रविवार, १८ मार्च, २०१८

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी


डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी संबंध: ऐतिहासिक मूल्यमापन

प्रस्तावना:
          डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी हे दोघेही आधुनिक भारतातील थोर राष्ट्रपुरुष होते. त्यांचे स्वभावविशेष, तत्त्वज्ञान, कार्यपद्धती आणि श्रद्धास्थाने यांच्यात पुष्कळ वेगळेपण आहे. अनेक राजकीय, सामाजिक आणि धार्मिक प्रश्नांच्या बाबतीत त्यांच्यात तीव्र मतभेद झाले. हे जरी खरे असले तरी तरी देखील त्यांच्यात मनभेद कधीच झाले नाहीत. त्यांच्यातील आत्मीयता शेवटपर्यंत कायम होती. गांधीजींची हत्या झाली हे कळताच आंबेडकर तातडीने त्यांच्या अंत्यदर्शनासाठी हाऊस बिर्ला येथे गेले. “गांधी हत्या हे दुष्कृत्य आहे. गांधी हत्येमुळे मी कमालीचा हेलावून गेलो.” असे उद्गार आंबेडकरांनी याप्रसंगी काढले होते. गांधी-आंबेडकर यांच्यातील मतभेदाविषयी त्यांच्या अनुयायांमध्ये बरेच गैरसमज असलेले दिसून येतात. या पार्श्वभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील संबंधाचे ऐतिहासिक मूल्यमापन करणे हा प्रस्तुत शोधनिबंधाचा उद्देश आहे.    
आंबेडकरी वृत्तपत्रे:
          डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘बहिष्कृत भारत’ या वृत्तपत्राच्या दिनांक २० मे १९२७ च्या अंकात महात्मा गांधीचा ‘आत्मसंयमाचे उपाय’ हा लेख प्रकाशित करण्यात आला होता. १९३३ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘जनता’ वृत्तपत्राच्या खास अंकात आंबेडकरांचे सहकारी देवराव नाईक यांनी ‘रामचंद्रापासून ते गांधीजीपर्यंत म्हणजेच अस्पृश्यता निवारक कार्याचे ओझरते निरीक्षण’ हा लेख लिहिला होता. एवढेच नाहीतर पुणे कराराचे प्रणेते म्हणून महात्मा गांधी यांचे छायाचित्र सुद्धा या खास अंकात प्रकाशित झाले होते. महात्मा गांधीजींनी सुद्धा आपल्या ‘हरिजन’ साप्ताहिकासाठी आंबेडकरांचा संदेश मागितला होता. परंतु मी संदेश देण्या योग्य नाही असे सांगून त्यांनी एक निवेदन दिले होते.
अस्पृश्यता निवारण:
          अस्पृश्यता निवारणासाठी गांधीजींनी ‘हरिजन सेवक संघ’ स्थापन केला. आंबेडकरांची या संघाच्या सभासदपदी नेमणूक केली होती. परंतु संघाची कार्यपद्धती न पटल्यामुळे आंबेडकरांना नाईलाजास्तव हरिजन सेवक संघाचा राजीनामा द्यावा लागला. आपल्या कार्याच्या प्रसारासाठी ‘हरिजन’ हे वृत्तपत्र सुद्धा सुरु केले होते. या वृत्तपत्रात पहिला संदेश आंबेडकरांचा होता. अस्पृश्यांना कोणीच जवळ करीत नाहीत अशा परिस्थितीत महात्मा गांधीजींनी दाखविलेली सहानुभूती कमी मोलाची नाही असे आंबेडकर गांधीजींच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्याविषयी म्हणतात. तात्त्विक मतभेद असले तरी आंबेडकरांनी गांधीजींच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्याचे नेहमीच मोल मानले आहे.
महाडचा सत्याग्रह:
          महाड स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्तेत असलेल्या कॉंग्रेसने गांधीजींच्या प्रेरणेने महाडचे चवदार तळे अस्पृश्यांसाठी खुले केले होते. परंतु सनातनी लोक अस्पृश्यांना मज्जाव करीत असत. तेंव्हा आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. या महाड सत्याग्रहाच्या मंडपात महात्मा गांधीचे एकमेव छायाचित्र होते. महात्मा गांधीजींच्या नावाचा जयघोष सुद्धा या सत्याग्रहात झाला होता. महाड सत्याग्रहाविषयी महात्मा गांधी दि. २८ एप्रिल १९२७ च्या ‘यंग इंडिया’ च्या अंकात म्हणतात, “चवदार तळ्यावर जाऊन आपली तहान भागविण्याचा सल्ला डॉ आंबेडकरांनी अस्पृश्यांना दिला. तसे करण्यात मुंबई कायदेमंडळाचा व महाड म्युनिसिपालिटीचा ठराव कसोटीस लावण्याचा  त्यांचा प्रयत्न अगदी न्याय्य होता.
