डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतर घोषणा: एक ऐतिहासिक परीक्षण
धर्मांतर
घोषणा
दिनांक १३ ऑक्टोबर १९३५ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘मुंबई इलाखा दलित परिषद’ आयोजित करण्यात आली. अमृतराव रणखांबे हे या परिषदेचे
स्वागताध्यक्ष होते. स्वागत
समितीमध्ये शंकरराव आप्पाजी मांगगारुडी, नाथा सुता भंगी, किसन मंगाजी भंगी, पांडुरंग गोटीराम
चांभार इत्यादी महारेतरांचा समावेश होता. आंबेडकरी
चळवळीचे हितचिंतक अहमदनगरचे सरदार थोरात नानासाहेब
देवचक्के आणि पाटील वकील हे परिषदेस आवर्जून उपस्थित होते. मुंबई, हैद्राबाद
व मध्यप्रांतातून दहा हजार अस्पृश्य समाजातील आंबेडकरी अनुयायी या परिषदेस आले होते. याच परिषदेत आंबेडकरांनी
“दुर्दैवाने
मी हिंदू धर्मातील अस्पृश्य जातीत जन्मलो परंतु
मरताना मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाही.” ही धर्मांतराची घोषणा केली होती. या प्रसंगी केलेल्या भाषणात “काळाराम मंदिराची चळवळ वर्षानुवर्षे
चालूनही तिला फळ येत नाही. आपला काळ, पैसा आणि शक्ती वाया गेली. हिंदूंच्या दगडी
हृदयाला पाझर फोडणे अशक्य आहे हेच या चळवळीने सिद्ध
झाले आहे. चवदार तळ्याच्या सत्याग्रहानेही हिंदूंवर काही परिणाम झाला नाही. आता
वेगळा विचार करण्याची वेळ आली आहे. जो
धर्म आपल्याला समान दर्जा, समान
हक्क व योग्य वागणूक देईल अशा एखाद्या दुसऱ्या धर्मात जावे असे तुम्हास वाटत नाही? हिंदू धर्माशी असेलेले संबंध तोडा, स्वाभिमान
आणि शांतता मिळेल अशा धर्मात जा.” असे
परखड विचार व्यक्त केले होते. आंबेडकरी चळवळीचे हितचिंतक
रामचंद्र काशिनाथ तटणीस यांनी आपल्या ‘विविधिवृत्त’ या साप्ताहिकाच्या दिनांक २० ऑक्टोबर १९३५ च्या अंकात आंबेडकरांच्या
भाषणाचा सविस्तर वृत्तान्त छापला होता.
धर्मांतर घोषणेवरील प्रतिकूल प्रतिक्रिया
आंबेडकरांची
धर्मांतर घोषणा अवास्तव वाटून त्यांच्या काही सहकाऱ्यांनी विरोध दर्शविला होता.
आंबेडकरी चळवळीतील चांभार जातीतील पुढारी पांडुरंग नाथूजी राजभोज यांना धर्मांतर
घोषणा न आवडल्याने त्यांनी
अहमदाबाद येथे ह्या घोषणेचा जाहीर निषेध केला. धर्मांतर घोषणेला विरोध
करणारे ते पहिले अस्पृश्य पुढारी होते.
आंबेडकरांचे वनकर जातीतील सहकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंकी
यांनीसुद्धा ‘हिंदू समाजातील तरुण पिढी सुधारक
मताची आहे व अस्पृश्यांना हे लोक
चांगले वागवतीलच तेव्हा धर्मांतर करून अस्पृश्यांचा काहीच फायदा
होणार नाही.’ असे
विचार व्यक्त करून धर्मांतर घोषणेला
विरोध केला होता.
