प्रस्तावना:
राष्ट्रवाद ही एक व्यापक
संकल्पना आहे. ही एक प्रकारची सामुहिक भावना असून जिचा आधार विभिन्न प्रकारची एकता
व समानता आहे. तिचा संबंध प्रामुख्याने राजकीय शक्तीची प्राप्ती व विकासाशी असतो.
समान शासन, सर्व व्यक्तींना एकत्रित करणारे समान विशिष्ट बंध, विशिष्ट भूप्रदेश,
समान हितसंबंध, इत्यादी राष्ट्रवादाची वैशिष्टे सांगता येतील. इ. एच. कार यांच्या
मते, समाज जीवनाच्या एका विशिष्ट अवस्थेत ‘राष्ट्रवाद’ ही संकल्पना विकसित होत
जाते. परंतु स्वातंत्रपूर्व भारतात ब्रिटीशांचा द्वेष, गांधीजींची भक्ती किंवा
कॉंग्रेसच्या अनुनयालाच राष्ट्रवाद असे समजल्या जाई. ह्याआधारे इतिहासात अनेक
महापुरुषांना राष्ट्रवादी किंवा राष्ट्रद्रोही ठरविण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या
राष्ट्रवादावरही वरील निकषानुसारच प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते. वास्तविक
पाहता आंबेडकर हे प्रखर राष्ट्रवादी होते. त्यांच्या जीवनकार्याचा वस्तुनिष्ठपणे
अभ्यास केल्यास याची प्रचीती येते. “माणूस राष्ट्रीय वृत्तीचा असला की तो कॉंग्रेसवालाच असतो काय? कॉंग्रेसमध्ये
नसूनही माणूस राष्टीय वृत्तीचा असतो. मी कोणाही कॉंग्रेसवाल्यापेक्षा थोर वृत्तीचा
माणूस आहे.” या शब्दात स्वतःचा राष्ट्रवाद सिध्द
करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रवाद समजून घ्यायचा असेल तर ‘ब्रिटीश
द्वेष म्हणजे राष्ट्रवाद, गांधी भक्ती म्हणजे राष्ट्रवाद किंवा कॉंग्रेसचा अनुनय
म्हणजे राष्ट्रवाद’ ही राष्ट्रवादाची संकुचित व्याख्या बाजूला ठेवून व्यापक दृष्टीकोनातून
विचार करावा लागेल.
आंबेडकरांचे राष्ट्रवादी विचार:
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी होते. त्यांच्या अनेक भाषणातून
तसेच साहित्यातून त्यांचे राष्ट्रवादी विचार प्रतीत होतात. ‘मूकनायक’ या आपल्या वृत्तपत्रात
स्वराज्याविषयी चर्चा करतांना ‘स्वराज्य कोणाचे व ते कशासाठी’ असा प्रश्न ते उपस्थित करतात. दि. ९
डिसेंबर १९४५ रोजी मनमाड येथील भाषणात आंबडेकर म्हणतात, “स्वराज्य आम्हालाही पाहिजे. प्रश्न हा आहे की, तुम्ही जे स्वराज्य
मागता त्या स्वराज्यात राज्य कोण करणार? आणि कोणावर करणार? हिंदुनी अस्पृश्यांवर
राज्य करायचे असे असेल तर तुमचे स्वराज्य म्हणजे आमची गुलामगिरीच ना!” म्हणूनच स्वातंत्र्य, माणुसकी, आणि समान हक्क मिळतील तेच खरे स्वराज्य
असे ते म्हणतात. यावरून आंबेडकरांना सर्वसमावेशक राष्ट्रवाद अपेक्षीत होता असे
लक्षात येते.
घटना समितीतील भाषणात
आंबेडकर म्हणतात की, “जो समाज हजारो
जाती, पोटजातींनी विच्छिन्न झाला आहे तो राष्ट्र या संज्ञेस पात्र कसा होईल?
