रविवार, १४ फेब्रुवारी, २०२१

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वसमावेशक समता वृत्तपत्र

 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वसमावेशक समता वृत्तपत्र


प्रस्तावना    

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची दलितोद्धाराची चळवळ ही एक सर्वसमावेशक चळवळ होती. या चळवळीत ना केवळ दलित अस्पृश्य तर इतरही अनेक जाती धर्म पंथाच्या लोकांचा सहभाग होता. आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून अस्पृश्य समाजाच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आंबेडकरांनी अनेक वृत्तपत्रे सुरु केली. प्रथम मूकनायक हे वृत्तपत्र सुरु केले परंतु ते अल्पावधीतच बंद पडले त्यानंतर बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले परंतु ते सुद्धा फार काळ तग धरू शकले नाही. याच काळात आंबेडकरांनी समाज समता संघ या सर्वसमावेशक संघटनेची स्थापना केली आणि संघाचे मुखपत्र म्हणून समता हे नवी वृत्तपत्र सुरु केले. या वृत्तपत्रात आंबेडकरांचे सर्व जाती धर्म आणि पंथातील सहकाऱ्यांचे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे परंतु आंबेडकरांनी सुरु केलेले समता हे वृत्तपत्र हे फक्त महारांचे वृत्तपत्र आहे आणि त्यात फक्त महारांचाच सहभाग आहे या गैरसमजुतीमुळे या वृत्तपत्रातील महारेतरांच्या कार्याचे फारसे अवलोकन झाले नाही. त्यामुळे समताच्या जडणघडणीत महारेतरांचे योगदान स्पष्ट करणे हा या शोधनिबंधाचा उद्देश आहे.

समता वृत्तपत्राची सुरुवात

      इ. स. १९२७ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक अभियांत्रिकीचा एक अभूतपूर्व प्रयोग करून स्वतःच्या अध्यक्षतेखाली समाज समता संघाची स्थापना करण्यात आली. या संघाचे वैशिष्ट्ये म्हणजे याचे अध्यक्ष डॉ आंबेडकर हे जरी अस्पृश्य महार असले तरी बाकीचे सर्व पदाधिकारी हे महारेतर होते. संघाचे मुखपत्र म्हणून दिनांक २९ जून १९२८ रोजी समता या नावाने नवीन वृत्तपत्र सुरू करण्यात आले. हे वृतपत्र सुरू करण्याकरिता आंबेडकरांनी फक्त मार्गदर्शन केले होते तर वृत्तपत्राचे संपादक, मुद्रक, प्रकाशक, व्यवस्थापक ही सर्व जबाबदारी त्यांनी आपल्या अतिशय निकटच्या स्पृश्य निष्ठावंत सहकारी मंडळींकडे सोपविली होती.