आंबेडकरांचे गोलमेज परिषदेमधील सहकारी श्रीनिवासन यांनीसुद्धा धर्मांतर
घोषणेला विरोध
दर्शविला होता. अस्पृश्यांचे एक नेते एस. सी. राजा यांनीसुद्धा धर्मांतर घोषणेविषयी प्रतिकूलता दाखविली होती. आंबेडकरांचे सुरुवातीच्या
काळातील चांभार जातीतील सहकारी बाळकृष्ण देवरुखकर, नारायण
काजरोळकर व पी. बाळू तसेच दत्तोबा पवार यांनीही धर्मांतर घोषणेला विरोध
दर्शविला होता. वि.
दा. सावरकर यांनी अस्पृश्य समाजाला
धर्मांतराच्या ध्येयापासून परावृत्त होण्याची
विनंती केली होती. महात्मा गांधीजींनी
तर धर्मांतर घोषणेला ‘दुर्दैवी
निर्णय’ संबोधून
स्पष्टपणे प्रखर विरोध
केला होता. काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष डॉ.
राजेंद्र प्रसाद यांनीही धर्मांतर घोषणेला विरोध दर्शविला. मुंबईच्या
हरिजन सेवा संघाचे उपाध्यक्ष मथुरादास बिसनजी यांनीही धर्मांतर घोषणेला अनिष्ट ठरवून निवेदने
प्रसिद्ध केली होती. अस्पृश्यांचे हितचिंतक श्री. म.
माटे यांनीसुद्धा धर्मांतर घोषणेचा
अव्हेर केला होता. आंबेडकरी चळवळीचे एक शुभचिंतक
न. वि. गाडगीळ यांनी ‘पुणे
कराराच्या अंमलबजावणीपर्यंत धर्मांतराचा निर्णय स्थगित करावा’ अशी
विनंती आंबेडकरांना केली होती. पंडित श्रीधर दामोदर
सातवळेकर, न. चिं. केळकर, ल.
ब. भोपटकर, सिद्धेश्वरशास्त्री चित्राव इत्यादीनी
धर्मांतर घोषणेचा निषेध जाहीरपणे केला
होता. आंबेडकरांनी
आपल्या अस्पृश्य अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग
केल्यास हिंदू धर्म अडचणीत येईल असे
वाटून शंकराचार्य डॉ. कूर्तकोटी
यांनी एक शिष्टमंडळ आंबेडकरांना
धर्मांतराच्या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी पाठविले होते.
रामचंद्र गणेश प्रधान यांच्या अध्यक्षतेखालील या शिष्टमंडळात व्ही. पी. साठे, एन. व्ही. जानोरकर, बी. एल. पाटणकर, डॉ. आर. के. गायधनी, पांडुरंग जिवाजी सबनीस व गोविंदराव हरी देशपांडे यांचा समावेश होता. यावरून आंबेडकरांच्या धर्मांतर घोषणेने संपूर्ण भारतात
प्रचंड वादळ निर्माण केले होते असे लक्षात येते.
धर्मांतर घोषणेवरील अनुकूल प्रतिक्रिया
आंबेडकरांच्या
धर्मांतर घोषणेचे त्यांच्या अनेक सहकारी
मंडळींनी समर्थन केले होते. चांभार
जातीतील सहकारी सीताराम नामदेव शिवतरकर यांनी धर्मांतर घोषणेस
जाहीर पाठिंबा दिला होता.
सुरुवातीस धर्मांतर घोषणेला विरोध करणाऱ्या
डॉ. पुरुषोत्तम
सोळंकी ह्यांनी “बाबासाहेबांनी आम्हा अस्पृश्यांना क्षणभरही ह्या
दुबळ्या हिंदू धर्मात न ठेवता आम्हास मर्दांचा स्वतंत्र धर्म द्यावा.” असे उद्गार काढून नंतर धर्मांतर घोषणेस अनुकूलता दर्शविली होती. आंबेडकरांचे
प्रारंभिक काळातील चांभार जातीतील सहकारी बाळकृष्ण देवरुखकर यांनीसुद्धा आधी विरोध दर्शवून नंतर आंबेडकरांनी विचारपूर्वक अभ्यास करून निवडलेला बौद्ध धर्मच चांभारांनी स्वीकारावा. असे म्हणून धर्मांतर घोषणेचे समर्थन केले होते. आंबेडकरी चळवळीचे एक हितचिंतक
प्रसिद्ध नाटककार मामा वरेरकर यांनीही धर्मांतर घोषणेचे
स्वागतच केले होते. सत्यशोधक
चळवळीतील एक नेते मुकुंदराव पाटील यांनी आपल्या ‘दिनमित्र’ या वृत्तपत्रात धर्मांतरच योग्य हा लेख लिहून, “धार्मिक
निर्बंधामुळे हीनपणा भोगणाऱ्यांनी
धर्मांतर करणे हेच योग्य आहे.” असे मत मांडून धर्मांतर
घोषणेस पाठिंबा दर्शविला होता.
