी आपली निराशा होणार
नाही असे त्याला वाटले होते. परंतु स्टेशनवर उतरल्याबरोबर आपल्या पुढ्यात काय
वाढून ठेवले आहे? याची कल्पना त्याला आली. स्टेशनवर त्याला घ्यायला कोणीच आले
नाही. त्याच्या राहण्या–खाण्याची व्यवस्था सुद्धा केल्या गेली नाही. एक दोन दिवस
आपल्या परिचिताकडे त्याने कसेबसे काढले. महाराजांनी त्याची नेमणूक कार्यालयात
अधिकारीपदावर केली होती. तरी सुद्धा कार्यालयातील सर्व कर्मचारी त्याच्याशी
तुच्छतेने वागत. चपराशी त्याला दुरूनच पाणी देई. त्याचे पाणी पिण्याचे ग्लास
सुद्धा वेगळे ठेवल्या जात असे. कामकाजाची कागदपत्रे कर्मचारी लांबूनच त्याच्या टेबलवर
फेकत. त्याचा स्पर्श होऊ नये म्हणून सगळ्या कर्मचाऱ्यांनी आपापले टेबल त्याच्या
टेबलपासून चार हात मागे सरकवले होते. एक दिवस त्याने चपराशाला पाणी मागितले. चपराशाने
जाणूनबुजून कानाडोळा केला. शेवटी तो स्वतः उठून माठातील पाणी घेऊ लागला, तेंव्हा
‘विटाळ झाला विटाळ झाला’ असे म्हणून कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केला.
अशा अपमानास्पद प्रसंगाचा त्याला बराच अनुभव होता. विद्यार्थीदशेत असताना त्याला
वर्गाच्या बाहेर बसावे लागे. इतर विद्यार्थी त्याच्याशी बोलत नसत. पिण्याचे पाणी
सुद्धा त्याला मिळत नसे. परंतु यावेळी त्याच्या मनात मात्र कायमचे शल्य निर्माण
झाले होते. असे मानहानीकारक जिणे आपण कुठपर्यंत जगायचे या प्रश्नाने तो अस्वस्थ
होत होता.
अशा विदारक परिस्थितीत तो बडोद्यात
राहण्यासाठी जागा शोधू लागला. परंतु त्याला राहायला कोणीही घर दिले नाही की
कोणत्या धर्मशाळेत त्याला जागा मिळाली नाही. एक दिवस घर शोधू शोधू तो खूप थकला.
भुकेने त्याचा जीव कासावीस झाला असता तो समोरच्या खानावळीत गेला. तेथे हिंदू,
मुसलमान, ख्रिश्चन असे विविध धर्मीय लोक त्याला जेवताना दिसले. आपल्याला नक्कीच
जेवण मिळेल असे त्याला वाटले. परंतु येथेही त्याचा भ्रमनिराश झाला. खानावळीच्या
मालकाने त्याचा अपमान करून हाकलून दिले. आता काय करायचे? कुठे राहायचे? कुठे
खायचे? याचा विचार करीत बडोद्याच्या रस्त्यावर तो बराच वेळ फिरत असता त्याला ही
पारशी धर्मशाळा दिसली. येथे काहीतरी सोय होईल या आशेने तो धर्मशाळेत आला होता.
तीनचार वर्ष इग्लंड-अमेरिकेत
राहिल्यामुळे तो चांगला गोरा-गोमटा झाला होता. त्याचे व्यक्तिमत्व आकर्षक बनले
होते. त्याची इंग्रजी बोलण्याची शैली पाहून तर भलेभले प्रभावित होत असत. त्याच्या
वागण्या-बोलण्यातून कोणालाही त्याच्याविषयी शंका वाटत नव्हती. म्हणून त्याने पारशी
धर्मशाळेत ‘एदलजी सोराबजी’ असे खोटे नाव सांगून राहण्यासाठी खोली मिळविली. दहापंधरा
दिवसांपासून होत असलेली त्याची दगदग थांबली. तात्पुरती का होईना त्याच्या निवासाची
सोय झाली होती. रोज सकाळी लवकर धर्मशाळेतून बाहेर पडून ग्रंथालयात जाणे,
कार्यालयाची वेळ होईपर्यंत तेथे बसुन ग्रंथ वाचन करणे, नंतर कार्यालयात जाणे,
दुपारच्या सुटीत कुठल्यातरी हॉटेलमध्ये जावून जेवण करणे, तेथून पुन्हा कार्यालयात
जाणे, तेथे काम नसेल तर ग्रंथ वाचत बसणे, सायंकाळी कार्यालयातून परत ग्रंथालयात
जावून ग्रंथ वाचन करणे, रात्री बाहेरच जेवण करून उशिरा धर्मशाळेत जावून सकाळपर्यंत
झोप घेणे अशी त्याची दिनचर्या सुरू झाली. सर्व काही सुरळीत चालले होते.
एके दिवशी कार्यालयात कहरच झाला.
