डॉ बाबासाहेब
आंबेडकर द्वारा स्थापित
समाज समता संघाच्या जडणघडणीत महारेतरांचे योगदान
प्रस्तावना
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सर्वसमावेशक दृष्टीकोण असलेले एक विद्वान
समाजसुधारक होते. आपल्या आंबेडकरी चळवळीत त्यांनी महार या आपल्या स्वजाती
व्यतिरिक्त विविध जाती धर्म आणि पंथाच्या पुरोगामी व्यक्तींना सहभागी करून घेतले.
या महारेतर मंडळींनी सुद्धा मानापमान आणि हालअपेष्टा सहन करून आंबेडकरी चळवळीत
उल्लेखनिय कार्य केले. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता समाज संघातसुद्धा विविध
जाती धर्म आणि पंथातील सुधारक प्रवृत्तीच्या लोकांनी योगदान दिल्याचे स्पष्ट होते.
परंतु आंबेडकरी चळवळ ही केवळ महार लोकांची चळवळ आहे असा गैरसमज असल्याने
महारेतरांच्या कार्याकडे दुर्लक्ष झाले आहे. महारेतरांचे समता समाज संघाच्या
जडणघडणीत योगदान स्पष्ट करणे हा प्रस्तुत शोधनिबंधाचा उद्देश आहे.
समता समाज संघाची स्थापना
पंजाबमधील भाई परमानंद यांनी समाजात
समता प्रस्थापित करण्याकरिता स्थापन केलेल्या जातपाततोडक मंडळी या संघटनेपासून
प्रेरणा घेवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध जाती धर्म आणि पंथातील आपल्या सहकार्यांशी
चर्चा करून दिनांक ४ सप्टेंबर १९२७ रोजी मुंबई येथे ‘समता समाज संघा’ ची
स्थापना केली. या संघात विविध जाती धर्म आणि पंथातील स्पृश्य आणि अस्पृश्य महारेतरांनी
स्पृहणीय असे कार्य केले. किंबहुना महारेतरांच्या सक्रियतेमुळेच संघाने अल्पावधीच महाराष्ट्राच्या
सामाजिक जीवनात महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले होते.
संघाचे पदाधिकारी
समता समाज
संघाचे अध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर हे संघाच्या कार्यकारिणीतील एकमेव महार होते.
त्यांचा अपवाद वगळता बाकी उपाध्यक्ष- डॉ. आर. एन. भाईंदरकर, देवराव नाईक, सचिव- एस.
एस. गुप्ते, बी. व्ही. प्रधान, खजिनदार- आर. डी. कवळी, ऑडिटर्स-
डी. बी. सुभेदार, आर. एम. कर्णिक, कार्यकारी
मंडळ- एफ. डी. सिल्हव्हा, व्ही. आर. चोनकर,
डी. व्ही. प्रधान, पी. पी. ताम्हणे, आर. जी. प्रतापगिरी, जे. पी. मुळे, एन. व्ही. खांडके हे सर्व पदाधिकारी हे स्पृश्य होते.[1]
त्यातही उच्चवर्णीय समजले जाणारे ब्राह्मण बहुसंख्य होते. ह्यावरून डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांची सर्वसमावेशकता दृष्टीपथात येते. त्याचप्रमाणे संघात महारेतरांचे
असलेले स्थान स्पष्टपणे निदर्शनात येते.
संघाच्या प्रचारार्थ सभा
समता समाज संघाच्या प्रचार आणि प्रसारकरिता ठिकठिकाणी सभा घेण्यात आल्या.