सत्यशोधक चळवळीतील दुसरे एक पुढारी भास्करराव जाधव यांनी आंबेडकरांना पत्र पाठवून “हिंदू धर्माची उभारणी विषमतेच्या
पायावर झाली आहे आणि त्यामुळे अस्पृश्य समाज
तोपर्यंत हिंदू धर्मात रेंगाळून राहील, जोपर्यंत यास पाहिजे असेलली समता
मिळण्याची आशा नाही.” अशाप्रकारे
विचार व्यक्त करून धर्मांतर घोषणेस समर्थन दिले होते. मध्यप्रांत
वऱ्हाडातील एक सुप्रसिद्ध कायदेपंडित आणि आंबेडकरांचे हितचिंतक डॉ. हरिसिंग गौर
यांनी आंबेडकरांना पत्र पाठवून त्यांच्या धर्मांतर घोषणेचे
समर्थन केले होते. त्याचबरोबर डॉ.
वा. का. किर्लोस्कर यांनीसुद्धा आपल्या ‘किर्लोस्कर’ मासिकातून धर्मांतर घोषणेविषयी ऊहापोह
केला होता. आंबेडकरांचे स्नेही हितचिंतक
रामचंद्र तटणीस आणि निर्भीडकार अनंत हरी गद्रे त्याचप्रमाणे आंबेडकरी
चळवळीतील स्पृश्य कार्यकर्ते डॉ. म. भि. चिटणीस यांनीसुद्धा
आंबेडकरांच्या धर्मांतर घोषणेप्रति
अनुकूलता दर्शविली होती. आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते एन. शिवराज यांनीसुद्धा पुण्यातील
परिषदेत धर्मांतर घोषणेचे जाहीर स्वागत
केले होते. यावरून असे लक्षात येते की धर्मांतर घोषणेमुळे संपूर्ण भारतातून आंबेडकरांना
होत असलेल्या विरोधी परिस्थितीतही आंबेडकरांचे अनुयायी, सहकारी, समर्थक आणि
हितचिंतक खंबीरपणे त्यांच्या बाजूने उभी होते.
चांभार सहकाऱ्यांचे समर्थन
आंबेडकरांच्या
धर्मांतर घोषणेचे चांभार अस्पृश्य जातीतील आंबेडकरी अनुयायांनी धर्मांतर घोषणेचे
स्वागत केले. आंबेडकरांचे निष्ठावंत चांभार सहकारी सीताराम शिवतरकर आणि बाळकृष्ण
देवरुखकर यांनी तर धर्मांतर घोषणेचे समर्थन केलेच होते परंतु त्याचबरोबर दिनांक २७ ऑक्टोबर १९३५ रोजी मुंबईतील मदनपुरा येथे रामचंद्र
बाळाजी चांदोरकर यांच्या अध्यक्षतेखालील चांभार समाजाच्या सभेत धर्मांतर घोषणेला जाहीर पाठींबा
दर्शविण्यात आला. वसई
येथे वा. ना. वनमाळी यांच्या
अध्यक्षतेखालील चांभार समाजाच्या सभेतही धर्मांतर घोषणेचे समर्थन करण्यात आले. दिनांक २३ फेब्रुवारी १९३६ रोजी भुसावळ येथे खानदेशातील
चांभार समाजाच्या सभेत पी. झेड. सावकार, पी. व्ही. गवळी, मारोती
आबाजी भोसले यांनी पत्रक
वाटून धर्मांतर घोषणेला पाठींबा दिला.
