शनिवार, २९ जुलै, २०१७

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: एक प्रज्ञावंत प्राध्यापक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: एक प्रज्ञावंत प्राध्यापक

                भारतीय इतिहासातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर होय. अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, राजनीतीज्ञ, कायदेपंडीत, इतिहासकार, पत्रकार, वकील, पुढारी, मंत्री अशा अनेक रुपात ते परिचित आहेत. सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक इत्यादी क्षेत्रात त्यांनी आपले प्रभुत्व सिद्ध केले आहे. महाविद्यालयात उच्च शिक्षणाचे अध्यापनकार्य करणाऱ्या अनेक प्राध्यापक मंडळींनी त्यांच्या उपरोक्त विविध पैलूंवर दूरगामी स्वरूपाचे संशोधन केले आहे. असे करीत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा एक प्राध्यापक होते, त्यांचे महाविद्यालयीन अध्यापनाच्या क्षेत्रात सुद्धा योगदान आहे. ही बाब मात्र प्राध्यापक मंडळी सपशेल विसरलेले दिसतात. कारण काही सन्माननीय अपवाद वगळता बऱ्याच प्राध्यापकांनी ‘आंबेडकरांनी एक प्राध्यापक म्हणून महाविद्यालयीन उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात दिलेल्या योगदान’ या विषयावर फारसे संशोधनकार्य केलेले आढळत नाही. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्राध्यापक म्हणून केलेल्या कार्याचे संशोधकीय अध्ययन करण्याचा प्रयत्न प्रस्तुत लघुशोधनिबंधात केला आहे.   
खाजगी शिकवणी:
               अमेरीकेहून एम. ए. पीएच. डी. असे उच्च शिक्षण घेवून आल्यानंतर आंबेडकरांना बडोदा संस्थानात नोकरीसाठी जावे लागले. परंतु तेथे अत्यंत वाईट  अनुभव आल्यामुळे ते लवकरच मुंबईला परतले. मुंबईत आल्यावर त्यांनी दरमहा ५० रुपये पगारावर दोन पारशी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जावून शिकविण्याचे काम सुरु केले. ते दोन पारशी विद्यार्थी म्हणजे त्यांचे पहिले विद्यार्थी आणि हे शिकवणी कार्य म्हणजे आंबेडकरांचे प्राध्यापकी क्षेत्रातील पहिले पाऊल होते.     
दावर्स कॉलेज:
           खाजगी शिकवणीमुळे आंबेडकरांचा आर्थिक प्रश्न थोड्याफार प्रमाणात सुटला होता. परंतु उर्वरित अभासक्रम पूर्ण करण्यासाठी लंडनला जायचे असल्यामुळे त्यांना पैशांची गरज होती त्यामुळे त्यांनी प्राध्यापक डी. आर. दावर यांच्या व्यापारी विषयांचे शिक्षण देणाऱ्या मुंबईतील दावर्स कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये अर्थशास्त्र, बँकेचे व्यवहार आणि व्यापारी कायदे या विषयाचे प्राध्यापक म्हणून दरमहा ५० रुपये पगारावर नोकरी पत्करली.  
सिडेनहॅम कॉलेज:
              याच सुमारास मुंबईतील सिडेनहॅम कॉलेजमधील अर्थशास्त्र विषयाच्या अस्थायी स्वरूपाच्या प्राध्यापकपदाची जाहिरात आली. आंबेडकरांना अशाच तात्पुरत्या नोकरीची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी या पदासाठी अर्ज केला. मुलाखतीनंतर १० नोव्हेंबर १९१८ रोजी दरमहा ४५० रुपये पगारावर आंबेडकरांची सिडेनहॅम कॉलेजमध्ये अर्थकारण (Political Economy) विषयाचे प्राध्यापक म्हणून सरकारने नियुक्ती केली. जवळ पैसे नसल्यामुळे आपल्या मित्रांकडून उसने पैसे घेवून त्यांनी प्राध्यापकपदाला शोभतील असे काही कपडे शिवून घेतले. महाविद्यालयातील आपले पहिले व्याख्यान परिणामकारक व्हावे म्हणून त्यांनी खूप तयारी केली. पहिल्या व्याख्यानाचे टिपण आपल्या मनासारखे होईस्तव त्यांनी तेरावेळा लिहून काढले होते. तरी सुद्धा व्याख्यानाला सुरुवात करतांना ‘माझ्या घशाला कोरड पडली आणि शरीर कंपायमान झाले होते. प्राध्यापकाचे काम आपल्या हातून कसे पार पडेल,’ असे त्यांना वाटू लागले. परंतु त्यांनी लगेच स्वतःला सावरून आपले पहिले व्याख्यान यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यांच्या पहिल्याच प्रभावशाली व्याख्यानामुळे विद्यार्थी खुश झाले. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. कॉलेजमध्ये शिकविताना मी रंगून जाई अशी आठवण आंबेडकर स्वतः सांगतात.