देवराव नाईक 

      देवराव नाईक हे गोवर्धन ब्राह्मण जातीतील आंबेडकरांचे स्पृश्य सहकारी समताचे संपादक आणि मुद्रक होते.[1] जातीने ब्राह्मण असलेले नाईक समताचे संपादकत्व तटस्थपणे सांभाळू शकतील काय? अशी शंका त्यावेळी अनेकांच्या मनात निर्माण झाली होती. दिनांक २९ जून १९२८ च्या समताच्या पहिल्याच अंकात मुंबईच्या शंकरराव अनंतराव कदम यांनी समता हे काय थोतांड आहे?’ हे पत्र पाठवून समताचे संपादक देवराव नाईक हे समताची धुरा समर्थपणे सांभाळू शकतील काय? समता प्रस्थापित करण्याच्या मार्गात त्यांचे ब्राह्मणत्व येणार नाही काय?’ अशा प्रकारची शंका उपस्थित केली होती. देवराव नाईक यांनी याच अंकात आमचा हवाला मोठाया शीर्षकाखाली कदमांच्या पत्रास उत्तर देऊन संपादकाच्या जातीमुळे जर कदम यांच्या मनात शंका निर्माण होत असेल तर त्यांना आम्ही आंबेडकरांच्या नावाची खात्री देऊन समतेविषयी अविश्वास बाळगण्याचे काहीच कारण नाही’, असे स्पष्टपणे सांगितले होते.[2] आंबेडकरांचे एक स्पृश्य सहकारी गंगाधर नीळकंठ सहस्रबुद्धे यांनी समताच्या दिनांक १३ जुलै १९२८ च्या अंकात थोतांड नव्हे, थोतांडांचा काळहा लेख लिहून कदमांच्या पत्रास उत्तर देऊन नाईकांचा पक्ष घेतला होता. ब्राह्मणेतर चळवळीतील एक पुढारी उत्तमराव कदम यांनी दिनांक १० ऑगस्ट १९२८ अंकात समता व ब्राह्मणेतर चळवळहा लेख लिहून देवराव नाईक हे जन्माने ब्राह्मण असले तरी वृत्तीने मात्र ब्राह्मणेतर आहेत. ते समतेच्या बाबतीत विश्वासघात करतील असा अविश्वास दाखविणे चुकीचे आहेअसे विचार व्यक्त करून नाईकांची बाजू उचलून धरली होती. पुण्याच्या लक्ष्मण रघुनाथ भिडे यांनीसुद्धा दिनांक २९ जून १९२८ च्या अंकात पत्रिकेची ध्येयसिद्धी समताहा लेख लिहून देवराव नाईक यांच्या संपादकत्वाखालील ब्राह्मण-ब्राह्मणेतर पत्रिकेप्रमाणेच समता हे वृत्तपत्र समाजात समता निर्माण करणार अशी ग्वाही दिली होती.[3]

समताचा प्रचार-प्रसार

      समताच्या पूर्वी देवराव नाईक ब्राह्मण-ब्राह्मणेतर हे वृत्तपत्र चालवीत होते. समता सुरू झाल्यानंतर ते बंद पडले. समताच्या दिनांक २७ जुलै १९२८ च्या अंकात नाईक यांनी ब्राह्मण-ब्राह्मणेतरांच्या वर्गणीदारांना विनंती करून वर्गणीच्या मुदतीपर्यंत समता पत्र पाठविण्याची व्यवस्था केली जाईल असे स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे ज्यांची ब्राह्मण-ब्राह्मणेतर पत्राची वर्गणी शिल्लक होती. त्यांना पैशांची भरपाई होईपर्यंत नाईकांनी समताचे अंक पाठवून समताचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला होता. ब्राह्मण-ब्राह्मणेतरांच्या आश्रयदात्यांनी समता पत्राससुद्धा आश्रय द्यावा व वर्गणीदारांनी समतेचेसुद्धा वर्गणीदार व्हावे अशी विनंती नाईक यांनी केली होती.[4] अशाप्रकारे नाईकांनी समता ह्या वृत्तपत्रास भरभराटीस आणण्याचा प्रयत्न केला होता. समतातील नाईकांच्या कार्याविषयी प्रतिक्रिया देताना नाशिकच्या ज्ञानोदय या पत्राने देवराव नाईक यांच्या संपादकत्वाखाली निघत असलेले ब्राह्मण-ब्राह्मणेतर हे पत्र बंद पडले असले तरी त्यांच्याच संपादकत्वाखाली निघणारे समता हे पत्र ब्राह्मण-ब्राह्मणेतर या पत्राचा नवा अवतार आहे.असे मत व्यक्त केले होते.

नाईक-सावरकर वाद

      देवराव नाईक समताची प्रतिष्ठा राखण्याचा सतत प्रयास करीत होते. विनायक दामोदर सावरकर यांनी समतास आमचा माणूसहे पत्र पाठवून आपण सामाजिक समानतेच्या विरोधात आहो अशी टीका नेहमी समतेत केली जाते. ती रास्त नसून मला जरी जातिभेद नको असला तरी आज हिंदुत्व हवे आहेअसे विचार मांडले होते. देवराव नाईक ह्यांनी त्याच अंकात सावरकरांच्या पत्राला सावरकर हे डोक्याने जितके आमचे वाटतात तितके हृदयाने अद्याप आमचे बनले नाहीतअसे उत्तर दिले होते.[5] समतात रंगलेल्या या सावरकरवादाचा  नाईक यांनी समर्थपणे  सामना केल्याचे दिसून येते.