मातंग सहकाऱ्यांचे समर्थन
मातंग
या अस्पृश्य जातीतील आंबेडकरी अनुयायी धर्मांतर घोषणेच्या बाजूने होते. दिनांक
२९ डिसेंबर १९३५ रोजी अमरावती येथे वऱ्हाड
अस्पृश्य परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत एच. डी. बेहाडे, संभूजी खंडारे, एस.
टी. वानखेडे या मातंग समाजातील पुरोगामी व्यक्तींनी धर्मांतर घोषणेला
पाठींबा दिला. मुंबई येथे भरलेल्या मातंग समाज मंडळाची सभेतही धर्मांतर घोषणेचे समर्थन करण्यात आले. याशिवाय
मध्यप्रांत वऱ्हाड मातंग सोसायटीचे सदस्य एस. एस. बंगाले यांनी तसेच मातंग
विद्यार्थी हितचिंतक मंडळाचे सचिव डी. सी. वायदंडे यांनी पत्रकाद्वारे निवेदन प्रकाशित करून धर्मांतर घोषणेस
पाठींबा द्यावा असे जाहीर आवाहन केले.
केरू रामचंद्र जाधव व बाबुराव दौलतराव
गायकवाड यांनी जनता या वृत्तपत्रात अनुक्रमे ‘मातंग
समाज व धर्मांतर’ आणि ‘धर्मांतर
करणे इष्ट आहे’ हे लेख लिहून धर्मांतर घोषणेचे समर्थन केले होते. यावरून मातंग समाजातील व्यक्तींनी धर्मांतर घोषणेच्या समर्थनार्थ जनजागृती केल्याचे
दिसून येते. येवला
परिषदेहून परत येत असताना अस्पृश्य समाजातील
मेघवाल (भंगी) जातीतील पुरोगामी लोकांनी नाशिक
येथे आंबेडकरांचे मनपूर्वक स्वागत
करून त्यांना चहापाणी व भोजन
दिले होते.
शीख धर्म
आंबेडकरांना आपल्या धर्मात येण्याविषयी आग्रह धरणारा पहिला
धर्म शीख धर्म होता. धर्मांतर घोषणेच्या
तीन-चार दिवसांनंतर अमृतसरहून सुवर्ण मंदिरांचे
उपाध्यक्ष सरदार दरिपसिंग ठोबिया
यांनी आंबेडकरांना तार पाठवून शीख धर्माचा स्वीकार करावा अशी विनंती केली होती. एवढेच नाहीतर अमृतसरहून
दरबार सिंग, गुरुमुख सिंग, तुलसी
सिंग, दिवाण सिंग, नारायण
सिंग, इंदरसिंग, तेज
सिंग, सुमेर सिंग इत्यादी शीख मंडळी
पुण्यातील अखिल महाराष्ट्र अस्पृश्य परिषदेकरिता आली
होती. परिषदेनंतर
आंबेडकर डॉ. पुरुषोत्तम
सोळंकी यांच्यासह शीखांच्या भजनाच्या
कार्यक्रमास गेले होते. मे
१९३६ मध्ये आंबेडकर नागपूरला आले असता
अमर सिंग धार व ईश्वर सिंग इत्यादी शीख पुढाऱ्यांनी
त्यांची
भेट घेऊन धर्मांतराविषयी चर्चा केली होती. मुंबईतील शीख
मिशनने मुंबईत भरणाऱ्या अखिल मुंबई इलाखा महार परिषदेसाठी
आपली नायगाव येथील जागा दिली होती. शिवाय ईश्वर सिंग, दरबार सिंग, केदार
सिंग, अमर सिंग इत्यादी शीख नेतेसुद्धा या
परिषदेस हजर होते. इतकेच नाही तर परिषदेस आलेल्या
अस्पृश्य प्रतिनिधींना भोजन
देण्याची व्यवस्था लाहोरच्या
अकाली दलाचे जत्थेदार ईश्वर सिंग व माटुंगा गुरुद्वार जत्था यांनी केली होती. यावरून शीख धर्मियांनी आंबेडकरांना आपल्या धर्मात आणण्यासाठी कसोसीने प्रयास
केल्याचे दिसून येते. आंबेडकरांनी शीख धर्म स्वीकारावा म्हणून
गुरुद्वार प्रबंधक कमिटीने मास्टर तारासिंग व शेटीयाबाबू यांच्या पुढाकाराने ‘दि सरब हिंदू शीख मिशन’
अमृतसरही संस्था स्थापन केली होती.
