प्रस्तावना:
‘जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाही.’
अशा अचूक शब्दात इतिहासाचे
महत्व विशद करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक प्रभावी इतिहासकार होते. त्यांच्या साहित्याचा
ऐतिहासिक दृष्टीकोनातून अभ्यास केल्यास त्यांच्या व्यक्तिमत्वातील ‘इतिहासकार’
प्रकर्षाने दिसून येतो. परंतु इतिहास संशोधकांनी त्यांच्या सामाजिक आणि राजकीय योगदानावर
जास्तीत जास्त संशोधन केल्यामुळे, काही सन्माननीय अपवाद वगळता आंबेडकरांच्या इतिहास लेखनकार्यावर फारसे
ऐतिहासिक संशोधन कुणी केले नाही. परिणामी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक इतिहासकार होते.’
असा पुसटसा उल्लेखही इतिहासाच्या पुस्तकांतून दिसून येत नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इतिहासविषयक ज्ञान,
त्यांनी केलेली इतिहासाची व्याख्या, त्यांचे इतिहासलेखन, त्यांचा इतिहासविषयक दृष्टीकोन, त्यांनी केलेली इतिहास चिकित्सा,
त्यांचे इतिहासाचे तत्वज्ञान आणि त्यांना अपेक्षित इतिहासाचे पुनर्लेखन इत्यादी
मुद्दयांच्या आधारे ‘डॉ.
बाबासाहेब आंबेडकर हे एक प्रभावी इतिहासकार होते.’
हे सिध्द करणे हा प्रस्तुत लघुशोधनिबंधाचा उद्देश आहे.
आंबेडकरांची इतिहासाची व्याख्या:
अनेक भारतीय तसेच पाश्चात्य इतिहासकारांनी
विविध प्रकारे इतिहासाची व्याख्या केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा इतिहास
म्हणजे काय ते स्पष्ट केले आहे. औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या एका कार्यक्रमात
बोलतांना आंबेडकर म्हणतात, “इतिहासाकडे
नेहमी बदल म्हणून पाहावे. कारण इतिहास हा नेहमी राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक
आणि सांस्कृतिक स्थिती बदलवीत असतो.” म्हणून
‘इतिहास म्हणजे बदल.’ अशा एका शब्दात आंबेडकर इतिहासाची व्याख्या सांगतात. फक्त एकाच शब्दात इतिहासाची
व्याख्या सांगणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एकमेव इतिहासकार म्हणावे लागतील.
आंबेडकरांचे इतिहासलेखन:
डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक समस्यांचे मूळ
शोधण्यासाठी भारतीय इतिहासाचे सखोल अध्ययन
आणि संशोधन केले. इतिहासाच्या आधारे या समस्यांवरील उपाययोजना सुद्धा त्यांनी
सांगीतल्या. आंबेडकरांनी लिहिलेले सर्वच ग्रंथ इतिहासग्रंथ होते असे नाही.
त्यांच्या काही निवडक ग्रंथांनाच इतिहासग्रंथ म्हणता येईल. परंतु त्यांच्या जवळपास
सर्वच ग्रंथात त्यांनी विपुल प्रमाणात इतिहास लेखन केलेले दिसून येते. ‘हिंदुस्थानातील
जाती, त्यांची घटना, उत्पत्ती आणि वाढ’ या ग्रंथात आंबेडकरांनी, भारतातील
जातीसंस्थेची ऐतिहासिक दृष्टीकोनातून चिकित्सा केली आहे. ‘जातीसंस्थेचे उच्चाटन’ या
ग्रंथात आंबेडकरांनी, “चंद्रगुप्त
मौर्याच्या राजकीय क्रांतीपूर्वी बुद्धाने धार्मिक व सामाजिक क्रांती केली. प्रेषित
महम्मद पैगंबर यांनी प्रथम अरब लोकांतील अनिष्ट धर्माचा व चालीरीतीचा नायनाट केला.
समानतेच्या धर्मात सर्वाना आणून त्यांची संघटना अभेद्य केली. म्हणून मुसलमानांना
चारी खंडात आपले राजकीय वर्चस्व स्थापन करता आले. शिवाजी व नानक यांच्यापूर्वी
संतानी सामाजिक समतेच्या चळवळीत समाजाला आणले. म्हणून शिवाजी व नानक यांना आपले
शौर्य प्रगट करण्यास क्षेत्र मिळाले.” असे
ऐतिहासिक विधान केले आहे. ‘शुद्र पूर्वी कोण होते?’ या ग्रंथात, ऋग्वेदकालीन
मनुवंशीय आणि महाभारतकालीन दुष्यंतवंशीय अशा भरत नावाच्या दोन टोळ्या होत्या.