त्या सभांमध्ये महारेतरांचा मोठा सहभाग होता. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली दिनांक
२२ ऑक्टोबर १९२७ रोजी मुंबईत देव्हारे यांचे घरी नाईक, मिरजकर,
अय्यर, जव्हेरी, पाठारे,
पानसरे, शिवतरकर, मिंढे, प्रधान, खांडके, मुळे,
देशमुख, कदम, ताम्हणे,
कवळी, प्रतापगिरी इत्यादी शंभर महारेतर मंडळीच्या
उपस्थितीत झालेली सभा,[2] द. वि. प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १३ ऑगस्ट १९२८ रोजी मुंबईतील
क्लार्क रोड येथील सभा, दे. वि. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली
दिनांक ७ ऑक्टोबर १९२८ रोजी मुंबईतील कल्याण येथे शिवतरकर, प्रधान,
कदम यांच्या उपस्थितीत पार पडलेली सभा, केशवराव
लोणकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १४ डिसेंबर १९२८ रोजी मुंबईतील कुर्ला येथील सभा, नानासाहेब लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २८ डिसेंबर १९२८ रोजी लोणकर, फाळके, चव्हाण यांच्या उपस्थितीतील सभा, सेवकबुवा पुणेकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २३ फेब्रुवारी १९२९ रोजी मुंबईत
नवगिरे, करंडे, कवठेकर, सकाटे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेली सभा, द. वि.
प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २० फेब्रुवारी १९३२ रोजी वरळी मुंबई येथे मोहिते,
जावळे, पवार, गुडेकर,
गायकवाड उपस्थितीत पार पडलेली सभा, देवराव
नाईक यांच्या अध्यक्षतेखाली दादर मुंबई येथे खांडके, सहस्रबुद्धे,
लेले, वैद्य, ठाकरे,
मराठे, प्रधान, पगारे उपस्थितीतील
सभा. वर उल्लेखित सर्व सभेत महारेतर मंडळींनी समता समाज संघाच्या कार्याचा जोरदार
प्रचार-प्रसार केला.
याशिवाय अस्पृश्य समाजाला संघाच्या कार्याची माहिती मिळावी म्हणून एक
हस्तपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली त्यावर आंबेडकरांसह सहस्रबुद्धे, कवळी, ताम्हणे, नाईक, खांडके, भा. वि. प्रधान, द. वि.
प्रधान, जी. आर. प्रधान, भा. रा. प्रधान
तसेच आर. एन. भाईंदरकर यांची नावे होती.[3]
याशिवाय संघातर्फे रोटीबंदी व बेटीबंदी निर्मूलनाच्या कार्यक्रमाची माहिती
देण्यासाठी संघाचे सविच भा. वि. प्रधान यांनी एक पत्रक काढले होते.
समता वृत्तपत्र
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समाज समता
संघाच्या प्रचार-प्रसाराकरिता समता हे वृत्तपत्र सुरु केले. समता हे संघाचे
मुखपत्र होते. देवराव नाईक हे आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी संताचे संपादक होते. नागपूरच्या
वा. ना. घोरपडे यांनी ‘समता’ या वृत्तपत्राच्या पहिल्याच अंकात ‘हिंदू संघटन व
समाज समता संघ’ हा लेख लिहून संघाचे समर्थन केले होते. तर
अमरावतीच्या डॉ. नीळकंठ दत्तात्रय सबनीस यांनी ‘समाज समता
संघ’ देशास उन्नतीच्या मार्गाकडे नेवो, अशी अपेक्षा व्यक्त केली होती
सहभोजनाचा कार्यक्रम
समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी कौटुंबिक मिश्र सहभोजनाचे आयोजन करणे
हा संघाचा एक उपक्रम होता. या उपक्रमात स्पृश्य-अस्पृश्य मिळून वेवेगळ्या दिवशी
विविध जाती धर्म आणि पंथाच्या सहकार्यांच्या घरी जावून सामूहिक सहभोजन करीत असत.
त्यानुसार प्रथम कमलाकांत चित्रे व कदम यांच्या घरी सहभोजन करण्यात आले. त्यानंतर गंगाधर
सहस्रबुद्धे यांच्याकडे सहभोजन झाले. ह्यात सीताराम शिवतरकर, केशव सीताराम ठाकरे, न. वि. खांडके, दे. वि. नाईक, मो. सौ. चौधरी, मो.
वा. देशमुख, गोविंदजी परमार, कृ. म. काळोखे,
र. दे. बनकर, आईसेकर, राममूर्ती
प्रतापगिरी व सौ. प्रताप गिरी, भा. वि. प्रधान, द. वि. प्रधान व सौ. मनोरमा प्रधान, भास्करराव
कद्रेकर, कमलाकांत चित्रे इत्यादी मंडळी उपस्थित होती.
शिवतरकरांच्या घरीसुद्धा दिनांक २६ सप्टेंबर १९२९ रोजी सहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.