                           आंबेडकरांची सिडेनहॅम कॉलेजमधील व्याख्याने अतिशय मनोरंजक आणि प्रबोधक होत. त्यामुळे एक प्रज्ञावंत प्राध्यापक म्हणून लवकरच त्यांचा नावलौकिक वाढला. एवढा की, एल्फिन्स्टन, विल्सन आणि सेंट झेविअर इत्यादी महाविद्यालयातील इतिहास, अर्थशास्त्र आणि राज्यघटना या विषयाचे विद्यार्थी सुद्धा त्यांची व्याख्याने ऐकण्यासाठी सिडेनहॅम कॉलेजमध्ये येत असत आपले व्याख्यान संपल्यानंतर आंबेडकर इतर प्राध्यापाकांसोबत फारसा वेळ न दडवता ग्रंथालयात जावून विविध ग्रंथांचे वाचन करून टिपण काढत असत. सिडेनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असले तरी ते अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महार जातीतील असल्यामुळे एका गुजराती प्राध्यापकाने त्यांना पाणी पिण्याच्या भांड्याला स्पर्श न करण्याविषयी ताकीद दिली होती. परंतु व्याख्यान देतांना आपली सगळी मानहानी विसरून आंबेडकर तल्लीन होवून शिकवीत असत.
             आंबेडकरांच्या सिडेनहॅम कॉलेजमधील योगदानाविषयी धनंजय कीर असे म्हणतात की, सिडेनहॅम कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी ह्या नवागत प्राध्यापकाकडे पहिल्या-पहिल्याने फारसे लक्ष दिले नाही. हा महार प्राध्यापक आपणास काय शिकविणार, असे त्या स्पृश्य नि पुढारलेल्या समाजातील तरुणांना वाटे. व्यासंग, ज्ञाननिष्ठा नि विद्यादानाविषयी तळमळ असलेली प्राध्यापक व्यक्ती पुढे उभी राहिली म्हणजे काय घडू शकते ह्याचा अनुभव त्या विद्यार्थ्यांना नसावा. आंबेडकरांचा गाढ अभ्यास, सिद्धांताचे विस्तृत विवेचन करण्याची त्यांची हातोटी आणि त्यांची विचारप्रवर्तक शैली यांनी विद्यार्थ्यांच्या मनाची चांगलीच पकड घेतली. आंबेडकरांच्या ज्ञानप्रभेने ते अगदी दिपून गेले. आधुनिक काळास अनुरूप असा सुंदर पोशाख परिधान केलेल्या त्या तरुण प्राध्यापकाच्या डोळ्यातील तेज, त्याचे खोल विचार आणि तलस्पर्शी पांडित्य ह्यांचा लाभ आपल्यालाही व्हावा ह्या हेतूने इतर महाविद्यालयातील विद्यार्थी त्यांची संमती मिळवून त्यांच्या व्याख्यानास उपस्थित राहत असत. त्यावेळी प्राध्यापक आंबेडकरांनी आपल्या व्याख्यानासाठी टाचणांचा जो अवाढव्य संग्रह केला होता, त्यातून अर्थशास्त्रावर एक प्रचंड ग्रंथ निर्माण झाला असता. सिडेनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक बनल्यामुळे आंबेडकरांना ४५० रुपये इतका भरमसाट पगार मिळत असे तरीसुद्धा त्यांनी इम्पुव्हमेंट चाळीतील आपली खोली सोडली नाही. तेथेच ते आपल्या व्याख्यानाची टीपणे काढीत असत. महाविद्यालयात जाण्या-येण्यासाठी दोन आणे आणि खाण्यासाठी लोणी-पावाला एक आणा एवढाच खर्च ते रोज करीत. पुढे इ.स. १९२० मध्ये उर्वरित उच्चशिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला जायचे असल्याने आंबेडकरांना सिडेनहॅम कॉलेजमधील प्राध्यापकपदाचा नाईलाजास्तव राजीनामा द्यावा लागला.