त्याच्या आगमणामुळे कार्यालय अपवित्र झाले. असे समजून कर्मचाऱ्यांनी कार्यालयात
गोमुत्र शिपंडले. ही गोष्ट त्याला समजली. आता मात्र त्याचा राग अनावर झाला. आज
झालेला अपमान त्याच्या जिव्हारी लागला. “परधर्मातील मुस्लीम, ख्रिश्चन, पारशी
यांच्या जवळ बसलेले तुम्हाला चालते. त्यांच्या स्पर्शामुळे तुम्हाला विटाळ होत
नाही. त्यांच्यासोबत खाण-पाण केल्यामुळे तुम्ही अपवित्र होत नाही आणि मी मात्र
तुमच्याच हिंदू धर्मातील असून सुद्धा माझ्या स्पर्शाने तुम्हाला विटाळ होतो. तुमचा
धर्म बुडतो. हा कुठला धर्म आहे? ही तर घोर विटंबना आहे. आणि मी आज अशी प्रतिज्ञा
करतो की ही अन्यायकारी विषमता नष्ट केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.” असे आवेशात
कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुनावून तो तडक कार्यालयाच्या बाहेर पडला.
झालेल्या अपमानामुळे त्याचे चित्त
जागेवर नव्हते. थोडी मनशांती, समाधान मिळावे म्हणून तो ग्रंथालयात गेला. अनेक
ग्रंथ त्याने चाळले. परंतु तो आपले चित्त स्थिर करू शकला नाही. अशातच अचानक त्याची
नजर कपाटातील एका ग्रंथाकडे गेली. हा ग्रंथ आपण कुठेतरी पहिला आहे. नव्हे वाचला
सुद्धा आहे. असे त्याला जाणवले. आठवता आठवता त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तो
मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल एका जेष्ठ हितचिंतकाने आपला हा स्वलिखित ग्रंथ
त्याला भेट होता. एखादा जुना मित्र खूप दिवसांनी भेटावा असा आनंद त्याच्या
चेहऱ्यावर उमटला. सकाळी झालेल्या अपमानाचाही काही क्षणासाठी त्याला विसर पडला.
कपाटावरील तो ग्रंथ त्याने त्वरेने उचलला. आणि वाचनकक्षाच्या कोपऱ्यातील एका शांत
जागी तो वाचायला बसला. एकदा ग्रंथ वाचून झाल्यावरही पुन्हा पुन्हा तो ग्रंथ वाचत
राहिला. सायंकाळी ग्रंथालय बंद होण्याची वेळ झाली तरी त्याचे ग्रंथवाचन सुरूच
होते. ग्रंथालयाच्या कारकुनाने आवाज दिल्यामुळे त्याने वाचन थांबविले. परंतु
ग्रंथालयातून बाहेर पडल्यावरही त्याच्या डोक्यातील विचारचक्र वेगाने फिरत होते. एक
विलक्षण मनशांती त्याला त्या ग्रंथवाचनामुळे मिळाली होती. नेपोलियनच्या
चरित्रग्रंथापेक्षाही त्याला झपाटून टाकणाऱ्या त्या ग्रंथाचे नाव होते- ‘भगवान
गौतम बुद्धांचे चरित्र’!
रात्री बाहेरच जेवण करून तो नेहमीप्रमाणे
उशिरा धर्मशाळेत परतला. त्याची झोप पार उडाली होती. त्यामुळे पुन्हा त्याने ‘भगवान
बुद्धांचे चरित्र’ वाचायला घेतले. वाचता वाचता सहज त्याच्या मनात - ‘आपण खोटे नाव
सांगून पारशी धर्मशाळेत राहायला नको होते. कोणत्याही परिस्थितीत आपण सत्यच बोलायला
पाहिजे होते’ असा विचार आला. आपण उद्या सकाळी पारशी कर्मचाऱ्याला सर्व सत्य
परिस्थिती सांगून धर्मशाळा सोडून जाऊ असे सुद्धा त्याने ठरविले. तेवढ्यात त्याला
बाहेर काहीतरी गोंधळ सुरु असल्याचा आवाज ऐकू आला. काहीतरी विपरीत घडले अशी शंका
त्याला आली. तो ग्रंथ बंद करून उठणार तितक्यात त्याच्या खोलीच्या दारावर जोरजोराने
ठकठक सुरु झाली. तो प्रचंड घाबरला. तरीसुद्धा येणाऱ्या संकटाचा सामना धैर्याने
करायचा असे त्याने ठरविले. दारावरची ठकठक वाढतच होती. मोठ्या हिमतीने त्याने दार
उघडले. पाहतो तर काय हातात लाठ्या-काठ्या घेतलेले दहा-बारा पारशी युवक त्याच्या
समोर उभे होते. ‘कोण आहेस तू?’ ‘तुझे नाव काय आहे?’ ‘तू इथे का राहिलास?’ असा
प्रश्नाचा भडीमार अतिशय रागाने पारश्यांच्या म्होरक्याने त्याच्यावर सुरु केला. तो
अतिशय शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत होता. शेवटी त्या पारशी लोकांना म्हणाला “ होय! मी
अस्पृश्य आहे! महार आहे!! सयाजीराव गायकवाड महाराजांनी नोकरीसाठी आणलेला,
उच्चविद्याविभूषित असूनही बडोद्यात अपमानास्पद जिणे जगणारा मीच आहे तो डॉ. भीमराव
रामजी आंबेडकर!!!