सामाजिक आणि मानसिक लोकशाहीचे आपले उद्दिष्ट साकार होणार नाही. जाती राष्ट्रविरोधी
आहेत, त्यासाठी जातीभेद नष्ट केल्याशिवाय आम्ही खऱ्या अर्थाने राष्ट्र बनवू शकणार
नाही.” नागपुरातील अस्पृश्यांच्या राजकीय हक्क परिषदेतील भाषणात, “अल्पसंख्य वर्गांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, आज आपण अनेक पंथ आणि असंख्य
जाती यांनी कितीही विभागलो असलो तरी आपले ध्येय ‘एकात्म भारत’ आहे. म्हणून
प्रत्येक अल्पसंख्यांक वर्गाने आपल्या संरक्षणात्मक तरतुदीची मागणी करतांना ती
आपल्या एकात्म भारताच्या ध्येयाला मारक होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.” असे विचार त्यांनी मांडले. या भाषणातील ‘एकात्म भारत’ म्हणजे त्यांच्या
शुध्द राष्ट्रवादाचे द्योतक होय. सायमन कमिशनच्यावेळी आंबेडकरांनी काढलेल्या
मतपत्रिकेतील “आज जर राष्ट्राला कोणत्या गोष्टीची जरुरी असेल, तर ती जनतेच्या मनात
एकराष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्याची होय. आपण हिंदू, मुसलमान, सिंधी व कानडी
अशा अलगपणाच्या भावना निर्माण करण्यापेक्षा आपण प्रथम भारतीय व नंतरही भारतीयच
आहोत. अशी भावना निर्माण केली पाहिजे.” या विधानावरून आंबेडकरांचा राष्ट्रवाद जात, धर्म, पंथ, वंश यापलीकडील
होता असे दिसून येते.
‘यंग इंडिया’ च्या दि. ९ मार्च १९२२ रोजीच्या अंकात आंबेडकर म्हणतात
की, “राष्ट्राचे ध्येय स्वराज्य आहे. अहिंसा नव्हे या मताला माझी पूर्ण
संमती आहे. अहिंसेच्या मार्गाचा अवलंब केल्याशिवाय स्वराज्य प्राप्ती होणे अशक्य
आहे. परंतु देश पारतंत्र्याच्या बेडीत खितपत राहण्यापेक्षा अत्याचाराच्या
मार्गानेही स्वराज्य मिळविणे मी पत्करेल.” ब्रिटीश सरकारवर टीका करतांना आंबेडकर गोलमेज परिषदेत असे म्हणतात
की, “ब्रिटीश सरकार जोपर्यंत या देशात आहे तोपर्यंत आमच्या हातात राजकीय
सत्ता येणे शक्य नाही.” आंबेडकरांच्या
गोलमेज परिषदेतील कामगिरीविषयी ‘संडे क्रोनिकल’ या वृत्तपत्राने “आंबेडकर हे हाडाचे राष्ट्रभक्त आहेत. कट्टर साम्राज्यवादी ब्रिटीश
मुत्सद्यांच्या लाघवी भाषणाला न भूलता आपली खरी राष्ट्रीय वृत्ती ठरवून देण्यासठी
त्यांना अनेक प्रकारच्या झगडावे लागले आहे.” असे मत ‘व्यक्त केले होते. तर ‘इंडियन मिरर’ या वृत्तपत्रात “आंबेडकर हे खरे राष्ट्रभक्त आहे. भारताला स्वयंशाषित सरकार प्राप्त
व्हावे असे त्यांना उत्कटतेने वाटत असते.” असे गौरवोद्गार आंबेडकरांविषयी काढले होते. दि. २२ जुलै १९४४ रोजी मुंबईतील भाषणात आंबेडकर म्हणतात की, “आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे या मागणीवर इतर कोणाही पेक्षा मी
जास्त ठाम आहे.” पतियाळा येथील भाषणात, “देशाच्या
आपत्तीच्या प्रसंगी आम्ही आघाडीवर राहू.” असे उद्गार आंबेडकर काढतात. घटनेच्या समारोप प्रसंगी, “राष्ट्रीय स्वातंत्र्याकरिता आपल्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब
असेपर्यंत आपण लढले पाहिजे.” असे विचार मांडले होते.
आंबेडकरांच्या ह्या सर्व वक्तव्याचा परामर्श घेतल्यास त्यांचा शुद्ध राष्ट्रवाद
दृष्टीस पडतो.
आंबेडकरांचे राष्ट्राप्रती योगदान:
आपल्या संपूर्ण आयुष्यात आंबेडकरांनी देशाशी
कधीही प्रतारणा केली नाही. १९२३ मध्ये आपल्या ‘Problem
of Rupees’ या ग्रंथात आंबेडकरांनी
ब्रिटीशांच्या आर्थिक धोरणामुळे भारतीय व्यापाऱ्यांचे कसे नुकसान झाले? हे सप्रमाण
दाखवून दिले. ‘Administration and Finance of the East India
Company’ या ग्रंथात आंबेडकरांनी १८५७ च्या
उठावामुळे कंपनीवर झालेले कर्ज ब्रिटीशांनी स्वतः न फेडता भारतीयांवर लादल्यामुळे
त्यांच्यावर जहाल टीका केली होती. ‘Thoughts on
Pakistan'
हा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहून आंबेडकरांनी
राष्ट्राप्रती आपले द्रष्टेपण सिध्द केले होते. भारतीय राज्यघटना लिहून त्यांनी
देशाच्या विकासात अविस्मरणीय योगदान दिले. राज्यघटनेतील पानापानातून आंबेडकरांचा
राष्ट्रवाद दिसून येतो. सायमन कमिशनसमोर त्यांनी संपूर्ण स्वराज्याची मागणी केली
होती. विधिमंडळावर नियुक्ती झाल्यानंतर ब्रिटीश शासनाची स्तुती करणाऱ्या एम. सी.