भालचंद्र विठ्ठल प्रधान

      आंबेडकरांचे दुसरे एक स्पृश्य सहकारी भालचंद्र विठ्ठल प्रधान यांनीसुद्धा समताच्या बाबतीत महत्त्वपूर्ण कार्य केले होते. ते या वृत्तपत्राचे प्रकाशक व व्यवस्थापक म्हणून काम पाहात होते. याखेरीज त्यांनी समतात वेळोवेळी लिखाणसुद्धा केले होते. समताच्या दिनांक १० ऑगस्ट १९२८ च्या अंकात प्रधान यांनी अद्वैतवादी पंडित व द्वैतवादी संन्यासीहा लेख लिहून त्यात पंडित मदन मोहन मालवीय व शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांची एका पत्राला दिलेली मुलाखत प्रसिद्ध केली होती. दिनांक २२ फेब्रुवारी १९२९ च्या अंकात त्यांचा अस्पृश्य वर्ग आणि स्वराज्यहा लेख प्रसिद्ध होऊन त्यात स्वराज्याच्या धामधुमीत अस्पृश्य मागासलेल्या वर्गाकडे दुर्लक्ष होत आहे तेव्हा अस्पृश्यांना लक्षात घेऊन स्वराज्याचा विचार करावाअशा प्रकारचे मत त्यांनी मांडले होते. दिनांक २८ डिसेंबर १९२८ च्या अंकात प्रधान यांचा लोकशाहीसंबंधी काही अनुमानेहा लेख प्रकाशित झाला होता. समताचा प्रचार-प्रसार व्हावा म्हणून दिनांक २ फेब्रुवारी १९२९ रोजी वालपाखाडी येथे आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेतसुद्धा प्रधान प्रामुख्याने उपस्थित होते.[6] समताच्या जडणघडणीत प्रधान यांचा मोठा वाटा होता. आंबेडकरांचे एक सहकारी भास्कर रघुनाथ कद्रेकर यांनीही समताच्या प्रसारार्थ झालेल्या सभांना उपस्थित राहून समताच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

समता मधील लेखनकार्य

आंबेडकरी चळवळीतील विविध जाती धर्म आणि पंथाच्या अनुयायी, कार्यकर्ते, सहकारी आणि हितचिंतकांनी समता या वृत्तपत्रात लेख, कविता, पत्र आणि प्रश्न इत्यादींच्या माध्यामतून लेखनकार्य केलेले दिसून येते. द. वि. प्रधान यांनी अस्पृश्यांना वेगळा मतदारसंघ का?, गंगाधर सहस्रबुद्धे यांनी थोतांड नव्हे थोतांडांचा काळ, रा. दा. कवळी यांनी आवश्यकता व उच्चनिच्च भाव, उत्तमराव कदम यांनी समतेचा उदय, वाचा व विचार करा, वा. न. घोरपडे यांनी समता व वर्गकलह, टिळक घराण्याची पुण्याई, महादेव सीताराम मुंडले यांनी समतेविषयी शहाण्यांच्या वेडगळ कुशंका, प्रा. नि. के. भागवत यांनी समाज समतेशिवाय तरणोपाय नाही. यशवंत मोरेश्वर नानल यांनी शुद्धीचा अशुद्ध पाया, मर्मावर घाव घाला. डॉ. एन. डी. सबनीस यांनी समाज समता संघ व आर्य समाज, लक्ष्मण रघुनाथ भिडे यांनी हिंदूंची नवी व्याख्या, पत्रिकेची ध्येयसिद्धी, समता आवश्यक अनिवार्य असते. माणुसकीच्या पायावर, म. जोतिबांचा पुतळा, शंकरराव कदम यांनी     समता हे काय थोतांड आहे?, आणि वि. दा. सावरकर यांनी आमचा माणूस[7] हा लेख लिहून समतामध्ये आपले योगदान नोंदविले होते.