प्रथम गोलमेज परिषद:
          पहिल्या गोलमेज परिषदेत गांधीजींनी उपस्थित राहावे असे आंबेडकरांना मनापासून वाटत होते. परंतु गांधीजींनी या परिषदेवर बहिष्कार घातला होता. आंबेडकरांच्या पहिल्या गोलमेज परिषदेतील भूमिकेची मात्र पहिल्या भेटीत गांधीजींनी प्रशंसा केलेली दिसून येते. गांधीजी या परिषदेस उपस्थित राहिले असते तर पुढील संभाव्य संघर्ष टाळल्या गेला असता असे आंबेडकरांना वाटत होते.
प्रथम मुलाखत:
          आंबेडकरांच्या पहिल्या गोलमेज परिषदेतील राष्ट्रवादी भुमिकेमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत होते. गांधीजीनी सुद्धा पहिल्या गोलमेज परिषदेचा अहवाल वाचला होता. त्यामुळे आंबेडकरांची भेट घेण्याची त्यांनी इच्छा दर्शविली. मुंबईतील मणिभवन येथे आंबेडकर आणि गांधीजी यांची पहिली भेट झाली. या भेटीत अस्पृश्यांच्या राजकीय हक्कावरून त्यांच्यात मतभेद झाले. आंबेडकर हे पुरोगामी वृत्तीचे ब्राह्मण व्यक्ती असावे असे सुरुवातीस गांधीजींना वाटत होते. परंतु आंबेडकर हे स्वतः एक अस्पृश्य आहे हे लक्षात आल्यावर त्यांच्या मनात आंबेडकरांविषयी सहानुभूतीची भावना निर्माण झाली होती.
स्वतंत्र मतदार संघ:
          अस्पृश्यांना मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, पारशी इत्यादी अल्पसंख्याकांप्रमाणे स्वतंत्र मतदार संघ द्यावे अशी मागणी आंबेडकरांनी केली होती. मात्र अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ दिल्यास हिंदू धर्माचे विघटन होईल या भीतीने गांधीजीनी आंबेडकरांच्या मागणीला विरोध केला. तर अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ दिल्यास त्यांना कायदेशीररित्या त्यांचे अधिकार मिळतील जे सवर्ण हिंदू त्यांना कधीच स्वतःहून कधीच देणार नाहीत असे आंबेडकरांना वाटत होते.
द्वितीय गोलमेज परिषद:
          दुसऱ्या गोलमेज परिषदेत मीच संपूर्ण भारतीय लोकांचा आणि अस्पृश्यांचा सुद्धा प्रतिनिधी आहे अशी भूमिका गांधीजींनी घेतली. अस्पृश्यांच्या प्रश्नावरून गांधी आणि आंबेडकर यांच्यात वैचारिक मतभेद झाले. आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी केलेल्या स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीला गांधीजींनी विरोध दर्शविला. सरोजिनी नायडू यांच्या निवासस्थानी वाटाघाटी करण्यासाठी झालेल्या त्यांच्या भेटीतूनही काही तोडगा निघाला नाही. गांधीजींनी भूतदयावादी दृष्टीकोनातून केलेली अस्पृश्यांची सेवा आंबेडकरांनी नाकारली नाही पण गांधीजींनी ज्या रीतीने गोलमेज परिषदेत अस्पृश्यविरोधक भूमिका घेतली ती आंबेडकरांना अमान्य होती.
पुणे करार:
           स्वतंत्र मतदार संघाच्या मुद्द्यावरून गांधीजीनी पुण्यातील येरवडा तुरुंगात उपोषण सुरु केले. शेवटी तडजोड होऊन गांधी-आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला. “दोन दिवसांपूर्वी माझ्या मनावर विलक्षण ताण पडलेला होता, एका बाजूला भारतातील सर्वात मोठ्या माणसाचे प्राण वाचविण्याची उत्कंठा आणि दुसऱ्या बाजूला माझ्या समाजाच्या हितसबंधाची जपणूक करण्याची जबाबदारी, अशा पेचात मी सापडलो होतो. त्यातून मी सहीसलामत बाहेर पडू शकलो, याचे बरेचसे श्रेय महात्मा गांधी यांना दिले पाहिजे.” असे उद्गार याप्रसंगी काढले.  आणि “येरवडा तुरुंगात मी जेंव्हा त्यांना प्रथम भेटलो, तेंव्हा त्याच्यात आणि माझ्यात जे साधर्म्य मला दिसून आले, ते पाहून मी अगदी चकित होऊन गेलो.” असेही ते गांधीजींविषयी म्हणाले. पुणे करारानंतर आंबेडकर हे भारतातील अस्पृश्य वर्गाचे एकमेव पुढारी आहे हे सिद्ध झाले. पुणे करारानंतर गांधीजींच्या अस्पृश्यविषयक धोरणामध्ये आमुलाग्र परिवर्तन झालेले दिसुन येते.