राजा यांना स्तुती करण्यापेक्षा मिठावर कर लादणाऱ्या ब्रिटिश सरकारला जाब विचारा
असे आंबेडकरांनी त्यांना सुनविले होते. गोलमेज परिषदेतील आंबेडकरांची कामगिरी ही
राष्ट्रीय स्वरुपाची होती. “तुम्ही
ठरवावे व हिंदी लोकांनी ऐकावे असा हा काळ नाही. जर राज्यघटना राबवावी असे तुम्हाला
वाटत असेल तर लोकांची संमती हीच नवीन राज्यघटनेची कसोटी आहे.” असे त्यांनी गोलमेज परिषदेत ब्रिटीशांना ठणकावून सांगितले होते.
‘राज्यपालांची कार्यकारी
मंडळे भारतीयांच्या प्रगतीची चिंता वाहू शकत नाही. उलट त्यांची धोरणे
एतद्देशियांच्या गरजा व दुखः दूर करण्यासाठी आखली नव्हती.’ असा हल्ला त्यांनी
ब्रिटीशांच्या राजनीतीवर चढविला होता. मुंबई विधानसभेत भाषिक प्रांतरचनेला विरोध
करून राष्ट्रवादासाठी ‘भारतीय’ ही भावना अधिक महत्वाची असल्याचे प्रतिपादन
आंबेडकरांनी केले होते. वि. दा. सावरकरांची विनाशर्त मुक्तत्ता करावी म्हणून मुंबई
विधिमंडळात ठराव मांडला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस मुंबईस आले असता त्यांनी भारताच्या
भवितव्याविषयी आंबेडकरांशी चर्चा केली होती. लाल लजपतराय आणि भगतसिंग यांच्या निधनाने व्यथित होवून आंबेडकरांनी आपल्या ‘जनता’
ह्या वृत्तपत्रात श्रद्धांजली व्यक्त केली होती. कॉंग्रेसच्या चिरनेर जंगल
सत्याग्रहींची बाजू न्यायालयात मांडून ब्रिटीश सरकारविरुद्ध आवाज उठविला होता.
सरकार नियुक्त सभासद असूनही ते ब्रिटीश सरकारवर प्रखरपणे टीका करतात म्हणून मुंबईचे
राज्यपाल लेस्ली विल्सन यांची आंबेडकरांशी वादावादी झाली होती. १९४२ च्या चळवळीत गांधी, नेहरू आदी नेत्यांना अटक झाली होती. त्यांना
‘क’ वर्ग देवून अपमानित करण्याचे षड्यंत्र ब्रिटीश करीत होते. आंबेडकरांनी त्यास
विरोध करून या नेत्यांना राजबंदी म्हणून सन्मानपूर्वक वागणूक दिली नाही तर आपण
राजीनामा देवून बाहेर पडू असे त्यांनी निर्धारपूर्वक सांगितले होते.
भारताची शासनव्यवस्था प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशिक्षित
संसदपटू तयार व्हावे म्हणून, आंबेडकरांनी मुंबईत ‘ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू
पॉलिटिक्स’ ही प्रशिक्षण संस्था स्थापन केली होती. मुंबई विधिमंडळातील त्यांनी वेळोवेळी मांडलेले ठराव, केलेले कार्य, केंद्रीय
विधिमंडळातील त्यांची भूमिका, १९४२-४७ याकाळात आंबेडकरांकडे श्रम, जलसिंचन, आणि
उर्जा खात्याची कॅबीनेट मेंबर म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. या पदावर
असताना त्यांनी आर्थिक नियोज, जल आणि विद्युत साधनसामग्रीच्या विकासासाठी केलेले
कार्य म्हणजे त्यांच्या राष्ट्राकार्याचे उदाहरण होय. ब्रिटीश भारतात मजूरमंत्री
म्हणून केलेले कार्य असो की स्वातंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून केलेले
कार्य असो. त्यांची प्रत्येक कृती त्यांच्यातील शुध्द राष्ट्रवादाची साक्ष देते.
