मिलिंद
महाविद्यालय: महारेतरांच्या परिश्रमातून बहरलेला बोधीवृक्ष
प्रस्तावना
महाराष्ट्रातील आणि त्यातही प्रामुख्याने मराठवाड्यात राहणाऱ्या अस्पृश्य
समाजातील तरुण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे दालन खुले करून देण्याकरिता डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यामातून दिनांक १९ जून
१९५० रोजी औरंगाबाद येथे एक महाविद्यालय सुरू केले. या महाविद्यालयाला पुढे
त्यांनी मिलिंद असे नाव दिले. मिलिंद हा बौद्ध संस्कृतीतील एक महान तत्त्ववेत्ता
होता. महाविद्यालयासाठी हे नाव आंबेडकरांना त्यांच्या सुविद्य पत्नी सविता आंबेडकर
ह्यांनी सुचविले होते.[1]
सविता ह्या पूर्वाश्रमीच्या शारदा कबीर सारस्वत ब्राह्मण म्हणजेच महारेतर होत्या.
मिलंद महाविद्यालयाच्या उभारणीत आंबडेकरांना अनेक महारेतरांनी सहकार्य केले होते.
त्यांच्या कार्याचा आढावा घेणे हा प्रस्तुत शोधनिबंधाचा उद्देश आहे.
डॉ.
म. भि. चिटणीस
आंबेडकरी चळवळीतील एक नि:स्वार्थ व प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून
सर्वपरिचित असलेले डॉ. म. भि. चिटणीस हे मिलिंद महाविद्यालयाचे जणू आधारस्तंभ
होते. महाविद्यालयाची संपूर्ण जबाबदारी आंबेडकरांनी चिटणीसकडे सोपविली होती.
आंबेडकरांच्या आदेशावरून ते खालसा महाविद्यालयातून सिद्धार्थ कॉलेजमध्ये आले होते.
आंबेडकरांनी आता त्यांना सिद्धार्थ कॉलेजमधून मिलिंद महाविद्यालयात पाठविले होते.[2]
केवळ आंबेडकरावरील निष्ठेपोटी चिटणीस मुंबईतील स्वत:ची आणि पत्नीची नोकरी सोडून
औरंगाबाद सारख्या मागासलेल्या भागात आले होते.
सुरुवातीच्या काळात मिलिंद महाविद्यालय छावणी भागातील लष्करी इमारतीमध्ये
भरत होते. चिटणीसांनी चित्रे व पाटणकरांसोबत स्वत: येऊन ह्या इमारती निश्चित
केल्या होत्या. लष्करी भागात महाविद्यालय उभारता येणार नाही अशी हरकत एका लष्करी
अधिकाऱ्याने घेतल्यावर चिटणीसांनी तसे ताबडतोब आंबेडकरांना दिल्लीस कळविले होते.
तेव्हा आंबेडकरांनी तत्कालीन संरक्षणमंत्री सरदार बलदेव सिंह यांच्याकडून ना हरकत
प्रमाणपत्र मिळवून चिटणीसांना पाठविले होते. महाविद्यालयाच्या प्रारंभीच्या काळात
आंबेडकरांना लष्कराची फार सहकार्य मिळाले त्यामुळे भारतीय लष्करप्रमुख जनरल नागेश
हे औरंगाबादला आले असता आंबेडकरांनी त्यांना मेजवानी दिली होती. त्यावेळी
चिटणीससुद्धा आवर्जून उपस्थित होते.