बाटलीबॉय अकाउंटसी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट:
                                लंडनहून कायद्याचा अभ्यास पूर्ण करून आल्यानंतर  आंबेडकरांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरु केली. याच सुमारास सिडेनहॅम कॉलेजच्या प्राचार्यपदाची जागा रिक्त झाली होती. त्यासाठी आंबेडकरांनी प्रयत्न केले. परंतु त्यात त्यांना यश काही आले नाही. मात्र एलफिस्टन कॉलेजमध्ये त्यांना प्राध्यापक म्हणून काम करता येईल, असे शिक्षणमंत्र्यांनी सुचविले असता आपल्या सामाजिक कार्यात व्यत्यय येईल म्हणून त्यांनी शिक्षणमंत्र्यांचा प्रस्ताव  नाकारला. परंतु आर्थिक टंचाईमुळे आंबेडकरांनी मुंबईतील बाटलीबॉय अकाउंटसी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या सकाळी आणि संध्याकाळी चालणाऱ्या संस्थेमध्ये १९२५ ते १९२८ पर्यंत मर्कटाईल लॉ या विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. तेथे त्यांना दरमहा २५० रुपये पगार मिळत होता.      
लॉ कॉलेज:
         सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आंबेडकरांनी आपले प्रस्थ निर्माण केले होते. परंतु आर्थिक क्षेत्रात मात्र अजूनपर्यंत त्यांचा जम बसला नव्हता. बाटलीबॉय अकाउंटसी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात त्यांचे भागत नव्हते. त्यामुळे मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयात बदली प्राध्यापकपदाची जाहिरात येताच त्यांनी त्या पदासाठी अर्ज केला. इ.स. १९२८ पासून त्यांची शासकीय विधी महाविद्यालयात निर्बंधशास्त्राचे बदली प्राध्यापक म्हणून नोकरी नेमणूक झाली. याच काळात भारतात आलेल्या सायमन कमिशनला सहकार्य करणाऱ्या समितीतही त्यांची निवड झाली होती. त्यामुळे संतापलेल्या काही विद्यार्थ्यांनी भर वर्गात त्यांचा अपमान केला होता. तरी सुद्धा आंबेडकरांनी व्याख्यानातून आपले चित्त विचलित होवू दिले नाही. विधी महाविद्यालयातील त्यांच्या योगदानाविषयी धनंजय कीर असे म्हणतात की, आंबेडकरांनी विद्यार्थ्यांच्या मनावर आपल्या ज्ञानपरायणतेचा चिरंतन असा ठसा उमटविला. विद्यार्थ्यांना त्यांनी अगदी मोहित केले होते. आपल्या ठायी असलेली ज्ञानपरायणता, ज्ञानाची सखोलता व प्रगल्भता या गुणांमुळे ते आपल्या विद्यार्थीवर्गाला घटनात्मक निर्बंध मोठ्या कुशलतेने नि विचारप्रवर्तक रीतीने शिकवीत. आंबेडकर मार्च १९२९ पर्यंत विधी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
                          जून १९३५ मध्ये मुंबई सरकारने आंबेडकरांची विधी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नेमणूक केली. या काळात ते सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि शैक्षणिक अशा सर्वच आघाड्यांवर एकाच वेळी लढत असल्यामुळे विधी महाविद्यालयात एक प्राचार्य म्हणून प्रशासकीय कार्य करीत असताना ते खूप थकत असत तरीसुद्धा महाविद्यालयाच्या निरनिराळ्या उपक्रमात ते हिरिरीने भाग घेत. कायद्याचे शेकडो ग्रंथ खरेदी करून त्यांनी महाविद्यालयाचे ग्रंथालय सुसज्ज बनविले होते. विधी महाविद्यालयाची स्वतंत्र इमारत होण्यामागे, महाविद्यालय पूर्णवेळ होण्यामागे आणि त्यात स्वतंत्र रजिस्ट्रारची नेमणूक होण्यामागे आंबेडकरांचेच प्रयत्न कारणीभूत