अनंतराव चित्रे यांनी आपल्या पोलादपूर येथील घरी सहभोजन दिले. या सहभोजनास केशवराव
चांदे, बापूसाहेब देशमुख, यशवंतराव
महादेव कुलकर्णी, यशवंत आप्पाजी देशमुख, चिंतामण गणेश, देशमुख, मनोहर गोविंद
टिपणीस, शांताराम रघुनाथ पोतनीस, रघुनाथराव
कारखानीस, सदाशिव गोविंद देशपांडे इत्यादी मंडळी उपस्थित होती.[4]
नाशिक येथे दिनांक १५ डिसेंबर १९२८ रोजी प्रा. सबनीस यांच्या घरी झालेल्या
सहभोजनास दीक्षित, आर. जी. प्रधान, जोग,
सबनीस, जनुभाऊ अभ्यंकर, जबलपूरकर,
दौलतराव पाटील, एस. डी. वाड, पाटणकर, पोतनीस वकील, वैद्य
वकील इत्यादी मंडळी सहभागी झाले. दिनांक १७ फेब्रुवारी १९२९ रोजी कृष्णराव गोविंदराव
पाताडे यांच्या घरी सहभोजन आयोजित करण्यात आले त्यात पालकर वकील, सुभेदार घाटगे, लक्ष्मणराव भिडे, पां. ना. राजभोज, उपासक व सौ. लक्ष्मीबाई उपासक,
मघाळे, डिखळे इत्यादींनी सहभाग घेतला. दिनांक
२७ ऑगस्ट १९२९ रोजी पनवेल येथे विष्णू भागोजी पोशिरकर यांच्या घरी सहभोजन झाले.
देवराव नाईक, द. वि. प्रधान, एस. एस. गुप्ते,
रा. दा. कवळी, भास्करराव कद्रेकर आदींनी त्यात
भाग घेतला. संघाच्या सहभोजनाच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमात महारेतरांनी सक्रिय
सहभाग घेतल्यामुळे थोड्याफार प्रमाणात का स्पृश्य-अस्पृश्य यांच्यातील भेदभाव कमी
होण्यास मदत होऊन त्यांच्यात समानतेचे वातावरण निर्माण झाले.
यज्ञोपाविताचे वाटप
समाजात समता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने संघाच्यावतीने इतरही अनेक
उपक्रम राबविण्यात येत होते. त्यापैकी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे अस्पृश्यांना यज्ञोपाविताचे
वाटप करणे होय. यामध्येसुद्धा महारेतरांचा उल्लेखनीय पुढाकार होता. या उपक्रमात
पांडुरंगशास्त्री पालये व प्रसिद्ध साहित्यिक मामा वरेरकर हे स्वत:च्या हस्ते अस्पृश्यांना
जानवे घालीत असत. २० ऑगस्ट १९२९ रोजी दामोदर हॉल परळ येथे वेदोक्त श्रावणी
समारंभात देवराव नाईक यांनी अस्पृश्यांना विधिवत यज्ञोपाविते दिली. याप्रसंगी डॉ.
गोपिनाथ प्रधान व भास्करराव कद्रेकर यांनी अग्निहोत्री म्हणून कार्य केले होते.[5]
मनमाड येथील पवार यांच्या घरी झालेल्या श्रावणीच्या कार्यक्रमात अनेक ब्राह्मण मंडळी
सहभागी झाली होती. इ. स. १९३१ मध्ये दरवर्षी प्रमाणे दामोदर हॉल येथे श्रावणी
समारंभ होणार असल्याचे आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी देवराव नाईक यांनी जाहीर केले होते.
वैदिक पद्धतीने विवाह
समाजतील विषमता नष्ट करण्याकरिता संघाने अस्पृश्यांचा विवाह वैदिक
पद्धतीने करण्याचे त्याचप्रमाणे व आंतरजातीय विवाहाचे आयोजन करण्याचे उपक्रमसुद्धा
राबविला होते. दिनांक ३० मार्च १९२९ रोजी परळ येथे गोपाळराव रोकडे यांचा वैदिक
पद्धतीने विवाह करण्यात आला. याप्रसंगी आचार्य म्हणून मो. वा. देशमुख व अग्निहोत्री
म्हणून भास्करराव कद्रेकर यांनी कार्य केले होते. प्रधान बंधू, कवळी, पाटणकर इत्यादी संघाची मंडळी या विवाहास
उपस्थित होती. दामोदर हॉलमध्ये केशव आड्रेकर व विठाबाई तिडेकर यांच्या वैदिक
पद्धतीने विवाह करण्यात आला. डॉ . पुरुषोत्तम सोळंकी, सी. के.