धर्मांतराच्या कार्यांसाठी व खालसा कॉलेजसाठी
या संस्थेतर्फे सुमारे सात लाख रुपयांचा निधी
उपलब्ध करून देण्यात आला होता.
नानकाना साहिब कमिटीचे अध्यक्ष जत्थेदार तेजसिंग हे खालसा महाविद्यालयास भेट
देण्यासाठी मुंबईत आले असता प्राचार्य कश्मीरसिंग व हरकिशन यांच्यासह त्यांनी
आंबेडकरांची भेट घेऊन धर्मांतराविषयी चर्चा केली होती.
शीख धर्मियांच्या अथक प्रयत्नामुळे आंबेडकर
सुद्धा काहीसे शीख धर्माकडे आकर्षित झाले
होते. त्याचाच एक भाग म्हणून ते शीख धर्माच्या कार्यक्रमाकरिता आपल्या सहकाऱ्यासह
खास अमृतसरला गेले होते. आंबेडकरांना धर्मांतर करायचेच असेल
तर त्यांनी शीख धर्माचाच स्वीकार करावा अशी योजना
हिंदू महासभेचे डॉ. बा. शी. मुंजे यांनी तयार केली होती. शंकराचार्य डॉ.
कूर्तकोटी हेसुद्धा आंबेडकरांच्या
शीख धर्म प्रवेशाबद्दलही अनुकूल होते.
परंतु आंबेडकरांचे सहकारी सोहनलाल
शास्त्री यांनी शीख धर्मातील अस्पृश्यांना मिळणाऱ्या
विषम वागणुकीविषयी माहिती सांगितल्यामुळे आंबेडकरांनी
शीख
धर्माचा स्वीकार करण्याचा विचार सोडून
दिला.
मुस्लिम धर्म
आंबेडकरांना
आपल्या धर्मात आणण्यासाठी मुस्लिमांनीसुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. खालीद गौबा
या धर्मांतरीत मुस्लिम खासदाराने त्यांना तार पाठवून मुस्लिम धर्म
स्वीकारण्याविषयी विनविले होते.
शिवाय बदायून येथे भरणाऱ्या मुस्लिम
परिषदेचे निमंत्रणही दिले होते.
नंतर त्यांनी पीर जमियत अली शहा व मौलाना
अब्दुला कसुरी यांच्यासह मुंबईत आंबेडकरांची भेट घेऊन धर्मांतराविषयी चर्चा केली होती. पंजाबमधील
अहमदिया पंथ, मुंबईच्या आगाखान पंथ, मौनथ उल इस्लाम या संस्थेचे सचिव, कलकत्त्याच्या मुस्लिम परिषदेचे
अध्यक्ष, ढाक्याचे नबाब ख्वाजा हबिबुल्ला मुस्लीम प्रतिनिधींनी आंबेडकरांच्या
धर्मांतर घोषणेचे स्वागत करून त्यांना मुस्लिम
धर्मात आणण्याचा प्रयत्न केला होता.
मुंबईमध्ये हकीम अबु युसुफ इसफदानी यांनी आंबेडकरांना ईदनिमित्त सामूहिक
प्रार्थनेसाठी आमंत्रित केले होते.