होते. विधी महाविद्यालयाची प्रतिष्ठा वाढविण्याच्या दृष्टीने त्यांनी मुंबई सरकारला एक योजना सुद्धा सादर केली होती. त्यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदर निर्माण झाला. महाविद्यालयाच्या मासिकाच्या जानेवारी १९३३ च्या अंकात, आंबेडकरांनी प्राचार्य म्हणून केलेल्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली होती. याच मासिकात प्राचार्य आंबेडकरांचा ‘मुंबई प्रांतातील नैर्बंधिक शिक्षणाच्या सुधारणेविषयी विचार’ हा लघुशोध निबंध प्रकाशित झाला होता. १९३८ मध्ये त्यांनी विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा राजीनामा दिला. विद्यार्थ्यांना ज्यांच्या ज्ञानाविषयी व कर्तुत्वाविषयी आदर वाटत आहे अशा प्राचार्यास महाविद्यालय मुकले आहे. असे कृतज्ञतापूर्वक उद्गार महाविद्यालयाच्या मासिकाने व्यक्त केले होते.   
खालसा महाविद्यालय:
           मुंबईतील खालसा महाविद्यालयाच्या उभारणीत सुद्धा आंबेडकरांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या धर्मांतर घोषणेनंतर शीखांनी त्यांना आपल्या धर्मात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्याचाच एक भाग म्हणजे खालसा कॉलेज होय. शिखांच्या मदतीने दलितांच्या उच्च शिक्षणासाठी या कॉलेजची स्थापना करण्यात आली होती. आंबेडकरांच्या शब्दाखातर अनेक विद्वान प्राध्यापक मंडळी या महाविद्यालयात रुजू झाली होती. महाविद्यालयाची रोमन स्थापत्य शैलीतील इमारत  आंबेडकरांच्याच पुढाकाराने बांधण्यात आली होती.     
सिद्धार्थ महाविद्यालय:
           दलित वर्गामध्ये उच्च शिक्षणाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आंबेडकरांनी इ.स. १९४५ मध्ये ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून आधुनिक साहित्य आणि उत्तम प्राध्यापकवर्ग यांनी संपन्न असलेले सिद्धार्थ महाविद्यालय त्यांनी मुंबईत सुरु केले. महाविद्यालयास भारतीय संस्थानांकडून आर्थिक सहकार्य मिळावे म्हणून त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली होती. सिद्धार्थ महाविद्यालयात ते प्राचार्य किंवा प्राध्यापक नसले तरी संस्थापक म्हणून महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीत त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. महाविद्यालयातील अनेक कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयाचे मार्गदर्शन करीत. आंबेडकरांच्या पुढाकाराने राजकारणात प्रत्यक्ष भाग घेणाऱ्या लोकांसाठी सिद्धार्थ महाविद्यालयात राजकीय प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात वक्तृत्वसंघ आणि संसदीयसंघ स्थापन करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. मुंबईत असताना सिद्धार्थ महाविद्यालयाच्या प्रत्येक कार्यक्रमात ते सक्रीय सहभागी होत असत. महाविद्यालयात युद्धशास्त्राचे शिक्षण देणारा विभाग सुद्धा सुरु करावा अशी त्यांची इच्छा होती. देशविदेशातील उत्तमोत्तम ग्रंथ त्यांनी सिद्धार्थ महाविद्यालयात मागवून घेतले होते. एवढेच नाहीतर स्वतःचा अमुल्य असा ग्रंथसंग्रह सुद्धा त्यांनी महाविद्यालयास भेट दिला होता. आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे सिद्धार्थ महाविद्यालय अल्पावधीतच नावारूपास आले होते.    
