प्रस्तावना:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९२०
ते १९५६ या कालखंडात दलित वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेली चळवळ
आधुनिक भारताच्या इतिहासात आंबेडकरी चळवळ म्हणून ओळखल्या जाते. ही चळवळ
प्रामुख्याने दलीतोद्धाराच्या उद्देशाने प्रेरित असली तरी ती संपूर्ण मानवी हक्काची चळवळ होती. म्हणूनच
हिंदू, बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन, पारशी इत्यादी धर्मातील सुधारणावादी व्यक्तींचा
ह्यात सक्रीय सहभाग दिसून येतो. एवढेच नाहीतर सामाजिक सुधारणांच्या बाबतीत अत्यंत मागास समजल्या जाणा-या
मुस्लीम धर्मातील पुरोगामी लोकांनी सुद्धा ह्या चळवळीत आपले अमुल्य असे योगदान
दिले आहे. परंतु आंबेडकरी चळवळ ही फक्त दलितांची चळवळ आहे आणि तीत केवळ महारांचाच
सहभाग आहे.
अशा पूर्वग्रहांमुळे आंबेडकरी चळवळीतील महारेतरांचे विशेषता
मुस्लिमांचे कार्य इतिहासात कायम दुर्लक्षिल्या गेले. म्हणूनच मुस्लीम धर्मियांचे आंबेडकरी चळवळीतील
कार्य उजेडात आणणे हा प्रस्तुत शोधनिबंधाचा उद्देश आहे.
वृत्तपत्र चळवळ:
आपल्या चळवळीच्या प्रचार-प्रसारासाठी एक प्रभावी माध्यम म्हणून आंबेडकरांनी
आयुष्यभर अनेक वृत्तपत्रे चालविली. त्यांच्या मूकनायक, समता आणि प्रबुद्ध भारत इ. वृत्तपत्रांमध्ये मुस्लिमांचे
फारसे योगदान दिसून येत नसले तरी, बहिष्कृत भारत या वृत्तपत्राच्या आर्थिक सहकार्यासाठी
स्थापन करण्यात आलेल्या ‘बहिष्कृत भारत प्रेस फंडास’ एम. आर. मलबारी, सय्यद अब्बास सय्यद अहमद,
अब्दुल्लाभाई सजनाभाई इत्यादींनी निधी देवून या वृत्तपत्राच्या उभारणीस
हातभार लावला होता. ‘बहिष्कृत भारत’ नंतर आंबेडकरांनी सुरु केलेल्या ‘जनता’ या
वृत्तपत्राच्या आर्थिक सहकार्यासाठी आंबेडकरांचे एक मुस्लीम सहकारी महम्मद झकेरिया मणियार यांनी दि. १८ नोव्हेंबर १९३२
रोजी मुंबईतील कामाठीपुरा येथील आपल्या अध्यक्षतेखालील सभेत ‘जनता’चे वर्गणीदार
होण्याचा ठराव पारित केला होता. मुस्लीम धर्मीयांमध्ये असलेल्या सुशिक्षिततेच्या
कमी प्रमाणामुळे कदाचित परंतु आंबेडकरी वृत्तपत्रात इतर महारेतरांप्रमाणे त्यांचे
लेखनकार्य दिसून येत नाही.
सामाजिक चळवळ:
आंबेडकरी सामाजिक चळवळीच्या अगदी प्रारंभापासूनच मुस्लिमांचा सहभाग आढळून
येतो. १९२० साली झालेल्या माणगाव परिषदेत, सभा आयोजन समिती तसेच स्वागत समितीत
कासीम मास्तर यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. तर १९२० मधील नागपूरची भारतीय बहिष्कृत परिषद
यशस्वी होण्याकरिता खानबहादूर मलक साहेब, इस्लाम साहेब इ. मुस्लीमांनी बरेच प्रयत्न
केले होते. दलितवर्गात स्वाभिमान जागृतीसाठी आंबेडकरांनी स्थापन
केलेल्या बहिष्कृत हितकारिणी सभेचे उपअधिपती असलेले मेयर निस्सीम हेही कदाचित मुसलमान असावेत असे वाटते.