बोले, देवराव नाईक, द. वि. प्रधान,
भास्करराव कद्रेकर, द. मो. चित्रे, सीताराम शिवतकर इत्यादी मंडळी त्या विवाहास उपस्थित होती.[6]
शांताबाई व तुकाराम यांचा असाच एक विवाह वडाळा मुंबई येथे दिनांक २४ सप्टेंबर १९२९
रोजी देवराव नाईक, प्रधान बंधू, ताम्हणे,
कवळी, कद्रेकर यांच्या उपस्थित पार पडला.
सुंदरराव वैद्य यांनी या विवाहात आचार्याचे कार्य केले होते.
आंतरजातीय विवाह
समाज समता संघाच्या आंतरजातीय
विवाहाच्या आवाहनानुसार इ. स. १९२८ च्या विजयादशमीला पुण्यात दत्ताराम रंगनाथ
उपासक या मराठा जातीतील संघाच्या सदस्याचा लक्ष्मीबाई आबाजी कांबळे या अस्पृश्य
जातीतील मुलीशी आंतरजातीय विवाह झाला. हा विवाह घडवून आणण्यास पोतनीस व लाड यांनी
प्रयत्न केले. केशवराव जेधे यांनी वधूवरास २० रुपयांचा अहेर केला होता. संघाच्या
आवाहनानुसार असईकर वकील, कवळी, कंगले, तांबट, कडवेकर, राजबिंड, जाधव, प्रधान,
पटेल, रामनाथ शिवनाथ वकील, गणपत काळू सोनार, हरी गणेश अहीर, जावळे, ठाकूर, देवराव नाईक
इत्यादींनी लक्ष्मीबाईस दिवाळीची भाऊबीज म्हणून आर्थिक मदत केली होती.[7]
दिनांक ७ फेब्रुवारी १९२९ रोजी पुण्यात गायकवाड्यातील संघाच्या सभेत उपासक यांच्या
आंतरजातीय विवाहाप्रीत्यर्थ त्यांचे अभिनंदन करण्यात आले. भुस्कुटे यांच्या
अध्यक्षतेखालील या सभेस आंधळे, कारंडे, घाटगे, राजभोज इत्यादी मंडळी उपस्थित होती.
गणेशोत्सवात पूजेचा अधिकार
तत्कालीन समाजामध्ये अस्पृश्यांना
ज्या प्रमाणे मंदिरात प्रवेश किंवा मूर्ती पूजेचा अधिकार नव्हता त्याचप्रमाणे
सार्वजनिक गणेशोत्सवात सुद्धा प्रवेश वा पूजेचा अधिकार नव्हता. दादरच्या सार्वजनिक
गणेशोत्सवात अस्पृश्यांना पूजेचा अधिकार मिळावा म्हणून संघातर्फे आंबेडकरांसह नाईक, बोले, ठाकरे, गोपीनाथ प्रधान, कद्रेकर, प्रधान
बंधू, खांडके, असईकर वकील, कवळी, केळूसकर गुरुजी यांनी प्रयत्न केले होते.[8]
ग्रंथप्रकाशन
समाज समता संघाने एस. डी. नाडकर्णी
यांचा ‘यंग इंडिया’ या वृत्तपत्रातील लेखसंग्रह ग्रंथ स्वरूपात On
Ram Rajya and the slave mentality the greatest Hindu of the age from a critical
Co-religionist या नावाने प्रकाशित केला. देवराव नाईक या ग्रंथाचे प्रकाशक तर
भास्करराव कद्रेकर हे मुद्रक होते.[9]
दंगलग्रस्तांसाठी कार्य
मुंबईत झालेल्या तत्कालीन
दंगलीतसुद्धा संघाने शांततेसाठी प्रयत्न केले होते. संघातील भा. वि. प्रधान तेच द.