त्यापैकी ऋग्वेदकालीन मनुवंशीय भरत टोळीवरून आपल्या देशास भारत असे नामाभिमान
मिळाले, हिंदू समाजात वर्ण उपन्न होईपर्यंत शुद्र म्हणजे निचातला नीच माणूस असे हिंदूंना
वाटत होते, भारतात एक नव्हे तर दोन आर्य वंश होते, शुद्र हे क्षत्रिय होते,
इत्यादी ऐतिहासिक सिद्धांत आंबेडकर मांडतात. ‘अस्पृश्य मुळचे कोण?’ या ग्रंथात
आंबेडकर, “धार्मिक आणि सांस्कृतिक लक्षणावरून अस्पृश्य हे पूर्वाश्रमीचे बौद्ध
होते. इ.स.पु. ७५ मध्ये भारतात राजकीय सत्तांतर होवून बौद्ध धर्मियांचा राजाश्रय
संपला. त्यामुळे त्यांची वाताहत झाली. बौद्ध धर्मियांनी ब्राह्मण धर्माचे आधिपत्य
अमान्य केले. त्यांच्या धर्माचा स्वीकार केला नाही. परिणामी राजकीय सत्तेच्या
सहाय्याने त्यांनी बौद्ध धर्मियांवर अनेक अनेक प्रकारचे निर्बंध लादले.” अशी अस्पृशतेच्या उदयाची ऐतिहासिक दृष्टीकोनातून मीमांसा करतात. ‘ईस्ट इंडिया कंपनी: प्रशासन आणि अर्थनीती’ या ग्रंथात आंबेडकर, “१८५८ च्या सत्तांतराचे श्रेय १८५७ च्या बंडाला देणे चुकीचे आहे.
भारताचे राज्य कंपनी सरकारकडून हस्तांतरित करण्यासंबधीची चर्चा प्रत्यक्षात बंड
होण्यापूर्वीच झाली होती.” हे
अतिशय महत्वपूर्ण ऐतिहासिक विधान करतात. ‘ब्रिटीश भारतातील प्रांतिक वित्ताची उत्क्रांती’ या ग्रंथात
आंबेडकरांनी, १८३३ ते १९२१ या कालखंडात ब्रिटीश आणि भारतीय संस्थाने यांच्यातील आर्थिक
संबंधाची ऐतिहासिक चर्चा केली आहे. ‘रुपयाचा प्रश्न: उद्गम आणि उपाय’ या ग्रंथात
आंबेडकर, इ.स. १८०० ते १८९३ या कालखंडातील भारतीय रुपयाची चलनाचे परिमाण म्हणून
कशी जडणघडण होत गेली, याचे ऐतिहासिक दृष्टीकोनातून विवेचन करतात. ‘भारतातील लहान
शेतजमिनी आणि त्यावरील उपाय’ या ग्रंथात आंबेडकर, “औद्योगिकरणास गती देवून शेतीचा आजार बरा करण्याच्या पद्धतीला आम्ही
प्राधान्य देतो, औद्योगिकरणास गती दिल्याने शेतीचा विकास कसा होतो याचा अभ्यास
१८९३ साली अमेरिकेत करण्यात आला होता.” असे मत
अमेरिकन इतिहासाच्या आधारे व्यक्त करतात. ‘हिंदू धर्मातील कुटप्रश्न’ या ग्रंथात
आंबेडकरांनी हिंदू धर्मातील अनेक अनाकलनीय प्रश्नाची ऐतिहासिक दृष्टीकोनातून उकल
केली आहे. ‘प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती’ या ग्रंथात आंबेडकरांनी
भारतीय इतिहास म्हणजे ब्राह्मण आणि बौद्ध यांच्यातील संस्कृती संघर्ष होय असे
म्हटले आहे. ‘पाकीस्तान: भारताचे विभाजन’ या ग्रंथात भारताच्या मध्ययुगीन इतिहासाचे
विश्लेषण करताना, मुसलमानांच्या भारतावरील आक्रमणाविषयी आंबेडकर म्हणतात, “इस्लामच्या आक्रमणाचा उद्देश धर्मप्रसार करणे व लुट गोळा करणे हा तर
होताच, पण इस्लामच्या आक्रमणाची केवळ धार्मिक आणि
आर्थिक कारणमीमांसा पुरेशी नाही. इस्लाम धर्मियांनी भारतावर आक्रमणे केली, त्यात
प्रथम तुर्की लोकांनी भारतावर आक्रमण केले, तुर्कांचे राज्य भारतात स्थापन
झाल्यानंतर मंगोलांनी तुर्की राज्यावर आक्रमण केले. मंगोलांचे म्हणजेच मुघलांचे
राज्य स्थापन झाल्यानंतर अफगाण-पठाणांनी मुघल राज्यावर आक्रमण केले. हा इतिहास आहे
तुर्क, मंगोल, पठाण हे सर्व इस्लामधर्मीय आहेत, तेंव्हा भारतात तुर्की राज्य
स्थापन झाले व इस्लाम धर्माचा प्रसार करण्याचे कार्य तुर्की राज्यकर्ते करत असताना