महाड
येथे भरलेल्या कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेत दलितांनी चवदार तळ्याचे पाणी
बाटविल्यामुळे बिथरलेल्या सवर्णांनी केलेल्या मारहाणीप्रसंगी अनेक स्थानिक
मुसलमानांनी दलितांना स्वतःच्या आश्रय घरी देवून त्यांचे प्राण वाचविले होते. काजीसाहेब नावाच्या पुरोगामी विचाराच्या मुस्लीम
पुढाऱ्याने तर चाळीसगाव येथिल सभेत महाडमधील अत्याचाराच्या जाहीर निषेध केला होता. महाडच्या सत्याग्रहात तर मुस्लीम बांधवांची महत्वाची भूमिका बजावली होती.
सत्याग्रहाच्या पूर्वतयारीसंबधी अमरेळी येथे झालेल्या सभेत पालाल खा, मेया खा,
हमीर मेपा (मिया?) इ. मुस्लीम मंडळी सहभागी झाली होती.मुंबई उच्च न्यायालयातील आंबेडकरांच्या काही
मुसलमान वकील मित्रांनी सत्याग्रहासाठी आर्थिक मदत केली होती. एवढेच नाही तर महाड सत्याग्रहासाठी एकही सवर्ण
जागा देण्यास तयार नसताना फत्तेखान या मुस्लीम खोताने कुणाचाही विरोध न जुमानता
आपली जागा दिली होती. याच जागेवर पुढे महाडच्या मुक्तीसंग्रामाचा इतिहास रचल्या गेला. सामजिक
सुधारणेचा एक नवप्रयोग (Social Engineering) म्हणून आंबेडकरांनी समता समाज संघ स्थापन केला
होता. संघाच्या पुणे शाखेचे सभासद असलेले डॉ. एल एम. सत्तूर हेही कदाचित मुसलमान असावेत असे त्यांच्या
नामविशेषावरून वाटते. दलितवर्गामध्ये संरक्षण व सुरक्षीततेची भावना जागृत करणाऱ्या
समता सैनिक दलाच्या नागपूर शाखेच्या वतीने पोलीस सुपरीडेंट आगाखान यांना सलामी
देण्यात आली. याप्रसंगी दलातील प्रशिक्षण आणि शिस्त पाहून त्यांनी दलातील तीस दलित
तरुणांना पोलीस विभागात भरती करून घेतले होते. १९४२
च्या दलाच्या नागपूर अधिवेशनास खास लखनौवरून आलेले आवर्जून पी.एल.के. तालिब हे
सुद्धा मुस्लीम धर्मीय असावे असे वाटते.
१९३० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांनी सुरु केलेल्या काळाराम मंदिरप्रवेश सत्याग्रहात मुस्लीम मंडळींनी उल्लेखनीय
कार्य केले होते. महम्मद झकेरिया मणियार यांनी सत्याग्रहाच्या समर्थनार्थ आणि आर्थिक
मदतीसाठी मुंबईतील वालपाखाडी, जयराज गल्ली, डाबर चाळ, बी. आय. टी. चाळ, फोरास रोड
इ. ठिकाणी स्वतःच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा घेतल्या होत्या. आंबेडकरांसोबत
ते खास सत्याग्रहासाठी मुंबईहून नाशिकला आले होते. आंबेडकर व त्यांच्या इतर सहकांऱ्याना
राहण्याकरिता झकेरिया यांनी आपल्या एका मुसलमान मित्राचा प्रशस्त बंगला मिळवून
दिला होता. शिवाय त्यांच्याच प्रयत्नामुळे ‘मुस्लीम रेड क्रेसेंट सोसायटी’ने सत्याग्रहींच्या
सेवेसाठी एक बँड पथक, एक वैद्यकीय पथक आणि एक रुग्णवाहिनी दिली होती.सत्याग्रहादरम्यान सवर्णांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या दलितांची सेवा-शुश्रुषा
करण्याचे महत्वपूर्ण कार्य याच वैद्यकीय पथकाने केले होते. झकेरिया फक्त सत्याग्रहास
मदत करूनच थांबले नाहीतर मौलाना नासीर अहमद सारख्या आपल्या अनेक मुस्लीम मित्रांसह
ते सत्याग्रहात सहभागी सुद्धा झाले होते. त्यांच्याच पुढाकारामुळे स्थानिक
मुसलमानांमध्ये दलितांविषयी सहानुभूती निर्माण होवून ते सत्याग्रहास अनुकूल झाले
होते. तरीसुद्धा सवर्णांच्या चिथावणीमुळे काही स्थानिक मुसलमान एका मशिदीजवळ दलितांच्या
मिरवणुकीत गोंधळ घालणार आहेत असे दिसताच झकेरिया
यांनी त्यांची समजूत घालून दलित-मुस्लीम यांच्यात तेढ निर्माण करण्याचा सवर्णांचा
डाव उधळून लावला होता.