सविनय कायदेभंग चळवळ:
          १९३२ च्या ऑक्टोबर मध्ये आंबेडकरांनी येरवडा तुरुंगात गांधीजींची भेट घेवून सविनय कायदेभंग चळवळ स्थगित करावी आणि भारताच्या भवितव्यासाठी तिसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित उपस्थित राहावे अशी विनंती केली होती.
धर्मांतर घोषणा:
          ऑक्टोबर १९३५ मध्ये डॉ आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. अस्पृश्यतेला शेवटची घरघर लागली असताना आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करणे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आंबेडकरांसारख्या उच्च शिक्षण संपन्न आणि उच्च ध्येयनिष्ठ मनुष्याचा राग अस्पृश्यांचा होणारा छळ पाहून अनावर होतो, हे आपण समजू शकतो, परंतु धर्म म्हणजे घर किंवा अंगरख्या सारखी बदलता येणारी वस्तू नाही असे म्हणून गांधीजीनी धर्मांतर घोषणेला ‘दुर्दैवी निर्णय’ संबोधून स्पष्ट विरोध केला होता. मात्र आंबेडकरांच्या धर्मांतर घोषणेनंतर गांधीजींच्या अस्पृश्य निवारणाच्या विचारात खूपच परिवर्तन झाले.  
भारत छोडो आंदोलन:
          इ.स. १९४२ मध्ये गांधीजींनी ब्रिटीशांविरुद्ध ‘भारत छोडो’ आंदोलन सुरु केले. आंबेडकरांनी या आंदोलनाविषयी तटस्थ भूमिका घेतली. परंतु या आंदोलनात भाग घेणाऱ्या गांधीजी आदी नेत्यांना कैद करून क दर्जाची वागणूक देवून अंदमानच्या तुरुंगात पाठविण्याच्या ब्रिटीश सरकारच्या भूमिकेला त्यांनी प्रखर विरोध केला. त्यामुळे या आंदोलनात भाग घेणाऱ्या नेत्यांना राजबंद्याचा दर्जा देण्यात आला. गांधीजींना आगाखान पॅलेस मध्ये तर बाकीच्या नेत्यांना अहमदनगरच्या तुरुंगात ठेवण्यात आले.  यामागे आंबेडकरांनी घेतलेली असल्याचे नाकारता येत नाही.
घटना समिती:
          डॉ बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीत आणण्यासाठी गांधीजींचेच प्रयत्न होते.  ‘आंबेडकरांइतका संविधान समजणारा दुसरा कुणीही नाही.’ असे सांगून आंबेडकरांना घटना समितीमध्ये समाविष्ट करा आणि त्यांना घटना समितीचे अध्यक्षपद देण्याची सूचना गांधीजींनी सरदार पटेल आणि पंडित नेहरू यांना केली होती. आंबेडकरांनी ध्वज समितीत काम करीत असताना राष्ट्रध्वजात जे अशोकचक्र अंकित केले त्याला गांधीजींनी मान्यता दिली होती.
प्रथम मंत्रीमंडळ:
          आंबेडकरांची दलीतोद्धाराची तळमळ, बुद्धिमत्ता आणि राष्ट्रनिष्ठा याबद्दल गांधीजींना अभिमान होता. लेस्टर नावाच्या ब्रिटीश महिलेशी सेवाग्राम आश्रमात बोलतांना, “आंबेडकरांचे सहकार्य अस्पृश्यांचे व देशाचे प्रश्न सोडविण्यासाठी हवे. ते विद्वान आहेत. डॉ आंबेडकरांनी मध्यवर्ती मंत्रिमंडळात असावे असे वाटते. पण त्यांना कोणी व कसे आणावे हा पेच आहे.” असे गांधीजी म्हणतात यावरून गांधीजींच्या मनातील आंबेडकरांविषयीची भावना प्रतीत होते.  पंडित नेहरूंनी त्यांना स्वतंत्र भारताच्या पहिल्या राष्ट्रीय मंत्रिमंडळाची यादी दाखविली तेंव्हा गांधीजींनी त्यात कायदेमंत्री म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा समावेश केला होता. त्यामुळे स्वतंत्र भारताच्या पहिल्या राष्ट्रीय मंत्रिमंडळात आंबेडकरांना स्थान मिळाले.