श्रीधरपंत टिळक

      आंबेडकरांचे एक परम स्नेही, आंबेडकरी चळवळीचे हितचिंतक, समाज समता संघाचे पुणे शाखेचे पदाधिकारी, लोकमान्य टिळक यांचे सुपुत्र श्रीधरपंत टिळक हेसुद्धा समताच्या बाबतीत अतिशय आग्रही होते. परंतु समताला प्रारंभ होण्याच्या आधीच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांचे निधन शुक्रवार या दिवशी झाले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ समताच्या प्रसिद्धीचा दिवस शुक्रवार ठेवण्यात आला होता. आत्महत्या करण्यापूर्वी श्रीधरपंतांनी आंबेडकरांना पाठविलेले पत्र समताच्या पहिल्याच अंकात प्रकाशित करण्यात आले होते. श्रीधरपंतांच्या रूपाने टिळकांच्या घराण्यात पुण्याईचा नवीन झरा निर्माण झाला होता. पण त्यांचा मृत्यू म्हणजे शिवरायांचा मृत्यू, संभाजी महाराजांचा मृत्यू, पानिपतच्या संग्रामाचा शेवट या अनर्थ परंपरेतील श्रीधरपंतांचा मृत्यू हा नवा अनर्थ होय असे विचार नागपूरच्या वा. न. घोरपडे यांनी व्यक्त केले होते.[8] श्रीधरपंत टिळक हे अधिक काळ जगले असते तर निश्चितच समता वृत्तपत्र व एकूणच संपूर्ण आंबेडकरी चळवळ अधिक बळकटपणे उभी राहिली असती. 

समतास आर्थिक मदत

समता या वृत्तपत्रास अनेकांनी आर्थिक सहकार्य केले होते त्यात भा. वि. प्रधान यांनी २ रुपये, लक्ष्मण रघुनाथ भिडे यांनी २५ रुपये,  स. शि. खैरे यांनी ५ रुपये, स. वा. शारंगपाणी ५ रुपये, लिलाचंद अमीरचंद मोदी यांनी ५ रुपये,  न. वी. खांडके यांनी ५ रुपये सहकार्य केले होते.[9] महारेतर मंडळींनी समतास तनमनधनाने सहकार्य करून समर्थपणे उभे केले परंतु फार काळ हे वृत्तपत्र तग धरू शकले नाही. अल्पावधीतच समताचा शेवट झाला.

मूल्यमापन

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्व जाती धर्म आणि पंथातील स्पृश्य महारेतर सहकाऱ्यांच्या सहकार्याने समता हे वृत्तपत्र चालविण्याचा कसोशीने प्रयास केला; परंतु  मुकनायक आणि बहिष्कृत भारत या वृत्तपत्रांप्रमाणे समता हे वृत्तपत्र सुद्धा फार जास्त काळ तग धरू शकले नाही. वाचक वर्गाची कमी, जाहिरातदरांची कमी, वाढता खर्च इत्यादी कारणाने समता हे वृत्तपत्र कायमचे बंद पडले. मात्र समताची उणीव भरून काढण्याकरिता आंबेडकरांनी त्यानंतर लगेचच जनता हे वृत्तपत्र सुरु केले.  



[1] सुरवाडे विजय, समकालीन सहकाऱ्यांच्या आठवणीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकवांग्मय गृह मुंबई, दुसरी आवृत्ती २००७ पृ. ११३

[2] समता, दिनांक २९ जून १९२८

[3] समता, दिनांक २९ जून १९२८ 

[4] समता, दिनांक १६ नोव्हेंबर १९२८

[5] समता, दिनांक २४ ऑगस्ट १९२८

[6] समता, दिनांक ८ फेब्रुवारी १९२९

[7] समता, दिनांक २४ ऑगस्ट १९२८

[8] समता, दिनांक २९ जून १९२८

[9] समता दिनांक २८ डिसेंबर १९२८