१९५२ मध्ये ‘न्यूजविक’ च्या प्रतिनिधीशी बोलतांना आंबेडकर म्हणतात की, “मी प्रथम भारतीय आहे. सत्ताधारी लोकांशी माझे अनेक खटके उडाले. राजकीय
संघर्ष झाला. पण हे आमचे कौटुंबिक भांडण म्हणून मी परदेशात भारताबद्दल कडवट बोलणार
नाही. देशहित प्रथम. मी माझ्या देशाशी कधीही द्रोह करणार नाही.” १९५६ मध्ये आंबेडकरांनी परदेशातील ख्रिश्चन वा मुस्लीम धर्म न
स्वीकारता भारतभूमीतील बौध्द धम्माची दीक्षा घेतली. तो सुद्धा एकप्रकारे त्यांचा
राष्ट्रवादाच होता. अशा अनेक प्रसंगातून आंबेडकरांची राष्ट्रनिष्टा प्रतीत होते.
आंबेडकरांच्या राष्ट्रवादाचा मूलाधार:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
हे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी होते. त्यांचा राष्ट्रवाद इतर तत्कालीन
नेत्यांपेक्षा वेगळा होता. भारताच्या स्वातंत्र्याबद्दलची त्यांची भूमिका ही
ब्रिटीशांकडून राजकीय सत्तेचे हस्तांतरण भारतीयांकडे करणे एवढ्यापुरती मर्यादित
नव्हती. तर स्वातंत्र, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, लोकतंत्र, व्यक्तीस्वातंत्र्य,
सहजीवन, सहअस्तित्व, समान वंश, समान भाषा, एकात्मता आणि सामाजिक न्याय इत्यादी तत्वांवर
आधारित जातीविरहित, वर्गविरहित आणि लोकशाहीप्रणीत नवसमाजाची निर्मिती हा त्यांच्या
राष्ट्रवादाचा मूलाधार होता. भारतातील संपूर्ण समाजाला पूर्ण स्वातंत्र्य मिळावे
अशी त्यांची अपेक्षा होती. त्यासाठी त्यांना आयुष्यभर स्वकियांशी तसेच परकीयांशी
संघर्ष करावा लागला. दलीतोद्धाराचे कार्य करीत असतांना सुद्धा त्यांनी देश हितालाच
प्रथम प्राधान्य दिले यासंदर्भात ते म्हणतात की, “आपण आपल्या लोकांचे, समाजाचे हित पाहतो. ते तर पाहिलेच पाहिजे, पण
त्याचबरोबर आपल्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य कसे राखून ठेवता येईल याचाही विचार
केला पाहिजे. अगोदर मुसलमानांनी व नंतर इंग्रजांनी आपले स्वातंत्र्य आपल्यापासून
हिरावून घेतले होते. पण आता पुन्हा परकियांच्या गुलामगिरीत पडण्याचा प्रसंग
आपल्यावर आला तर ती गोष्ट अत्यंत दुर्दैवाची ठरेल. म्हणून या देशाच्या
स्वातंत्र्याचे संरक्षण हेही प्रत्येकाने आपले कर्तव्य मानले पाहिजे.”
निष्कर्ष:
केवळ ब्रिटीशांचा
द्वेष म्हणजे राष्ट्रवाद, गांधीजींची भक्ती म्हणजे राष्ट्रवाद किंवा कॉंग्रेसचा
अनुनय म्हणजे फक्त राष्ट्रवाद नाही तर राष्ट्राप्रती आदर ठेवून राष्ट्राविकासासाठी
प्रामाणिकपणे कार्य करणे, आपली प्रत्येक कृती राष्ट्राभिमुख असणे, व्यक्तिविकास
साधणे, समाजविकास साधणे पर्यायाने राष्ट्रविकास साधणे म्हणजेच राष्ट्रवाद होय. किंबहुना
तोच खरा राष्ट्रवाद आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या निकषातून डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेतल्यास त्याचा राष्ट्रवाद सुद्धा उच्च
कोटीचा होता. असे म्हणावे लागते. या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “मी राष्ट्रद्रोही आहे, देशद्रोही आहे, असे आज जे लोक म्हणत आहेत, ते
भविष्यकाळात माझ्या कामगिरीविषयी बोलल्याशिवाय राहणार नाहीत. माझी खात्री आहे की,
पुढील पिढीला ‘मी राष्ट्राची चांगली कामगिरी केली.’ असे म्हणावे लागेल.