गांधीजींची प्रतिज्ञा.:
          अस्पृश्यता निवारणाचा एक भाग म्हणून महात्मा गांधीजींनी ‘वधू वरांपैकी एक अस्पृश्य असणाऱ्या विवाहालाच मी उपस्थित राहील अशी प्रतिज्ञा केली होती. गांधीजींच्या हत्येनंतर आंबेडकरांचा दुसरा विवाह शारदा कबीर या ब्राह्मण महिलेशी झाला. तेंव्हा “आज बापू असते तर त्यांना खूप आनंद झाला असता.” असे उद्गार आंबेडकरांनी काढले होते. यावरून आंबेडकरांच्या मनात गांधीजींविषयी असलेली भावना दिसून येते.
बौद्ध धम्म दीक्षा:
          डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी १९३५ मध्ये केलेल्या धर्मांतर घोषणेला महात्मा गांधीनी विरोध केला होता. कारण आंबेडकरांनी मुस्लीम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास हिंदू धर्मास तसेच भारत देशास प्रचंड धोका होईल अशी त्यांना भीती होती. परंतु १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आंबेडकरांनी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आंबेडकरांनी महात्मा गांधी यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे प्राचीन भारतातील गौरवशाली बौद्ध धर्माचा स्वीकार करून आपल्या देशाचे हित साधले. या संदर्भात १९५६ मध्ये पत्रकारांशी बोलताना आंबेडकर म्हणतात, “अस्पृश्यतेच्या प्रश्नासंबधी तुमच्याशी (गांधीजी) माझे मतभेद असले तरी वेळ येईल तेंव्हा मी या देशाला कमीतकमी धोका लागेल असा मार्ग स्वीकारीन म्हणून बौद्ध धर्म स्वीकारून मी या देशाचे जास्तीत जास्त हित साधत आहे, कारण बौद्ध धर्म हा भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे.” 
आंबेडकरांची ग्रंथसंपदा:
          आंबेडकरांनी महात्मा गांधी यांच्या ध्येयधोरणांचे टीकात्मक परीक्षण करण्यासाठी तिन ग्रंथ लिहिले. त्यापैकी पहिला ग्रंथ म्हणजे ‘रानडे, गांधी आणि जिना’ हा होय. दुसरा म्हणजे ‘गांधी आणि अस्पृश्यांचे बंधविमोचन’ तिसरा ग्रंथ ‘कॉंग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या तिनही ग्रंथात आंबेडकरांनी गांधीजींच्या अस्पृश्यविषयक धोरणाची समीक्षा केलेली दिसून येते.
गांधी निधी:
          इ.स. १९५४ मध्ये आंबेडकरांनी संसदेमध्ये गांधी निधी उभारण्याची योजना सादर केली. सरकारने मिठावर कर बसवावा त्यातून वीस कोटी रुपयाचे उत्पन्न मिळेल त्यातून गांधी निधी उभारावा आणि तो अस्पृश्य वर्गाच्या उन्नतीसाठी उपयोगात आणावा. जमिनीची किमान मर्यादा ठरवून आणि जास्त जमीन असेल तर ती विकत घेवून किंवा अस्पृश्यांना ती जमीन विकत घेण्यासाठी पैसे देवून किंवा पडीक जमिनीवर अस्पृश्य वर्गाचे पुनर्वसन करावे. असे या योग्नेचे स्वरूप होते. याप्रसंगी आंबेडकर म्हणतात, “मिठावरील कराचे उच्चाटन गांधीजींच्या स्मृतीप्रित्यर्थ करण्यात आले. मला गांधीजींविषयी आदर वाटतो. आपणा सर्वाना माहित आहे की, अस्पृश्य गांधीजींना प्राणप्रिय होते. या योजनेला गांधीजी स्वर्गातूनही आशीर्वाद देतील.
मूल्यमापन:
         मी गांधीजींचा द्वेष करीत नाही, गांधीजींनी सामाजिक सुधारणेपेक्षा आत्मकेंद्रित राजकारणावर जास्त भर दिला त्यामुळे हिंदू धर्माचे फार मोठे नुकसान झाले. असे आंबेडकर आपल्या ‘रानडे, गांधी आणि जिना’ या ग्रंथात म्हणतात. गांधी-आंबेडकर संघर्ष हा देशभक्त गांधी आणि समाजसुधारक आंबेडकर असा कधीच नव्हता. स्वातंत्र्यानंतर सामान्य जनतेला कोणते हक्क असावेत याविषयी ध्येयवाद म्हणून एकमत असलेल्या, पण प्रत्यक्ष कार्यक्रमांबाबत मतभेद निर्माण झाल्यामुळे परस्परांविषयी संशय निर्माण झालेल्या दोन महान राष्ट्रभक्तामधला तो संघर्ष होता. गांधी-आंबेडकर यांचे परस्परांशी वैचारिक मतभेद असले तरी परस्परांच्या राष्ट्रहिताच्या अस्पृश्यनिवारणाच्या कार्याविषयी परस्परांच्या मनात नितांत आदर होता. हे  डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या अनुयायांनी समजून घेवून त्यांचे विचार आचरणात आणणे ही काळाची गरज आहे.