वि. प्रधान, फणसे, गडकरी, शिवतरकर, कवळी आदींनी मोठ्या
हिमतीने दंगलग्रस्त लोकांना मदत करून धीर देण्याचे कार्य केले होते.[10]
संघास आर्थिक मदत
समाज समता संघ राबवित असलेल्या अनेक उपक्रमांना यशस्वी करण्यासाठी आर्थिक
पाठबळाची गरज होती. त्याकरिता पुण्याच्या सिधेराम अण्णा मानूरकर यांनी संघास सहा
रुपयांची देणगी दिली होती. त्याचप्रमाणे प्रचार-प्रसार कार्यासाठी संघाने पन्नास
रुपयांचा निधी स्थापन केला होता. त्यात एस. एस. गुप्ते, सीताराम
शिवतरकर, गोपीनाथ प्रधान, भा. वि. प्रधान,
स. बा. शारंगपाणी, ल. र. शिंदे, अनंतराव चित्रे इत्यादींनी आर्थिक साहाय्य केले होते.[11]
एवढे कमी आर्थिक पाठबळ असताना सुद्धा समाज समता संघाने आपल्या सामाजिक कार्यात कसर
केली नाही. प्रसंगी संघातील स्पृश्य-अस्पृश्य महारेतरांनी जवळचे पैसे खर्च करून
निस्वार्थपाने समाजात समता प्रस्थापित करण्याचे कार्य सुरू ठेवले होते.
पुणे शाखा
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे सुपुत्र श्रीधरपंत टिळक यांचे समाज समता
संघात अनन्य साधारण कार्य होते. त्यांनी संघाच्या सामाजिक कार्याने प्रेरित होऊन
पुण्यातील आपल्या गायकवाड वाड्यात संघाची शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेतला.[12]
त्यासाठी स्वत: आंबेडकर, सहस्रबुद्धे, नाईक,
कद्रेकर, शिवतरकर, द. वि.
प्रधान, भा. वि. प्रधान या आपल्या महारेतर सहकार्यांसह पुण्याला
गेले होते. याप्रसंगी श्रीधरपंतांनी सहभोजनाचे आयोजन केले होते. त्यांच्या पत्नी
शांताबाई यांनी स्वत: स्वयंपाक बनविला होता तर श्रीधरपंतांनी स्वहस्ते उपस्थितांना
जेवण वाढले होते. दिनांक ८ एप्रिल १९२८ रोजी संघाची शाखा स्थापन केल्यानंतर
त्यांनी संघाच्या कार्यास जोमाने सुरुवात केली होती. एवढेच नाही तर नाशिक, नगर, सातारा येथे सुद्धा संघाच्या शाखा उघडण्याची
त्यांची योजना होती. पण पुढे दिनांक २५ मे १९२८ रोजी त्यांनी आत्महत्या केल्यामुळे
संघाच्या कार्यास खीळ बसली. मृत्युपूर्वी आंबेडकरांना पाठविलेल्या पत्रात
श्रीधरपंत म्हणतात, ‘समाज समता संघाचे अंगीकृत कार्य नेटाने
पुढे चालू ठेवण्यासाठी सुशिक्षित व समाजसुधारणावादी तरुणांचे लक्ष या चळवळीकडे अधिकाधिक
वेधून घेणे आवश्यक आहे, महाराष्ट्रीय तरुणांनी मनावर घेतल्यास अस्पृश्यता
निवारणाचा प्रश्न अवघ्या पाच वर्षात सुटेल. माझा बहिष्कृत बांधवांच्या तक्रारी प्रत्यक्ष
भगवान श्रीकृष्णाचे चरणारविंदी सादर करण्यासाठी मी पुढे जात आहे.’ यावरून श्रीधरपंतांची संघातील कार्याची तळमळ दिसून येते.[13]
श्रीधरपंतांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेवर संघाचे उपाध्यक्ष म्हणून
टिळकांचे दुसरे सुपत्र रामचंद्र टिळक यांची निवड करण्यात आली. संघाची पुणे शाखेची
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे होती- अध्यक्ष- श्रीपतराव शिंदे, उपाध्यक्ष-
एस. जी. वझे, रामचंद्र बळवंत टिळक, आर.