गांधीजींचे मुस्लिम धर्मांतरित पुत्र अब्दुला गांधी यांनीसुद्धा त्यांना मुस्लिम
धर्मात येण्याविषयी सुचविले होते.
यावरून अस्पृश्य समाजाला मुस्लीम धर्मात धर्म्मांतरित
करण्याकरिता मुस्लीम धर्मियांनी जबरदस्त प्रयत्न केले होते असे निदर्शनास येते. अमरावती
जिल्ह्यातील शिराळा येथे धर्मांतराच्या
समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत मौलाना शैदा इस्त्रायली संभली यांनी
अध्यक्षपद भूषविले होते.
पुण्याच्या परिषदेत ही मुस्लिमांची उपस्थिती लक्षणीय होती.
या परिषदेत अश्रफ
अली
सय्यद, गुलाम भीक नायंगर इत्यादी मुस्लिम
नेत्यांनी आंबेडकरांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास विनविले होते.
मे १९३६ मध्ये आंबेडकर नागपूरला आले असता डॉ. महमंद नबाब सिद्दिकी अली खान
इत्यादी मुस्लिम पुढाऱ्यांनी
त्यांची भेट घेऊन धर्मांतराविषयी चर्चा केली होती.
हैद्राबादच्या निजामानेसुद्धा अस्पृश्यांना सर्व प्रकारच्या आर्थिक व शैक्षणिक
सहकार्याचे आश्वासन देऊन इस्लाममध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता.
जबलपूरच्या सिद्दिक हुसेन खान यांनी आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारावा’ असे मत व्यक्त केले होते.
आंबेडकरांचे एक हितचिंतक, प्रसिद्ध
नाटककार मामा वरेरकर यांनी ‘आंबेडकरांनी
मुस्लिम धर्मच स्वीकारावा’ अशी
भूमिका घेतली होती. आंबेडकरी चळवळीतील एक निष्ठावंत
मुस्लिम कार्यकर्ते महमंद झकेरिया मनीयार यांनीसुद्धा आंबेडकरांना इस्लाममध्ये
आणण्याचा प्रयत्न केला होता.
मुंबईच्या परिषदेत ते जातीने हजर होते.
शिवाय परिषदेतील अस्पृश्य प्रतिनिधींना भोजन
देण्याची तयारीसुद्धा त्यांनी दर्शविली होती.
स्वयंपाकासाठी लागणारी मोठमोठी भांडीकुंडी व इतर सर्व
साहित्यसुद्धा परिषदेच्या मंडपात आणले होते.
परंतु आंबेडकरांनी त्यांना नम्रपणे नकार दिला होता.
मुस्लिमांच्या सर्वंकष प्रयत्नानंतरही आंबेडकर इस्लामकडे
वळले नाहीत कारण त्यांना भारतीयत्वाशी एकरूप असणारा धर्म पाहिजे होता मुस्लिम धर्म हिंदू
धर्माप्रमाणेच स्थितिशील आहे गतिशील नाही अशी
त्यांना ठामपणे वाटत असल्यामुळे आंबेडकरांनी मुस्लीम
धर्माचा पर्यायी धर्म म्हणून कधीच विचार केला नव्हता.
ख्रिश्चन धर्म
आंबेडकरांनी
आपल्या अस्पृश्य अनुयायांसह ख्रिश्चन धर्मात प्रवेश
घ्यावा यासाठी ख्रिश्चन धर्मीय सुद्धा प्रयत्नशील होते.
आंबेडकरांना ख्रिश्चन धर्माकडे वळविण्याकरिता आंबेडकरी चळवळीविषयी
सहानुभूती आणि अस्पृश्य समाजाविषयी असलेल्या मुंबईतील मिस
मिल्ड्रेड ड्रेशर या ख्रिश्चन महिलेने विशेष
प्रयत्न केले. धर्मांतर
घोषणेनंतर त्यांनी अस्पृश्यांच्या
लग्नसमारंभांना तसेच सभांना उपस्थित राहणे सुरू केले. आग्रीपाडा मिशनचे बिशप पिकेट
यांनी आंबेडकरांना दिलेल्या चहापार्टीच्या वेळीसुद्धा ड्रेशरबाई उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांच्यात ख्रिश्चन
धर्माविषयी विस्तृत चर्चा झाली होती.