दलितवर्गात सामाजिक जागृती व्हावी यासाठी ठिकठिकाणी
सभा, परिषदा घेतल्या जाई. यात सुद्धा अनेक मुस्लीम मंडळी हिरीरीने सहभागी होत असत.
पांचगणी येथील सभेत अली महम्मद मुन्शी, चिपळूण येथील सहभोजन व परिषदेत खानसाहेब
देसाई या मुस्लीम पुरुषांनी तर नागपूर येथील दलित महिला परिषदेत खुर्शीदआरा बेगम
या मुस्लीम महिलेने आपले विचार व्यक्त केले होते. खडकजांब येथील विहिरीवर पाणी
भरण्याच्या सत्याग्रहात महम्मद झकेरिया मणियार सारखे पुरोगामी वृत्तीचे मुस्लीम
सक्रीय सहभागी झाले होते. इतकेच नाहीतर नागपूरातील आंबेडकरांच्या वाढदिवसाच्या
समारंभास १९३४ साली मौलाना महम्मद कासीम खान, मौलाना हकीम, निसार अली, १९३६ साली
समिउल्ला खान, तर १९३७ मध्ये एस.सी.एल नासीर, एम. ए. जैमुद्दिन, हकीम असरार अहमद,
व १९४२ मध्ये डॉ. अहमदी आणि तर मुंबईतील समारंभास १९४२ साली एम. आर. ए. बेग, १९५०
साली न्या. महम्मद अली छागला इ. मुस्लीम मंडळी आवर्जून उपस्थित होती. अशाप्रकारे
मुस्लिमांच्या असामान्य उल्लेखाशिवाय आंबेडकरी सामाजिक चळवळीचा इतिहास पूर्ण करता
येणार नाही.
राजकीय चळवळ
आंबेडकरी राजकीय चळवळीतील महत्वाचा
अध्याय म्हणजे गोलमेज परिषद. तीनही गोलमेज परिषदेमध्ये दलितांच्या
अस्तित्वासाठी आंबेडकरांना प्रस्थापितांविरुद्ध प्रखर संघर्ष करावा लागला होता. मात्र
या संघर्षपूर्ण काळातही मुस्लीम मंडळी सतत त्यांच्यासोबत होती. मुंबईत दि. ८
जानेवारी १९३१ रोजी झालेल्या सभेत महम्मद झकेरिया यांनी पहिल्या गोलमेज परिषदेतील
आंबेडकरांच्या योजनेचे जाहीर समर्थन केले होते. तर दुसऱ्या
गोलमेज परिषदेतील दलितवर्गाचे धोरण ठरविण्यासाठी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या परिषदेस
अब्दुल्ला आचार्य, दुदाभाई किकाभाई इ. उपस्थित होते. दुसऱ्या
गोलमेज परिषदेत गांधीजींनी आंबेडकरांच्या मागणीस विरोध केला, महम्मद अली जिनांनी
मात्र आपला पाठींबा दर्शविला होता. शिवाय शौकत
अली सारख्या इतर मुस्लीम प्रतिनिधींनी सुद्धा आंबेडकरांना सहकार्य केले होते. दलितांच्या
प्रश्नावरून गांधी-आंबेडकर यांच्यात दुसऱ्या गोलमेज परिषदेत मतभेद निर्माण झाले
असता त्यांच्यात तडजोड व्हावी म्हणून सर मिर्झा इस्माईल या मुस्लीम पुढाऱ्यानेच
मध्यस्थी केली होती. आंबेडकर गोलमेज परिषदेत यशस्वी व्हावे यासाठी मुंबईतील सभेत
इतर महारेतरांसह झकेरिया यांनीही प्रार्थना केली होती. तसेच फोरास
रोड, चिखलपाडा, जयराज गल्ली इ. ठिकाणी आंबेडकरांच्या समर्थनार्थ सभा घेतल्या
होत्या. गोलमेज परिषदेहून परतलेल्या गांधीजींचा काळे झंडे दाखवून निषेध करीत
असताना झालेल्या दंगलीत जखमी झालेल्या दलितांचा औषधोपचार करण्यासाठी सुद्धा झकेरिया
यांनी डॉ. शेख यांच्यासह बरीच मेहनत घेतली होती. गोलमेज परिषदेहून परत आलेल्या
आंबेडकरांच्या स्वागतासाठी सुद्धा झकेरिया जातीने उपस्थित होते. इतकेच नाहीतर दुसऱ्या
गोलमेज परिषदेनंतर उद्भवलेल्या पुणे कराराच्यावेळी गांधीजींच्या उपोषणामुळे बरीच
मंडळी आंबेडकरांच्या विरुद्ध उभी ठाकली असताना झकेरिया यांनी ठामपणे आंबेडकरांची
बाजू घेतली होती.