के. कदम, खजिनदार- शांताराम पोतनीस, चिटणीस-
पां. ना. राजभोज, सभासद- ए. एस. गुप्ते, मोरे वकील, के. जी. लिमये, विनायकराव
भुस्कुटे, सी. वि. लळीत, केशवराव जेधे,
डॉ. एल. एम. सत्तूर, एम. जी. डोंगरे, लक्ष्मणराव ओघळे, धुंडीरामपंत ठेंगडी, डी. डी. समर्थ, गोपाळराव कारंडे, ल. र. भिडे, सुभेदार घाटगे, आर.
वाय. साळुंके, के. के. सकट.[14]
पुण्यातील संघाच्या कार्यकारिणीत सुद्धा महारेतरांचाच अधिक सहभाग होता. श्रीधरपंतांच्या
निधनाची शोकसभा संघाच्या वतीने दादर मुंबई येथे घेण्यात आली. या सभेस केशवराव
ठाकरे, माम वरेरकर, पी. आर. लेले,
देवराव नाईक, सी. के. बोले, जोगळेकर, फासे, प्रधान बंधू,
कवळी, खांडके, कद्रेकर,
जाधव, उत्तमराव कदम, गोपीनाथ
प्रधान, द. वि. प्रधान, भा. वि. प्रधान
इत्यादी मंडळी उपस्थित होती. श्रीधरपंत टिळक यांना अधीक आयुष्य लाभले असते तर समाज
समता संघाच्या कार्याला अधिक गती मिळाली असती यात शंका नाही.
मूल्यमापन
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन
केलेला समाज समता संघ हा तत्कालीन सामाजिक अभियांत्रिकीचा एक अभिनव असा प्रयोग
होता. जातीअंतासाठी आयुष्यभर प्रयत्न करणाऱ्या डॉ आंबेडकरांच्या या अभूतपूर्व
उपक्रमात त्यांच्या महारेतर सहकाऱ्यांनी तन मन धनाने सहकार्य केले. समता
वृत्तपत्र, यज्ञोपवीताचे वाटप, वैदिक पद्धतीचा विवाह, आंतरजातीय विवाह, सहभोजन,
गणेशोत्सवात पूजेचा अधिकार, दंगलग्रस्तांना सहकार्य ग्रंथप्रकाशन, संघाची पुणे
येथील शाखा किंवा संघास आर्थिक मदत असो. अशा
प्रकारे आंबेडकरी चळवळीतील विविध जाती धर्म आणि पंथातील महारेतर अनुयायांनी
समता संघात उल्लेखनीय योगदान दिले त्यामुळे समाज समता संघ भारताच्या सामाजिक
इतिहासात एक मैलाचा दगड सिद्ध झाला आहे.
[1]
खैरमोडे चां.भ., भीमराव रामजी आंबेडकर,
बौद्धजन पंचायत समिती मुंबई, आवृत्ती १, १९५८, खंड २, पृ. १५७
[2]
बहिष्कृत भारत, दिनांक ४ नोव्हेंबर १९२७
[3]
खैरमोडे, उपरोक्त, पृ. १५८
[4]
जनता, दिनांक २७ फेब्रुवारी १९३२
[5]
बहिष्कृत भारत, दिनांक ६ सप्टेंबर १९२९
[6]
सुरवाडे, समकालीन सहकाऱ्यांच्या आठवणीतील
डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकवांग्मय गृह मुंबई, आवृत्ती २, २००७ पृ. ३४
[7]
समता, दिनांक ३० नोव्हेंबर १९२८
[8]
समता, दिनांक २१ सप्टेंबर १९२८
[9]
खैरमोडे, उपरोक्त, पृ. १६६
[10]
समता, दिनांक 22 फेब्रुवारी १९२९
[11]
समता, दिनांक ७ सप्टेंबर १९२८
[12]
समता, दिनांक १३ जुलै १९२८
[13]
जाधव शत्रुघ्न, श्रीधरपंत तिलक और
बाबासाहाब डॉ अम्बेडकर संस्करण १, सम्यक प्रकाशन दिल्ली २०१२, पृ. १५५
[14]
समता, दिनांक १० ऑगस्ट १९२८