मिलिंद महाविद्यालय:
         इ.स. १९५० मध्ये आंबेडकरांनी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. या महाविद्यालयात सुद्धा ते प्राचार्य किंवा प्राध्यापक नसले तरी संस्थापक म्हणून महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीत त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. निजामाकडून जमीन विकत घेवून त्यांनी स्वतःच्या देखरेखी महाविद्यालयाची भव्य वास्तू निर्माण केली. शिक्षण क्षेत्रातील नावाजलेल्या लोकांची महाविद्यालयात नेमणूक केली. या संदर्भात ते म्हणतात की, माझ्या राजकीय पक्षात मी कोणाचीही नेमणूक करेन पण शिक्षणसंस्थात मात्र गुणी, ज्ञानी आणि लायक व्यक्तीचीच नियुक्ती करेन. त्यावेळी मी जात, धर्म, पंथ आणि प्रांत यांचा विचार करणार नाही. महाविद्यालयाच्या ग्रंथालयासाठी त्यांनी उत्तमोत्तम ग्रंथ आणि प्रयोगशाळेसाठी उत्तमोत्तम उपकरणे त्यांनी मागविले होते. त्यांच्याच पुढाकाराने महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी बोधी मंडळाची स्थापना करण्यात आली होती. औरंगाबादला आल्यावर ते बरेचदा महाविद्यालय परिसरातील निवासस्थानी वास्तव्य करीत, महाविद्यालयातील प्रत्येक कार्यक्रमात सक्रीय सहभागी होवून विद्यार्थ्यांना विविध विषयाचे मार्गदर्शन करीत, कधीकधी विद्यार्थ्यांच्या वर्गास उपस्थित राहत, अनेकदा प्राध्यापकांना अध्ययन अध्यापनाविषयी काही सूचना सुद्धा करीत असत.       
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन:
        आंबेडकरांनी विविध प्रसंगी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले. पुण्यातील अहिल्याश्रमातील विद्यार्थी परिषदेसमोर बोलतांना, विद्यार्थी आपले कर्तव्य आणि जबाबदारी कशी पार पाडतात यावरच समाजाचे भवितव्य अवलंबून आहे. तर ठाणे येथील अस्पृश्य विद्यार्थी वसतिगृहात झालेल्या कार्यकमात बोलतांना, विद्यार्थ्यांनी आपली लायकी वाढविण्याचे कार्य करीत असताना राजकारणात भाग घेवू नये, स्वावलंबनाचा मार्ग अनुसरावा, आयुष्यात आपण पुढे आल्याशिवाय राहणार नाही, असा निश्चय केला तरच तुम्हाला यश मिळेल. असे मार्गदशन केले होते. पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी सलग दोन तास संघराज्याविषयी व्याख्यान  दिले होते. मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये तंत्रशिक्षणाच्या उपयोगितेविषयी संबोधित केले होते. मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ‘आधुनिक विद्यार्थ्यांचे प्रश्न’ या विषयावर भाष्य केले होते. एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमात त्यांनी ‘लोकशाहीचे भारतातील भवितव्य’ या विषयावर मार्गदर्शन केले होते. लखनौ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ‘देशाचा लोकाभिमुख राज्यकारभार’ या विषयावर संबोधित केले होते.  तर कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात, ज्ञान हाच मनुष्याच्या जीवनाचा पाया आहे. विद्यार्थ्यांनी बौद्धिक शक्तीचे संवर्धन करण्यासाठी आणि आपल्या बुद्धीला चालना देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले पाहिजे. आपली विचारशक्ती वाढवून मिळालेल्याज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी केला पाहिजे. असा संदेश आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना दिला होता.
विद्यापीठीय कार्य:
         आंबेडकरांनी मुंबई विद्यापीठाच्या बी. ए., एल. एल. बी., एल. एल. एम. अशा विविध परीक्षांसाठी परीक्षक म्हणून सुद्धा काम केले. एवढेच नाहीतर १९३३ ते १९५० या कालखंडात ते मुंबई विद्यापीठाचे फेलो, तसेच कला आणि विधी विभागाचे सदस्य होते, तर १९३३ ते १९५० या कालखंडात वाणिज्य विभागाचे सदस्य होते, १९३५ ते १९३७ या काळात मुंबई विद्यापीठाच्या अकॅडेमिक कॉन्सिल व सिनेटचे सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केले. कायदे मंडळाचे सदस्य असताना, मुंबई विद्यापीठ हे लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर विकसित करण्याची दुरुस्ती आंबेडकरांनी सुचविली होती.