याशिवाय एक मुस्लीम पुढारी
अमानतउल्ला यांनी दारव्हा येथे आपल्या अध्यक्षतेखालील सभेत ‘अस्पृशांना स्वतंत्र
मतदार संघाचीच का आवश्यकता आहे’ या विषयावर चर्चा केली होती. तर शेड्युल्ड
कास्टस फेडरेशन तर्फे अकोला तहसील कार्यालयावर नेण्यात आलेल्या मोर्च्यात युसुफ
अली अंजान या मुस्लीम नेत्याने भाषण केले होते. एकंदरीत आंबेडकरी राजकीय
मुसलमानांचा सक्रीय सहभाग दिसून येतो.
शैक्षणिक चळवळ
दलितांचा सर्वांगीण विकास साधायचा
असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे जाणून आंबेडकरांनी शैक्षणिक चळवळ उभारली
होती. या चळवळीतही मुस्लिमांचे विशेष असे योगदान होते. दलितवर्गात शिक्षण
प्रसारासाठी आंबेडकरांनी ‘अखिल भारतीय बहिष्कृत समाज शिक्षण प्रसारक मंडळा’ची स्थापना केली. महम्मद
झकेरिया मणियार यांनी या मंडळास आर्थिक सहकार्य केले होते. भायखळ्यात दलित
विद्यार्थ्यांना शाळा मिळवून देण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. एवढेच नाहीतर
आंबे येथे झालेल्या सभेत शाहू छत्रपती बोर्डिंगला आर्थिक व अन्नधान्याची मदत करावी
या ठरावावर झकेरिया यांनी विचार व्यक्त केले होते. नागपूर येथील दलित महिला परिषदेत स्त्री शिक्षणाच्या ठरावावर खुर्शीदआरा बेगम या
मुस्लीम महिलेने आपले मत मांडले होते. दलितांच्या उच्च शिक्षणासाठी आंबेडकरांनी औरंगाबाद
येथे स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला असता हैदराबादच्या
निजामाने आपली जमीन विकत दिली होती. शिवाय दलितांच्या विकासासाठी उभारलेल्या एक
कोटी रुपयाच्या ‘शेड्युल्ड कास्ट ट्रस्ट फंड’ मधून बारा लाख रुपये दिले होते. तसेच
पन्नास हजार रुपयाची मदत सुद्धा केली होती. तत्कालीन शिक्षणमंत्री म्हणून मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी सुद्धा मिलिंद
महाविद्यालयाच्या उभारणीस बरेच सहकार्य केले होते.]काश्मीरमधील कुरेशी या मुस्लीम प्राध्यापकाने मिलिंद महाविद्यालयात
शिक्षणदानाचे महान कार्य केले होते. महाविद्यालयाच्या प्रत्येक कार्यक्रमाचे
छायाचित्र काढणारे औरंगाबादेतील महम्मदभाई यांचे अल्पसा का होईना पण महत्वपूर्ण
योगदान मिलिंद महाविद्यालयाच्या वाटचालीत होते. त्याच्याच छायाचित्रणामुळे आपणास
मिलिंद महाविद्यालयाचा दृश्य इतिहास आज पहावयास मिळतो.