मंगोल तुर्की राज्यावर आक्रमण करतात, त्यांचा हेतू काय होता? असा प्रश्न उपस्थित
होतो. म्हणून ही आक्रमणे केवळ धर्मप्रसार व आर्थिक लुट यासाठीच झालेली नसून वंशभेदामुळे
राजकीय महत्वाकांक्षेपोटी मुस्लीम धर्मियांच्या सत्तेसाठी झालेल्या या आपापसातील
लढाया होत्या.” असे परखड मत आंबेडकर व्यक्त करतात. ‘महाराष्ट्र: एक
भाषिक प्रांत’ या ग्रंथात आंबेडकर, “गुजराती
हे स्वेच्छेने मुंबईला आले नव्हते. इ.स. १६७१ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर
ऑंगीयर यांनी त्यांना व्यापारी, आडते किंवा दलाल म्हणून काम करण्यासाठी मुंबईत
आणले. ते अन्य व्यापारांशी मुक्तपणे समान स्पर्धा करण्यासाठी व्यापाराच्या
उद्देशाने मुंबईत आलेले नव्हते.” असे
म्हणतात. ‘नियंत्रण व समतोलाची गरज’ या लेखात, “ब्रिटीशांनी भाषावार प्रांत रचनेचा विचार करण्यापूर्वी कॉंग्रेस
पक्षाने १९२० साली महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भाषावार प्रांत रचनेच्या
आधारे स्वतःसाठी एक घटना तयार केली होती. १९२० मध्ये कॉंग्रेसने तयार केलेल्या
घटनेमुळे त्यांच्यावर जी जबाबदारी आलेली होती, त्याला त्यांनी १९४५ पर्यंत कधीच
तोंड दिले नाही.” हे ऐतिहासिक तथ्य उजागर करतात. ‘भाषिक राज्यसंबंधी विचार’ या ग्रंथात, “दिल्ली
हे शहर अशा ठिकाणी वसलेले आहे की, युद्ध प्रसंग ओढवल्यास शेजारच्या राष्ट्रांच्या
बॉम्ब हल्ल्यांच्या कक्षेत येणारे आहे, त्यामुळे हैदराबाद येथे भारताची दुसरी
राजधानी बनवावी.” हे ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्वाचे विधान आंबेडकर करतात. ‘रानडे,
गांधी आणि जीना’ या ग्रंथात, “राष्ट्रविचाराने,
श्रद्धेने आणि समान भवितव्याच्या उद्देशाने भारत पूर्णतः एक राष्ट्र झाल्याशिवाय
ब्रिटीशांनी भारत सोडून जाणे म्हणजे स्वातंत्र्याच्या नावावर गोंधळाला व
अवास्तवतेला निमंत्रण देणेच होय.” हे
रानडे यांचे मत उद्धृत करून ऐतिहासिक तुलना करतात. ‘गांधी आणि अस्पृशांचे
बंधविमोचन’ या ग्रंथात, “जगातील गुलामांचा
इतिहास बघता असे लक्षात येते की, रोमन, स्पार्टन, ब्रिटीश आणि अमेरिकन लोकांनी
आपल्या गुलामांना स्वातंत्र्य देवून महान ऐतिहासिक कार्य केले. भारतातील हिंदू
ब्रिटीशांच्या पारतंत्र्यातून मुक्त होवून अस्पृश्यांना मात्र स्वतःच्या
गुलामगिरीत ठेवू पाहतात.” दुसऱ्या
महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर अस्पृशांचे प्रश्न जगासमोर मांडतांना आंबेडकर वरील
विधान करतात. ‘कॉंग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या ग्रंथात आंबेडकरांनी
१९१७ ते १९४५ या कालखंडात कॉंग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांप्रति केलेल्या
कार्याचे ऐतिहासिक दृष्टीकोनातून विवेचन केले आहे. ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या
ग्रंथात आंबेडकरांनी, बुद्ध या भारतातील प्रथम इतिहास पुरुषाने भारतात केलेल्या सामाजिक
क्रांतीची चर्चा केली आहे. अशाप्रकारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक,
आर्थिक, धार्मिक अशा विविध दृष्टीकोनातून भारतीय इतिहासाचे अध्ययन आणि संशोधन केले
आहे.