प्राध्यापकांविषयीचे विचार:
        आंबेडकर हे स्वतः एक प्राध्यापक असल्यामुळे, प्राध्यापकांच्या कार्याची जाणीव असल्यामुळे प्राध्यापक वर्गांकडून त्यांना अनेक अपेक्षा होत्या. परंतु भारतातील प्राध्यापक मंडळी युरोपियन प्राध्यापकांसारखे मुलगामी स्वरूपाचे संशोधन करीत नाहीत. त्यांच्याकडे तशी विद्वत्ता किंवा साधनसामग्री नाही असे नाही तर, संशोधनकार्याची त्यांना आवडच नाही, थोडेसे रुपये मिळवावेत व सुखाने जीवन जगावे या पलीकडे आमच्या प्राध्यापक मंडळीना महत्त्वाकांक्षाच नाही, यामुळेच पाठ्यपुस्तकांवरील टिपणे काढण्याव्यतिरिक्त त्यांच्या हातून काही भरीव कार्य होत नसावे, अशी खंत त्यांना वाटते. प्राध्यापकांनी संशोधन कार्यात, अध्ययन आणि अध्यापानाच्या कार्यात स्वतःला झोकून द्यावे, इतके की आपल्या घराकडे बघायला सुद्धा त्यांना मुळी सवडच नसावी, ते काम त्यांनी संपूर्णपणे आपल्या पत्नीवरच सोपवावे. याशिवाय प्राध्यापकांनी भलतीच कामे अंगावर घेवू नये, अध्यापन, अध्ययन आणि संशोधन या तीन गोष्टींखेरीज प्राध्यापकांनी दुसरे कोणतेही काम करता कामा नये” अशी अपेक्षा ते व्यक्त करतात. परंतु भारतातील विद्यापीठातील शिक्षणपद्धतीमुळे आपल्याकडे उत्तमोत्तम प्राध्यापक निर्माण होणे कठीण झाले आहे. सर्व प्राध्यापकांना विद्यापीठाने ठरवून दिलेला समान पगार मिळत नाही. सारखेच कार्य करीत असले तरी सरकारी व विद्यापीठातील प्राध्यापकांना खाजगी महाविद्यालयातील प्राध्यापकांपेक्षा जास्त पगार मिळतो. त्यामुळे सुद्धा पगाराची तक्रार नाहीशी झाली की अध्यापन, अध्ययन आणि संशोधन कार्य झपाट्याने सुरु होईल अशी आशा आंबेडकरांना वाटते.
मूल्यमापन:
      ‘प्राध्यापकाची नोकरी करून ग्रंथ आणि विद्यार्थ्यांच्या सानिध्यात संपूर्ण आयुष्य व्यतीत करावे.’ अशी आंबेडकरांची मनस्वी इच्छा होती. परंतु आपले संपूर्ण आयुष्य दलित शोषित पिडीत समाजाच्या उत्थानासाठी समर्पित केल्यामुळे त्यांना एक प्राध्यापक म्हणून आयुष्य जगता आले नाही तरी सुद्धा आपल्या आयुष्याच्या उमेदीच्या कालखंडातील सोळा वर्षे त्यांनी प्रत्यक्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले आणि त्यानंतर खालसा महाविद्यालय, सिद्धार्थ महाविद्यालय, मिलिंद महाविद्यालयाच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत महाविद्यालयीन कार्यास जुळून राहिले. अध्ययन, अध्यापन आणि संशोधन हे प्राध्यापकांचे कार्य ते आयुष्यभर करीत होते. म्हणून ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एक प्रज्ञावंत प्राध्यापक होते आणि महाविद्यालयीन अध्ययन, अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात त्यांनी अमुल्य असे योगदान दिले.’ हे निर्विवाद सत्य कोणीही नाकारू शकणार नाही.