धार्मिक चळवळ
हिंदू धर्मातील अत्याचाराला कंटाळून आंबेडकरांनी
१९३५ साली धर्मांतराची घोषणा केली. त्यामुळे विविध धर्मियांनी त्यांना आपापल्या
धर्मात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मुस्लीम सुद्धा ह्यात मागे नव्हते. खालिद
गौबा यांनी तार पाठवून आंबेडकरांना मुस्लीम धर्म स्वीकारण्यास सांगून बदायुन येथील
मुस्लीम परिषदेचे निमंत्रण दिले होते. शिवाय पीर जमियत अलीशहा व मौलाना अब्दुला
कसुरीसह मुंबईत आंबेडकरांची भेट घेवून त्यांनी धर्मांतराविषयी चर्चाही केली होती. नागपूरात
डॉ. महम्मद नबाब सिद्दिकी, अली खान इ.नी त्यांच्याशी धर्मांतराविषयी चर्चा केली
होती. पंजाबमधील अहमदिया पंथ, मुंबईतील आगाखान पंथ, कलकत्त्याच्या मुस्लीम
परिषदेचे अध्यक्ष ढाक्याचे नबाब ख्वाजा हबीबुल्ला इ.नी आंबेडकरांच्या धर्मांतर
घोषणेचे स्वागत करून त्यांना मुस्लीम धर्मात आणण्याचा प्रयत्न केला होता. हैदराबादच्या
निजामानेही आंबेडकरांना दलितांसाठी आर्थिक आणि शैक्षणिक सहकार्याचे आश्वासन देवून
इस्लाममध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता. मुस्लीम धर्म स्वीकारून मुसलमान बनलेले
गांधीजींचे पुत्र अब्दुल्ला गांधी यांनी सुद्धा आंबेडकरांना मुस्लीम धर्मात
येण्याविषयी सुचविले होते. जबलपूरच्या
सिद्दिक हुसेन खान यांनी तर अमरावती जिल्ह्यातील शिराळा येथील धर्मांतराच्या
समर्थनार्थ झालेल्या सभेत मौलाना शैदा इस्रायली संभली यांनी आंबेडकरांना मुस्लीम धर्म स्वीकारावा अशी
विनंती केली होती. मुंबईतील हकीम अबू युसुफ इसफदानी यांनी तर आंबेडकरांना
ईदनिमित्त्य सामुहिक प्रार्थनेसाठी आमंत्रित केले होते. अश्रफ अली सय्यद, गुलाम भिक नायंगर इ. मुस्लीम
बांधवांनी पुण्यातील परिषदेत उपस्थित राहून आंबेडकरांना इस्लाम धर्मामध्ये प्रवेश
घेण्याची विनंती केली होती. तर मुंबईतील परिषदेत महम्मद झकेरिया मणियार या
आंबेडकरी चळवळीतील निष्टावंत मुस्लीम कार्यकर्त्याने सक्रीय सहभागी होवून
आंबेडकरांचे मुस्लीम धर्माकडे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आंबेडकरांचा
कल बालपणापासून बौद्ध धर्माकडे असल्याने त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला नाही.
मूल्यमापन:
मुस्लीम समाज हा
साधारणतः मागास, कट्टर धार्मिक तसेच सामाजिक सुधारणाप्रति उदासीन समजला जातो.
तरीसुद्धा आंबेडकरी चळवळीत मुस्लिमांचे अभूतपूर्व असे योगदान दिसून येते. डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वसमावेशक व्यक्तिमत्वामुळे प्रभावित होवून मुस्लीम
धर्मातील सुधारणावादी मंडळी आंबेडकरी चळवळीत सहभागी झाली. महम्मद झकेरिया मणियार
तसेच फत्तेखान सारख्या पुरोगामी विचाराच्या मुस्लीमांच्या योगदानातून हे स्पष्ट
होते. भारतीय राजकारणात हिंदू-मुस्लीम असे दोन परस्परविरोधी प्रवाह होते. तर
आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील तिसरा प्रभावशाली गट सुद्धा होता. मुस्लीम गटाने
आंबेडकरांशी साधलेल्या जवळीकतेतून आंबेडकरी राजकीय चळवळीत शौकत अली, सर मिर्झा
इस्माईल यांच्या सारख्यांचे कार्य दिसून
येते. आंबेडकरांनी हिंदू धर्म त्यागण्याची घोषणा केल्याने त्यांना इस्लाममध्ये
आणण्याच्या प्रयत्नातून खालिद गौबा, अब्दुल्ला गांधी इत्यादींची नकळत का होईना
आंबेडकरी चळवळीत नावे नोंदविल्या गेली. शिवाय हिंदू धर्मातील विषमतेविरुद्ध असलेला
आंबेडकरांचा लढा मुस्लिमांना हिंदू धर्मविरोधी लढा वाटला असल्यामुळे मुस्लीम
आंबेडकरी चळवळीत सामिल झाल्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. परंतु कारणे
कुठलीही असो मुस्लिमांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान कुणीही नाकारू शकणार नाही.