आंबेडकरांचा इतिहासविषयक दृष्टीकोण:
आंबेडकरांच्या ‘रानडे गांधी आणि
जिना’ या ग्रंथात त्यांचा इतिहासविषयक दृष्टीकोण दिसून येतो. सेंट ऑगस्टीन, बकल आणि
कार्ल मार्क्स यांच्या इतिहासविषयक दृष्टिकोनाचा समाचार घेत असताना आंबेडकर
म्हणतात, ‘सेंट ऑगस्टीनच्या मते इतिहास म्हणजे केवळ ईश्वराने रचून ठेवलेल्या
योजनांचा क्रमशः उलगडा मात्र होय! या ईश्वरी योजनेनुसार माणसाला दुःख व युद्धाच्या
प्रसंगातून काळ कंठावयाचा असून निर्णयाचा दिवस उजाडेपर्यंत हे असेच चालणार आहे.
बकलच्या मते इतिहास केवळ भूगोल आणि भौतिक परिस्थितीद्वारे घडविला जातो. तर
मार्क्सच्या मते इतिहास केवळ आर्थिक शक्तीची प्रतिक्रिया होय. या तिनही
विचारवंतानी इतिहास निर्मितीत मानवाचे कोणतेही स्थान नाकारले आहे.’ आंबेडकर पुढे
म्हणतात, ‘सेंट ऑगस्टीनचा इतिहासविषयक दृष्टीकोण धर्मगुरूंशिवाय कोणीही स्वीकारणार
नाही, बकल आणि कार्ल मार्क्स यांच्या इतिहासविषयक
दृष्टीकोणात सत्यांश असला तरी ते पूर्णसत्य नाही. त्यांनी इतिहास निर्मितीत
व्यक्तीऐवजी व्यक्तीनिरपेक्ष शक्तींना जे स्थान दिले आहे ते चूक आहे.’ आंबेडकरांच्या मते व्यक्तीनिरपेक्ष शक्तींचा
प्रभावही भावी कर्तृत्वावर अवलंबून असतो, इतिहास निर्मितीत व्यक्तीनिरपेक्ष शक्तींपेक्षा मानवाचे स्थान अधिक
महत्वाचे आहे. इतिहास निर्मिती ही परिस्थितीजन्य शक्ती आणि माणूस यांच्या कडून होत
असते. अशाच ऐतिहासिक तत्वचिंतकाच्या शुद्ध दृष्टीकोनातून आंबेडकरांनी भारताच्या
सामाजिक आणि धार्मिक इतिहासाच्या संशोधन केले आहे.
आंबेडकरांचे इतिहासविषयक तत्वज्ञान:
डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त लिहायचा म्हणून इतिहास लिहिला नाही तर त्यांच्या
इतिहास लेखनामागे एक उदात्त तत्वज्ञान होते. दलित-पिडीत अस्पृश्यांना त्यांच्या
गौरवशाली इतिहासाशी अवगत करून त्यांचा लुप्त झालेला स्वाभिमान जागृत करून एका नवसमाजाची
पुनर्निर्मिती करण्यासाठी आंबेडकरांनी विशिष्ट इतिहासविषयक तत्वज्ञान मांडले. राजे-राजवाडे
यांचा इतिहास न लिहिता जनसामान्यांचा, वंचितांचा, शूद्रातिशूद्राचा इतिहास लिहिला.
कोणताही पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन न ठेवता तटस्थपणे इतिहासाचे संशोधन केले. भारतीय
इतिहासाची विभागणी ब्राह्मण भारत, बुद्ध भारत आणि हिंदू भारत अशा तीन कालखंडात
करून ‘भारतीय इतिहास हा संस्कृती संघर्षाचा इतिहास आहे’ हे इतिहासाचे नवीन
तत्वज्ञान मांडले.