धर्मांतर घोषणेचा पडताळा घेण्यासाठी मुंबईत
आलेल्या अमेरिकन मिशनरी डॉ. हेन्री
हिटस् क्रेन यांचा मुक्काम ड्रेशरबाईकडेच होता. त्यांनी क्रेन यांची आंबेडकरांशी
भेट घालून दिली होती. या भेटीत धर्मांतराविषयी चर्चा
झाली होती. ड्रेशरबाईनी आंबेडकरांना
मुंबईतील ख्रिश्चनांच्या वार्षिक परिषदेस उपस्थित राहण्याविषयी पत्रसुद्धा पाठविले
होते. मुंबईतील
मेथाडिस्ट एपिस्कोपल चर्चचे बिशप ब्रेनटेन थॉबर्न ब्रेडले यांनी धर्मांतर घोषणेचे स्वागत केले होते. अमेरिकेतील ‘झिऑन्स हेरॉल्ड’ या मेथाडिस्ट साप्ताहिकाचे संपादक
हार्टमन हेसुद्धा धर्मांतरांविषयी चर्चा करण्यासाठी मुंबईत आले होते. जॉन
स्टॅली हे ख्रिश्चन फादर तर
मुंबईतील महार परिषदेत उपस्थित राहून आंबेडकरांच्या धर्मांतर घोषणेचा आढावा घेत होते. मात्र ख्रिश्चन
धर्मात धर्मांतरित झालेल्या अस्पृश्य ख्रिश्चनांना मिळणाऱ्या
दुय्यम वागणुकीमुळे तसेच आंबेडकरांना भारतीय
भूमीतीलच धर्म
स्वीकारायचा असल्याने व ख्रिश्चन धर्म त्या व्याख्येत
बसू शकत नसल्याने तो स्वीकारणे
आंबेडकरांना योग्य वाटले नाही.
हिंदू धर्म
आंबेडकरांनी
हिंदू धर्मातच राहून अस्पृश्यांचा उद्धार करावा असे काही पुरोगामी
हिंदूंना वाटत होते तर काही हिंदू त्यांना विविध
पर्याय सुचवीत होते. शंकराचार्य
डॉ. कूर्तकोटी
यांनी त्यांना पत्र पाठवून हिंदू धर्माचा त्याग करू नये, अशी
आग्रहपूर्वक विनंती केली होती. परंतु आंबेडकरांना धर्मांतर
करावयाचेच असल्यास इतर कोणत्याही
धर्माचा स्वीकार न करता ब्राह्मो
समाज किंवा आर्य समाज यासारखा एखादा नवीन पंथ
स्थापन करावा अशी भूमिका त्यांनी घेतली होती.
आंबेडकरांच्या शीख धर्म प्रवेशाबद्दलही
डॉ. कूर्तकोटी
अनुकूल होते. हिंदू महासभेचे डॉ. बा. शी. मुंजे यांनीही आंबेडकरांनी शीख
धर्माचा स्वीकार करावा अशी योजना
तयार केली होती. मसुरकर महाराजांनी मात्र आंबेडकरांना धर्मांतर न करण्याविषयी
सुचविले होते. अहमदाबाद येथील आर्य समाजिस्ट
श्रुतबंधू शास्त्री यांनी आंबेडकरांना आर्य समाजाची दीक्षा घेण्याचे आवाहन केले होते. एवढेच नव्हे तर त्यांना आपला
व्याही बनविण्याचीही तयारी दर्शविली होती.