महाविद्यालयाकरिता कायमस्वरूपी जागा शोधण्याची जबाबदारी आंबेडकरांनी
चिटणीस यांच्याकडे सोपविली होती. चिटणीसांनी औरंगाबाद येथे महाविद्यालयासाठी अनेक
जागा बघितल्या. शेवटी आंबेडकरी चळवळीतील औरंगाबाद येथील चांभार जातीतील कार्यकर्ते
आसाराम डोंगरे यांनी म. भि. चिटणीस यांना महाविद्यालयासाठी पाणचक्कीजवळील जागा
दाखविली. ती जागा आंबेडकरांना सुद्धा आवडली. त्यामुळे त्यांनी ती जागा
महाविद्यालयाच्या कायमस्वरूपी इमारतीसाठी निश्चित केली. जवळपास पावणेदोनशे एकर
असलेली काही जमीन हैद्राबदचा संस्थानिक निजाम याच्या मालकीची होती तर काही जमीन
सखाराम कावळे या ढोर जातीतील व्यक्तीच्या मालकीची होती. निजामाकडून जमीन खरेदी करण्यासाठी
आंबेडकरांनी भाऊराव गायकवाडांसह चिटणीसांनाही हैद्राबादला पाठविले होते. सखाराम
कावळे यांच्याकडून जमीन खरेदी करण्याच्या संदर्भातसुद्धा चिटणीसांची महत्त्वाची
भूमिका बजावली होती. आंबेडकरांचे हितचिंतक असलेले औरंगाबादचे प्रशासक एल. जी. राजवाडे
यांनी ह्या जमीन हस्तांतर प्रक्रियेत मोलाची मदत केली. राजवाड्यांना ही जमीन
दाखविण्याची जबाबदारी आंबेडकरांनी चिटणीसांकडेच सोपविली होती. निजामाने आपल्या
संस्थानातील अस्पृश्यांच्या विकासासाठी उभारलेल्या एक कोटी रुपयांच्या शेड्युल्ड
कास्ट ट्रस्ट फंडमधून बारा लाख रुपये महाविद्यालयाच्या विकासासाठी दिले होते.
याविषयीच्या अर्जाचा मसुदा चिटणीसांनीच तयार केला होता. या शिवाय स्वत:
हैद्राबादला जावून चिटणीसांनी मिलिंद महाविद्यालयास उस्मानिया विद्यापीठाची
परवानगी मिळविली होती.[3]
सांगायचे तात्पर्य असे की, मिलिंद महाविद्यालयाचे शुन्यातून विश्व निर्माण
करण्यासाठी म. भि. चिटणीसांनी जीवापाड मेहनत घेतली होती.
दिनांक १ सप्टेंबर १९५० रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र
प्रसाद यांच्या हस्ते महाविद्यालयाचा कोनशिला समारंभ करण्यात आला. या समारंभास
चिटणीस नुसते उपस्थित नव्हते तर महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून हा समारंभ
पूर्णपणे यशस्वी करण्याची जबाबदारीसुद्धा त्यांच्याचकडे होती. ती त्यांनी समर्थपणे
पार पाडली. महाविद्यालयाची विद्यार्थिसंख्या वाढावी म्हणून ते सतत दक्ष राहात
होते. आसपासच्या परिसरातील शाळांच्या तसेच प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटी घेऊन
त्यांना महाविद्यालयाची माहिती सांगून विद्यार्थी पाठविण्याची ते विनंती करीत असत.
बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय शोधण्यास त्रास होऊ नये म्हणून दहावीचा
निकाल लागून महाविद्यालयाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली की, ते महाविद्यालयाच्या
शिपायांना रेल्वे स्टेशनवर विद्यार्थ्यांना आणण्यासाठी पाठवीत असत.
महाविद्यालयातील वातावरण सौहार्दपूर्ण राहावे म्हणून चिटणीस वेगवेगळे उपक्रम
राबवीत. आंबेडकरांच्या सूचनेवरून त्यांनी महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनासाठी ‘युगयात्रा’ हे सामाजिक नाटक लिहिले होते.[4]
त्यांच्याच प्रेरणेने महाविद्यालयात ‘बोधी अभ्यास मंडळा’ची स्थापना करण्यात आली होती. या मंडळाद्वारे आंबेडकरांसह शंकरराव देव
इत्यादींची व्याख्यानेसुद्धा आयोजित करण्यात आली होती. चिटणीसांच्याच
मार्गदर्शनाखाली नागोरी नावाच्या विद्यार्थ्याने स्पृश्य-अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या
सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.[5]
चिटणीसांच्याच कुशल नेतृत्वाखाली मिलिंद महाविद्यालयाच्या लहानशा रोपट्याचे लवकरच
विशाल बोधिवृक्षात रूपांतर झाले होते यात जराही शंका नाही.
जे.
एच. सुबय्या
आंबेडकरांचे कर्नाटकातील एक तडफदार सहकारी, पीपल्स
एज्युकेशन सोसायटीचे सदस्य जे. एच. सुबय्या यांचासुद्धा महाविद्यालयाच्या
निर्मितीत सिंहाचा वाटा होता. महाविद्यालयासाठी बांधकाम निधी गोळा करण्यात त्यांनी
मोलाची मदत केली होती. निजामाच्या एक कोटी रुपयांच्या शेड्युल्ड कास्ट ट्रस्ट
फंडमधून बारा लाख रुपये महाविद्यालयासाठी मिळवून देण्यात सुबय्या यांचे प्रयत्नच
कारणीभूत ठरले होते. शिवाय महाविद्यालयाला उस्मानिया विद्यापीठाची परवानगी मिळवून
देण्याच्या कार्यात त्यांनी चिटणीसांना सहकार्य केले होते. महाविद्यालयासाठी
लागणारे फर्निचर आंबेडकरांनी सुबय्या यांच्या माध्यमातूनच मागविले होते.