आंबेडकरांनी केलेली इतिहास चिकित्सा:
इतिहासकारांनी कोणते आदर्श समोर ठेवून इतिहासलेखन करावे याचे दिग्दर्शन
गोथे याने अचूकपणे केले आहे, तो म्हणतो- असत्यापासून सत्याचा निवडा करणे,
अनिश्चिंतापासून निश्चीताला वेगळे काढणे आणि निश्चयात्मकपणे अमान्य होण्यासारख्या
बाबीपासून शंकास्पद बाबी वेगळ्या करणे, हेच इतिहासकाराचे कर्तव्य होय.
संशोधकांसमोर जी माहिती उपलब्ध असेल तिच्याकडे साकल्याने न्यायाधीशाच्या
निष्पक्षपाती दृष्टीकोनातून त्याने पहिले पाहिजे. एखाद्या घटनेविषयी केलेले विधान
पुराव्यानुसार पाहता कितपत परिपूर्ण व स्पष्ट आहे याचा त्याने विचार करावयास हवा
आणि याबद्दल नंतरच निष्कर्ष काढून आपला अभिप्राय द्यावयास पाहिजे मग तो निष्कर्ष
पूर्वीच्या इतिहासतज्ञाने नोंदविलेल्या मताशी जुळणारा असो की नसो यासंदर्भात आंबेडकर म्हणतात, “सुसंबंध
उपलब्ध घटनांच्या बाबतीत गोथेचे मार्गदर्शन उपयुक्त ठरते. परंतु जेंव्हा घटनांच्या
जंत्रीमधील तुटलेल्या दुव्यांजवळ एखादा संशोधक येवून अडखडतो आणि जेंव्हा दोन
महत्वाच्या घटनांमधील संबंध दाखविणारा प्रत्यक्ष असा पुरावा उपलब्ध नसतो. तेंव्हा
त्या इतिहास संशोधकाने काय करावे हे गोथे सांगत नाही.” याबाबत पुढे आंबेडकर म्हणतात, “अशा अनेक तुटलेल्या दुव्याशी मला झटपट करावी लागली आहे. त्यांच्याशी
अशी झटपट करणारा मी एकटाच नाही. भारताच्या प्राचीन इतिहासाच्या सर्वच
विद्यार्थ्यांना अशा प्रसंगांना तोंड द्यावे लागते. कारण स्टुअर्ड एलफिस्टन म्हणतो
त्याप्रमाणे- अलेक्झांडर येण्यापूर्वीच्या भारताच्या इतिहासातील कोणत्याही
सार्वजनिक घटनेची तारीख निश्चित करणे कठीण आहे, आणि मुसलमानांच्या अधीपत्यापुर्विच्या
काळातील नैसर्गिक उत्क्रांतीचा सुसंबंध क्रम लावण्याचा प्रयत्न करता येणे शक्य
नाही ही एक खेदजनक कबुली आहे. परंतु त्याला इलाज नाही. प्रश्न असा की इतिहासाच्या
विद्यार्थ्याने करावे तरी काय? गळलेला ऐतिहासिक दुवा सापडेपर्यंत त्याने स्वतःला
आरामाचा हुकुम द्यावा काय? मला तसे वाटत नाही. अशा प्रसंगी त्याने शक्य त्या
कल्पनाशक्तीचा व प्रतिभेचा उपयोग करून घ्यावा व त्याद्वारे अजून संशोधित असलेल्या ऐतिहासिक
दुव्यांची साखळी जोडावी आणि ज्या घटनांचे दुवे सापडत नाहीत ते उपलब्ध घटनांद्वारे
पाहता कसे असू शकतील याचे अनुमान प्रस्तुत करावे. संशोधकाचे कार्य खोळंबून
ठेवण्यापेक्षा या युक्तीद्वारे, तुटलेल्या दुव्यांमुळे निर्माण झालेल्या अडचणीतून
मार्ग काढणेच मी पसंत केले आहे. अशाप्रकारे इतिहासाच्या विद्यार्थ्याने इतिहासाची चिकित्सा कशी करावी या बद्दल
आंबेडकर मार्गदर्शन करतात.