हुबळी येथील लिंगायत समाजाने आंबेडकरांना
त्यांची इच्छा असल्यास लिंगायत धर्मात प्रवेश देऊ असे सुचविले होते. आंबेडकरांचे
एक हितचिंतक डॉ. हरिसिंग गौर
यांनी त्यांना बौद्ध धर्म स्वीकारण्याविषयी सुचविले होते. वि. दा. सावरकर, डॉ. वि. का. किर्लोस्कर, डॉ. ना. झु. नांदूरकर यांनी आंबेडकरांना एखादा
नवीन धर्म स्थापन करण्याचा सल्ला दिला होता.
हिंदू धर्म सुधारकांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्य करून आंबेडकरांना अस्पृश्योद्धाराचा एक निश्चित टप्पा गाठून
दाखविल्यास कदाचित ते धर्मांतराचा विचार करणार नाहीत, अशी
विवेकी भूमिका आंबेडकरी चळवळीचे हितचिंतक निर्भीडकार अनंत हरी गद्रे यांनी घेतली होती. तर ‘धर्म
एक अनिष्ट गोष्ट आहे. जगात धर्मावाचून काहीही
अडत नाही. तेव्हा आपण कोणत्याही
धर्माचा स्वीकार करू नका.’ असा सल्ला
रॅशनालिस्ट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष रावसाहेब
जनारगिनराम यांनी पत्र पाठवून आंबेडकरांना दिला होता. यावरून हिंदू धर्मातील विविध गणमान्य व्यक्ती आंबेडकरांना
धर्मांतराविषयी विविध प्रकारचे सल्ले देत होती असे दिसून येते.
बौद्ध धर्म
आंबेडकरांच्या
धर्मांतर घोषणेकडे बौद्ध
धर्मीयांचेसुद्धा लक्ष वेधले होते.
बनारस येथील महाबोधी सोसायटीच्या
सचिवांनी त्यांना तार पाठवून ‘आपण
आपल्या अनुयायांसह बौद्ध
धर्माचा स्वीकार करावा’ असे
सुचविले होते. आंबेडकर बौद्ध
धर्म स्वीकारणार अशी बातमी टाइम्स ऑफ इंडियाने
दिनांक २६ ऑक्टोबर १९३५ च्या अंकात दिली होती. ती वाचून बौद्ध
धर्माचे गाढे अभ्यासक धर्मानंद कोसंबी
यांनी दुसऱ्याच दिवशी आंबेडकरांची भेट घेऊन बौद्ध धर्माविषयी चर्चा केली होती. त्यांच्या परळ येथील बौद्धविहारात झालेल्या एका प्रवचनास
आंबेडकरांचे सहकारी सीताराम शिवतरकर उपस्थित राहिले होते
एक इटालियन बौद्ध भिक्खू लोकनाथ
यांनीदेखील दिनांक १० जून १९३६ रोजी आंबेडकरांची मुंबईत भेट घेऊन
त्यांना बौद्ध धर्म स्वीकारण्याविषयी सुचविले होते. याचदरम्यान बडोदा
हिंदू महासभेचे सचिव पंडित आनंद प्रिय यांनी
आंबेडकरांची भेट घेऊन त्यांच्याशी धर्मांतर घोषणेविषयी
चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या दिल्ली
कार्यालयास पत्र पाठवून कळविले होते
की, “आंबेडकरांशी चर्चा केल्यानंतर ते
मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारतील असे वाटत नाही. तूर्तास त्यांचा कल बौद्ध धर्माकडे आहे. त्यांनी आपल्या
अनुयायांसह धर्मांतर केलेच तर ते बौद्ध
धर्माची दीक्षा घेतील. त्यांना तडकाफडकीने
धर्मांतर करण्याची घाईपण नाही. ते प्रथम आपल्या अनुयायांना प्रशिक्षित करतील व
त्यांचे मतपरिवर्तन झाल्यानंतर मोठ्या
समुदायाने धर्मांतर करतील.” पंडित
आनंद प्रिय यांनी आंबेडकरांविषयी केलेले हे विधान तंतोतंत
खरे ठरलेले दिसून येते.