महाविद्यालयाच्या कोनशिला समारंभातसुद्धा सुबय्या यांनी उपस्थित राहून बरेच
सहकार्य केले होते. समारंभासाठी लिहिलेल्या भाषणाची एक प्रत आंबेडकरांनी आधीच
सुबय्या ह्यांना दिली होती. तेंव्हा सुबय्या त्यांनी सुचविल्याप्रमाणे आंबेडकरांनी
आपल्या भाषणातील निजामविषयीचा काही वादग्रस्त भाग वगळला होता. त्यामुळे या
समारंभात निजामाने महाविद्यालयास पन्नास हजार रुपयांची वैयक्तिक मदत देण्याचे
घोषित केले होते.[6]
सुबय्या यांच्या सहकार्यामुळे मिलिंद महाविद्यालयाच्या विकासास उल्लेखनीय हातभार
लागला होता.
इतर
महारेतरांचे सहकार्य
आंबेडकरी चळवळीतील इतरही महारेतर पुढारी तसेच कार्यकर्त्यांनी
महाविद्यालयाच्या विकासकार्यात मोलाची मदत केली होती. कमलाकांत चित्रे यांचेसुद्धा
महाविद्यालयाच्या उभारणीत महत्त्वाचे योगदान होते. अस्पृश्यांच्या शैक्षणिक
विकासासाठी मराठवाड्यात एक महाविद्यालय काढण्याची इच्छा आंबेडकरांनी बोलून
दाखविल्यानंतर चित्र्यांनीच चिटणीसांना मराठवाड्याच्या दौऱ्यावर पाठवून
महाविद्यालयासाठी योग्य ठिकाण शोधण्यास सांगितले होते. औरंगाबाद येथे महाविद्यालय
काढण्याचे निश्चित झाल्यानंतर त्यांनी स्वत: तेथे जाऊन लष्कराच्या इमारती किरायाने
घेण्याचे ठरविले होते.[7]
पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव या नात्याने चित्रे हे महाविद्यालयाच्या
विकासाकडे जातीने लक्ष देत होते. सिद्धार्थ कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. पाटणकर
यांची महाविद्यालयाच्या प्रारंभिक काळात मोलाची मदत झाली होती. प्रयोगशाळेसाठी लागणारी
उपकरणे, रसायने व इतर साहित्य त्यांनी स्वत: निवडून
औरंगाबादला पाठविले होते. सिद्धार्थ कॉलेजचे प्राचार्य असून मिलिंद
महाविद्यालयासाठी त्यांनी जे सहकार्य केले ते केवळ आंबेडकरांच्या अस्पृश्यांच्या
शैक्षणिक विकासाच्या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊनच केले होते. मोरेश्वर वासुदेव
दोंदे यांनी महाविद्यालयाच्या जागेविषयी आंबेडकरांना योग्य असा सल्ला दिला होता.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे एक पदाधिकारी म्हणून दोंदे यांनी नेहमीच
महाविद्यालयाच्या कार्यास प्रोत्साहन दिले होते. एन. शिवराज व पांडुरंग नाथुजी
राजभोज या आंबेडकरी चळवळीतील पुढाऱ्यांनी महाविद्यालयाच्या बांधकामासाठी निधी गोळा
करण्यात बरीच मदत केली होती. महाविद्यालयाच्या कोनशिला समारंभासाठीसुद्धा त्यांनी
सहकार्य केले होते. सोसायटीचे सदस्य व आंबेडकरांचे स्पृश्य सहकारी म. बा. समर्थ व
व्ही. जी. राव हेसुद्धा महाविद्यालयाच्या कार्यात नेहमीच लक्ष देत असत. औरंगाबाद
येथे ‘गोरगरिबांचे डॉक्टर’ म्हणून
प्रसिद्ध असलेले आंबेडकरांचे एक हितचिंतक डॉ. ख्रिश्चन यांनीही महाविद्यालयाच्या कार्यकारी
समितीचे सदस्य म्हणून महाविद्यालयाच्या कार्यास वेळोवेळी प्रोत्साहन दिले होते.[8]
अशाप्रकारे आंबेडकरी चळवळीतील प्रत्येकजण मग तो महार असो की महारेतर असो मिलिंद
महाविद्यालयाच्या विकासासाठी अविरत झटत होता.