आंबेडकरांना अपेक्षित इतिहासाचे पुनर्लेखन:
आंबेडकरांच्या मते भारतीय इतिहासाचे
पुनर्लेखन करणे आवश्यक आहे. पाश्चात्य इतिहासकारांच्या भारतीय इतिहासलेखनाविषयी
आंबेडकर म्हणतात, “युरोपच्या इतिहासातून निघालेले निष्कर्ष भारतीय इतिहासाला जसेच्या तसे
लावू नये. एका देशाचा इतिहास दुसऱ्या देशास लावता येणार नाही. मार्क्सप्रणीत
युरोपातील इतिहासाच्या आधारे भारतीय इतिहास लिहिल्यामुळे भारतीय इतिहासास मर्यादा
पडतात. त्यामुळे भारतीय इतिहासाचे आकलन कोणत्या अन्वेषण पद्धतीने होवू शकेल याची
चर्चा केली पाहिजे.” भारतातील ब्राह्मणी इतिहासकारांनी लिहिलेल्या भारतीय इतिहासाविषयी
आंबेडकर ‘प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती’ या ग्रंथात म्हणतात, “प्राचीन भारताला समृद्ध इतिहास असताना भारताला इतिहास नाही असे
म्हटल्या जाते ते कितपत सत्य आहे? कारण ब्राह्मणी लेखकांनी प्राचीन इतिहासाला पौराणिक
कथांचे स्वरूप देवून खरा इतिहास दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.” इतिहास लेखनाच्या संदर्भात राजघराण्याची कहाणी म्हणजे इतिहास ही
पारंपारिक मतप्रणाली आंबेडकरांनी नाकारली. भारतीय इतिहासाला राजेमहाराजांच्या
राजवाड्यांतून भटब्राह्मणांच्या देवघरातून बाहेर काढून त्याच्या कक्षा विस्तारित
करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. भारतीय इतिहासात जे संघर्ष झाले ते सर्व राजकीय
होते. त्यांचा सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाशी काहीच संबंध नव्हता. या चुकीच्या
कल्पनेच्या आधारे भारतीय इतिहास लिहिल्या गेला. इतिहास लेखनाची ही प्रवृत्ती
सुधारावयाची असेल तर इतिहासातील सत्य स्वीकारून समजून घेतल्याशिवाय भारताचा खरा इतिहास
इतिहास लिहीताच येणार नाही. कारण भारताचा इतिहास हा ब्राह्मण-ब्राह्मणेतरांच्या
जातीच्या संघर्षाचा इतिहास आहे. या संघर्षानेच भारताचा इतिहास घडविला आहे. म्हणून
भारतीय इतिहासाचे पुनर्लेखन गरजेचे आहे. अशी भूमिका डॉ बाबासाहेब आंबेडकर घेतात.
मूल्यमापन:
डॉ बाबासाहेब आंबेडकर
हे भारताचा खरा इतिहास लिहिणारे एक सत्यनिष्ठ इतिहासकार होते. इतिहासकार कसा असला
पाहिजे या विषयी त्यांनीच सांगितलेले- “इतिहासकार हा काटेकोर, तळमळीचा, आणि पंक्तीप्रपंच न करणारा असा असला
पाहिजे. भावनारहित, आपुलकीची भावना, भीती, तिरस्कार किंवा प्रेमाची ओढ
यांच्यापासून मुक्त असा असला पाहिजे. इतिहासाची जननी जी सत्यनिष्ठा ती त्याच्या
रोमारोमात भिनलेली असली पाहिजे. महतकृत्यांना सुरक्षित ठेवणारा, अंधाराचा संहार
करणारा, पूर्वकाळाचा साक्षी आणि भावी काळाचा नेता असा तो असला पाहिजे. थोडक्यात
सांगावयाचे म्हणजे अगदी रिकामे नसणारे नव्हे पण उघडे असणारे त्याचे मन पाहिजे.
खोटे-नाटे पुरावे जरी त्याच्या हाती लागले तरी त्या सर्व पुराव्यांची छाननी
करण्याची त्याची तयारी पाहिजे.” इतिहासकारांचे हे सर्व गुण
भारताचा इतिहास लिहित असताना आंबेडकरांनी आत्मसात करून, भारतीय इतिहासाला विशिष्ट तात्विक, धार्मिक,
अध्यात्मिक आणि वाङमयीन विळख्यातून मुक्त करून त्याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने
अभ्यास केला. भारताच्या सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासाचा
चिकित्सक अभ्यास करून, पारंपारिक मांडणी नाकारून नवीन पद्धतीची मांडणी केली. यावरून
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एक प्रभावी इतिहासकार होते. हे निर्विवाद सत्य कोणीही
नाकारू शकणार नाही.