प्राध्यापक
व कर्मचाऱ्यांची भूमिका
मिलिंद महाविद्यालयात कार्यरत असलेले प्राचार्य, प्राध्यापक,
शिक्षकेत्तर कर्मचारी आणि महाविद्यालयाशी सबंधित असलेले इतरही
अनेकजण महाविद्यालयाच्या विकासाकरिता सतत प्रयत्नशील होते. प्राचार्य म्हणून डॉ. म.
भि. चिटणीसांनी खंबीरपणे महाविद्यालयाचे नेतृत्व केले होते. शिवाय इतरही
प्राध्यापकांनी आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली होती. प्रा. रा. भी. जोशी
यांनी राजवाडे यांना महाविद्यालयासाठीची जमीन दाखविण्यासाठी चिटणीसांना मदत केली
होती. महाविद्यालयाची विद्यार्थि संख्या वाढावी म्हणून तेसुद्धा परिसरातील
प्रतिष्ठित व्यक्ती तसेच शाळांना भेटी देत असत. प्रा. आर. एस. गुप्ते हे
महाविद्यालयातील ‘बोधी अभ्यास मंडळा’चे
कार्याध्यक्ष होते.[9] या
मंडळार्माफत त्यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या हिताकरिता विविध उपक्रम
राबविले होते. चिटणीसांच्या ‘युगयात्रा’ नाटकाच्या वेळी त्र्यंबक महाजन व प्रा. भालचंद्र फडके यांनी विशेष सहकार्य
केले होते. फडके यांनी नाटकाच्या नभोवक्त्याची भूमिका बजावली होती. आंबेडकरांनी
भारतातील विविध प्रांतांतील अनेक विद्वान प्राध्यापकांना महाविद्यालयात नियुक्त
केले होते. कर्नाटकातील प्रा. डॉ. मरळीहळ्ळी, डॉ पाटील,
केरळमधील प्रा. नायर, तामिळनाडूमधील प्रा. अय्यर,
काश्मिरमधील प्रा. कुरेशी इत्यादी प्राध्यापक मंडळींनी आपला प्रदेश,
आपले घरदार, आपली माणसे सोडून औरंगाबादसारख्या मागासलेल्या भागातील
महाविद्यालयात सेवा देऊन महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्यात महत्त्वपूर्ण योगदान
दिले होते. प्रा. मे. पु. रेगे, प्रा. चिखलीकर, जी. सी. सुर्वे, के. ए. ठकार, डी.
व्ही. जोग, व्ही. एन. माथूर, व्ही. व्ही.
खरे, शेंबवणेकर, वडजीकर[10]
इत्यादी महाराष्ट्रातील विविध भागांतील प्राध्यापकवृदांनी सुद्धा मिलिंद महाविद्यालयात
सेवा देवून अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण दान देण्याचे महान कार्य
केले. महाविद्यालयाचे ऑफिस सुपरीटेंडेंट ठेंगे त्याचप्रमाणे लिपिक एस. एस. मनोहर,
आप्पा जुमडे हे वसतिगृहाचे रेक्टर यांनीसुद्धा महाविद्यालयाच्या
विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य केले होते. महाविद्यालयातील ड्रायव्हर जयराम माने,[11]
महाविद्यालयाच्या प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो काढणारे फोटोग्राफर
महमंदभाई यांचे सुद्धा महाविद्यालयाच्या कार्यात अल्पसे का होईना परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण
आणि उल्लेखनीय असे योगदान होते. अन्य महारेतरांचे योगदान
आंबेडकरी चळवळीतील महारेतर अनुयायांनी मिलिंद महाविद्यालयाच्या उभारणीत
विशेष कार्य केले त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यरत नसलेल्या परंतु आंबेडकरी
चळवळीचे आणि आंबेडकरांचे हितचिंतक असलेल्या इतरही अनेक महारेतरांचे मिलिंद
महाविद्यालयाच्या कार्यात उल्लेखनीय योगदान लाभले होते. आपल्या हैद्राबाद
संस्थानातील अस्पृश्यांसाठी असलेल्या एक कोटी रुपयांच्या शेड्युल्ड कास्ट ट्रस्ट
फंडमधून बारा लाख रुपये कर्ज म्हणून का होईना निजामाने महाविद्यालयास आर्थिक मदत
करून सहकार्य केले होते हे विसरता येण्याजोगे नाही. शिवाय आपल्या मालकीची
जागासुद्धा त्याने महाविद्यालयासाठी विकत दिली होती. सखाराम कावळे या ढोर जातीतील
व्यक्तीनेसुद्धा महाविद्यालयासाठी आपली जमीन विकत दिली होती. निजाम व सखाराम कावळे
या दोघांनीही अप्रत्यक्षपणे महाविद्यालयासाठी अविस्मरणीय असे योगदान दिले होते.
भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी आंबेडकरांच्या
शब्दाखातर दिल्लीहून औरंगाबादला येऊन आपल्या हस्ते महाविद्यालयाची कोनशिला बसवून
एक महान कार्य केले होते.[12]
तत्कालीन शिक्षणमंत्री म्हणून मौलाना अब्दूल कलाम आझाद यांनीसुद्धा मिलिंद
महाविद्यालयाच्या प्रारंभिक विकास कार्यात बहुमुल्य सहकार्य केले होते. तत्कालीन
गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल, तत्कालीन संरक्षण मंत्री
बलदेवसिंग, याशिवाय केंद्रीय मंत्री गोपालस्वामी अयंगार, हैद्राबाद
प्रांताचे मुख्यमंत्री बेलोडी तसेच रामचंद्र राव, विनायकराव
कोरटकर, शेषांद्री इत्यादी मंत्री, मुख्य
न्यायाधीश रामचंद्र नाईक व स्टेट सेक्रेटरी बुच इत्यादीं महारेतर मंडळींनी मिलिंद
महाविद्यालयास वेळोवेळी भेटी देऊन महाविद्यालयाची सामाजिक व शासकीय प्रतिष्ठा
वाढविण्याच्या कार्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती.
मूल्यमापन
आंबेडकरी चळवळीमध्ये महार जातीतील अनुयायांसह अस्पृश्यता निवारण्याच्या
कार्यात सहभागी असलेल्या विविध जाती, धर्म आणि पंथातील महारेतर अनुयायी,
कार्यकर्ते, सहकारी आणि हितचिंतक यांनी आंबेडकरी शैक्षणिक चळवळीतील उल्लेखनिय
योगदान दिले आणि केवळ आंबेडकरी चळवळीतीलच नाही तर चळवळीशी फारसा संबंध नसलेल्या
महारेतर मंडळींनी सुद्धा अस्पृश्य समाजात शिक्षणाचा प्रचार-प्रसार व्हावा या
हेतूने प्रेरित होऊन आंबेडकरी शैक्षणिक चळवळीस विशेष सहकार्य केले. परिणामी डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालये
अल्पावधीतच नावारूपास आल्या. या शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून
अस्पृश्य समाजाचा झपाट्याने शैक्षणिक विकास घडून आला. हे सर्व महारेतर मंडळींच्या
सहकाऱ्यानेच शक्य झाले असे म्हटल्यास अतिशोयोक्ती होणार नाही.
संदर्भ
सूची
[1] आंबेडकर
सविता, डॉ आंबेडकरांच्या सहवासात, तथागत प्रकाशन कल्याण, सुधारित द्वितीय आवृत्ती
२०१३, पृ. १९५
[2] निंबाळकर वामन, सामाजिक क्रांतीच्या दिशा,
प्रबोधन प्रकाशन नागपूर, प्रथम आवृत्ती २००७, पृ. ४०६
[3] बागुल योगीराज, आठवणींतले बाबासाहेब, ग्रंथाली
प्रकाशन मुंबई, प्रथम आवृत्ती २००८, पृ. ४०३
[4] गायकवाड महेंद्र, सहवास बाबासाहेबांचा, चिन्मय
प्रकाशन २०१३, पृ. १६१
[5] सुरवाडे विजय, समकालीन सहकाऱ्यांच्या आठवणीतील
आंबेडकर, लोकवांग्मय गृह मुंबई, द्वितीय आवृत्ती २००७, पृ. २८३
[6] निंबाळकर, उपरोक्त, पृ. ३८४
[7] कित्ता, पृ. ४०२
[8] गायकवाड उपरोक्त, पृ. १८८
[9] कित्ता, पृ. १८४
[10] निंबाळकर, उपरोक्त, पृ. ४०९
[11] सुरवाडे, उपरोक्त, पृ. ३०९
[12] कीर, डॉ बाबासाहेब आंबेडकर, पॉप्युलर प्रकाशन
मुंबई, सहावी आवृत्ती १९८९, पृ. १४७